संमेलनाध्यक्षांची ओळख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संमेलनाध्यक्षांची ओळख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

तेरावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1927)

 


तेराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. ते मराठीतील विनोदी वाङ्मयाचे आद्यप्रवर्तक होत. सुदाम्याचे पोहे हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह म्हणजे मराठी वाङ्मयाचे भूषण मानले जाते. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता. ते बहु असोत सुंदर, संपन्न की महान या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून परिचित आहेत. त्यांनी शाळेत शिकत असतानाच लेखनास सुरुवात केली. त्यांनी त्यावेळी सुखमालिका हे नाटक लिहिले. अर्थात, त्याचे प्रयोग झाले नाहीत. वा पुढे ते फार नावारूपासही आले नाही, पण कॉलेजमध्ये असताना, वयाच्या तेविसाव्या वर्षी तात्यासाहेबांनीवीरतनयहे नाटक लिहिले. ते नाटक किर्लोस्कर नाटक मंडळींनी 1896 च्या मे महिन्यात रंगभूमीवर आणले. मग नाटककार म्हणून श्रीपाद कृष्ण गोखले ऊर्फ तात्यासाहेब कोल्हटकर हे नाटकवेड्या रसिक प्रेक्षकांना माहीत झाले व आवडूही लागले. त्यांचे मूकनायकहे नाटक विशेष गाजले, पण त्यांना त्यांच्या नाटकांचे मृत्यू त्यांच्या हयातीतच पाहण्यास लागले.

कोल्हटकर यांचा पहिला विनोदी लेख साक्षीदार विविध ज्ञानविस्तारात 1903 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांचा अठरा धान्यांचे कडबोळे हा पहिला विनोदी लेखसंग्रह 1910 साली प्रसिद्ध झाला. सुदाम्याचे पोहे हा बत्तीस विनोदी लेखांचा संग्रह 1921 साली प्रसिद्ध झाला. श्रीपाद कृष्ण हे नाटककार असूनही नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, पण ते पुणे येथे भरलेल्या तेराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 1927 साली झाले.

कोल्हटकर यांचा जन्म 29 जून 1871 रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे बी ए, एलएल बी असे शिक्षण झाले होते. त्यांना इंग्रजी नाटके, कादंबऱ्या वाचण्याची आवड. त्यांची साहित्यनिर्मिती ही वकिली व्यवसायात असतानाच सुरू होती.

त्यांनी वकिली अकोला, खामगाव, जळगाव-जामोद या ठिकाणी केली. ते आयुष्याच्या अखेरीस जळगावला स्थायिक झाले. त्यांच्या नावावर असलेले साहित्य म्हणजे मूकनायक’, ‘वीरतनय’, ‘वधुपरीक्षा यांसारखी एकूण तेरा नाटके, अठरा धान्यांचे कडबोळेसुदाम्याचे पोहे हे दोन विनोदी लेखसंग्रह, श्यामसुंदरदुटप्पी की दुहेरी या कादंबऱ्या आणि आत्मवृत्त हे आत्मचरित्र.

त्यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले आहे, की मराठी भाषा ही दुय्यम शिक्षणात माध्यम व वरिष्ठ शिक्षणात ऐच्छिक झाल्यापासून अनेक चांगल्या शालोपयोगी पुस्तकांची निर्मिती होऊ लागली आहे. इंग्रजी वाङ्मयाकडे फाजील पक्षपाताने झुकत चाललेली महाराष्ट्रीयांची दृष्टी परत खेचून मराठी भाषेकडे वळती करण्याचे मुख्य श्रेय मराठी भाषेत स्वतंत्र व सरस ग्रंथरचना करणाऱ्या लेखकांसच दिले पाहिजे.

ते सांगली येथे 1920 साली भरलेल्या तिसऱ्या ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष होते. मराठी कवितेवर त्यांचा नितांत जीव होता. ते स्वत: कविता करत. त्यांचा मृत्यू 1 जून 1934 रोजी झाला.

- वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र  गीत

बहु असोत सुंदर संपन्न की महा ।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।।

         गगनभेदी गिरिविण अणुनच जिथे उणे ।
         आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ।
         अटके परी जेथील तुरूंगि जल पिणे ।
         तेथ अड़े काय जलाशय - नंदांविणे ।।
         पौरुषासि अटक गमे जेथ दुःसहा ।।
         प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। १ ।।

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे ।
रत्नान्  वा मौक्तिकांही मूल्य मुळि नरे ।
रामणीची कूस जिथे नृमणि - रवनि ठरे ।
शुद्ध तिचे शीलहि गृहा गृहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। २ ।।

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे ।
चतुरंग चमूंचेहि शौर्य मावळे ।
दौड़त चहुकडूनि जवें स्वार जेथले ।
भासति शतगुणित जरी असति एकले ।
यन्नामा परिसुनि रिपु शामितबल अहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। ३ ।।

विक्रम वैराग्य एक जागि नांदती ।
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती ।
शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती ।
पसरे यत्किर्ति अशी विस्मयावहा ।।
प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। ४ ।।

गीत मराठ्यांचे हे श्रवणी मुखी असो ।
            स्पूर्ति दीप्ति द्रुतिहि देत अंतरी वसो ।
            वचनि लेखनिहि मराठी गिरी दिसो ।
            सतत महाराष्ट्र - धर्म मर्म मनि वसो ।
            देह पडो सत्कारणि ही असे स्पृहा ।।
            प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। ५ ।।

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

बारावे साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1926)

 


बारावे साहित्य संमेलन मुंबई येथे 1926 साली साजरे झाले. ते अकराव्या संमेलनानंतर पाच वर्षांनी भरले होते. त्याचे अध्यक्ष सरदार माधवराव विनायकराव किबे होते. साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर यांच्यासारखा चतुरस्र अध्यक्ष झाल्यावर पुढील साहित्य संमेलनाचा अध्यक्ष किमान उत्तम साहित्यिक असावा अशी अपेक्षा होती. पण सरदार किबे यांचे नाव साहित्य क्षेत्रात त्या तोडीचे मानले गेले नाही. किबे यांचा व्यासंग अनेक विषयांचा होता. पण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा तोलामोलाचा साहित्यिक असावा तसे ते नव्हते. मुंबईत 1915 साली भरलेल्या, नवव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मिरज संस्थानचे संस्थापती, मल्लविद्याविशारद गंगाधर पटवर्धन होते; अगदी तसेच, पुन्हा एकदा 1926 साली मुंबईतच घडले. सरदार किबे यांचे भाग्यच थोर असावे. त्यांना मुंबई संमेलनानंतर पुन्हा कोल्हापूर येथे 1932 साली भरलेल्या अठराव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची संधी योगायोगाने मिळाली. त्या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष सयाजीराव गायकवाड हजर राहू न शकल्यामुळे व सरदार किबे साहित्य परिषदेचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांची नियुक्ती अध्यक्षपदी झाली. एकच व्यक्ती संमेलनाची दोनदा अध्यक्ष असल्याची इतिहासात ती एकमेव नोंद आहे! त्यांचे लंकेचे मूळ स्थान कोणते?’ या नावाचे एक इंग्रजी संशोधित पुस्तक वादग्रस्त ठरले. कारण रावणाची लंका ही भारताच्या दक्षिण टोकाला नसून ती मध्यप्रदेशात आहे हे त्यांनी मांडले होते.

किबे यांचे सारे आयुष्य इंदुरात गेले. माधवराव विनायकराव किबे यांचा जन्म 5 एप्रिल 1877 रोजी झाला. ते देवास संस्थानचे 1914 ते 1916 अशी दोन वर्षे दिवाण होते. ते इंदूरला 1916 ते 1926 होम मिनिस्टर व 1926 ते 1933 पर्यंत डेप्युटी प्राईम मिनिस्टर होते. त्यांचा विवाह रत्‍नागिरी जिल्ह्यात भरभराटीला आलेल्या कोल्हापूरच्या सरदेसाई यांच्या घराण्यातील कमला यांच्याशी झाला. त्या मराठी कवयित्री, लेखिका आणि वक्त्या होत्या.

त्यांचा वाङ्मयविषयी राजनितीस असा दबदबा होता. ते साहित्य परिषदेचे पहिल्यापासून कार्यकर्ते होते. त्यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेशी घट्ट संबंध होता. त्यांचा मृत्यू  12 ऑक्टोबर 1963 रोजी झाला.

- वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

-----------------------------------------------------------------------------------------------

मंगळवार, ३० मार्च, २०२१

अकरावे साहित्य संमेलन : 1921 (Marathi Literary Meet 1921)

 


अकरावे साहित्य संमेलन 1921 साली बडोदे येथे भरले होते. त्याचे अध्यक्ष साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण ऊर्फ तात्यासाहेब केळकर हे होते. दहाव्या संमेलनानंतर चार वर्षांनी. तेवढ्या अवधीत तीन मोठे साहित्यिक मृत्यू पावले, ज्यांची पात्रता अध्यक्ष होण्याची होती. ते लेखक म्हणजे प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरी (जन्म 26 मे 1885, मृत्यू  23 जानेवारी 1919), त्र्यंबक बापूजी ठोमरे ऊर्फ बालकवी (जन्म 13 ऑगस्ट 1890, मृत्यू 5 मे 1918), लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (23 जुलै 1856, मृत्यू 1 ऑगस्ट 1920). केळकर हे तसे भाग्यवान साहित्यिक. त्यांचा संबंध लोकमान्य टिळक यांच्याशी आला आणि ते केसरी-मराठा संस्थेत मार्च 1896 मध्ये रूजू झाले. तात्यासाहेब आणि टिळक यांची इतकी ओळख झाली नि संबंध इतके घनिष्ट जोपासले गेले, की ते टिळक यांच्या राजकीय आणि वृत्तपत्रीय नेतृत्वाचे वारस ठरले.

टिळक 1897 साली तुरुंगात गेले. त्यामुळे संपादक म्हणून तात्यासाहेब केळकर यांची नेमणूक झाली. केळकर केसरीत येऊन तेव्हा जेमतेम एक वर्ष झाले होते. केळकर यांच्या हातात महाराष्ट्राची राजकीय सूत्रे टिळक यांच्या निधनानंतर, 1920 साली आली. ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष 1918 साली झाले. त्यांची मध्यवर्ती कायदे मंडळात निवड 1925 साली झाली. ते केसरी-मराठा संस्थेचे विश्वस्त, संचालक पुढे झाले. त्यांनी सह्याद्री मासिक (1935 ते 1947) यशस्वीपणे चालवले. त्यांनी त्यांच्या हयातीत विपुल लेखन केले. अनेक प्रस्तावना लिहिल्या. त्यांचे अग्रलेख गाजले. त्यांनी पंधरा हजार छापील पृष्ठांपेक्षा जास्त मजकूर प्रसिद्ध केला. त्यांची निवड काँग्रेस व होमरूल लीग ह्यांच्यातर्फे विलायतेला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे चिटणीस म्हणून 1918 मध्ये झाली. त्यांनी विलायतयात्रा 1919 मध्ये केली. त्यांनी विलायतेत असताना ब्रिटिश इंडिया काँग्रेस कमिटीच्या इंडियाह्या पत्राचे संपादन केले. ते सोलापूर येथे 1920 मध्ये भरलेल्या काँग्रेस आणि होमरूल लीग ह्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी तीन लक्ष रूपयांचा टिळक पर्स फंड त्याच वर्षी जमवून तो टिळक यांना अर्पण केला. त्यांची कायदेमंडळावर निवड स्वराज्य पक्षातर्फे 1923 मध्ये झाली. त्यांच्यावर वरिष्ठ कोर्टाच्या बेअदबीचा खटला 1924 मध्ये झाला व त्यात त्यांना पाच हजार दोनशे रुपयांचा दंड द्यावा लागला. ते पुणे येथे 1927 मध्ये झालेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यांना बडोदे वाङ्मय परिषदेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही देण्यात आले होते (1931). ते उज्जैन येथे भरलेल्या मध्य भारतीय कविसंमेलनाचे अध्यक्ष त्याच वर्षी होते.

न.चिं. केळकर यांनी लोकमान्य टिळक यांचे तीन भागांतील चरित्र लोकमान्य यांच्या निधनानंतर लगेच लिहिले. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना साहित्य सम्राटही पदवी उत्स्फूर्तपणे बहाल केली व ती लोकांनी मान्य केली. त्यांनी त्यांचे आयुष्य व्यवस्थित, शिस्तशीरपणे आखले. त्यांनी अनेक व्यासपीठांवर अध्यक्षस्थान भूषवले; अत्यंत रसाळ प्रवचने केली. भाषणे केली. केळकर यांनी वाङ्मयाचे सर्व मार्ग यशस्वीपणे चोखाळले. प्रसन्नचित्त, खेळकर वृत्तीचे केळकर लोकांना हवेहवेसे वाटायचे. ते त्यांच्या राजस व्यक्तिमत्त्वामुळे आणि त्यांच्या अप्रतिम भाषणांमुळे लोकप्रियता पावले.

त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1872 रोजी मोडनिंब (मिरज) येथे झाला. त्यांनी बी ए (1891), एलएल बी (1894) असे शिक्षण घेतले होते. त्यांनी सातारा येथे वकिलीची सनद घेऊन वकिलीही सुरू केली. त्यांची नेमणूक वर्षभरात अक्कलकोट संस्थानात मुन्सफ म्हणून झाली, पण त्यांचा जीव तेथे रमेना. म्हणून ते जमखंडी संस्थानात प्रयत्न करू लागले. योगायोगाने त्यांची लोकमान्य टिळक यांच्याशी गाठ पडली नि ते केसरी-मराठा संस्थेत 1896 साली आले. त्यांनी त्यांचे आयुष्य त्या संस्थेलाच वाहून घेतले. ते केसरी वृत्तपत्राचे संपादक 1897 साली झाले. पुढे ते त्याच संस्थेचे विश्वस्त आणि संचालक झाले. ते सह्याद्री मासिकाचे संपादक 1935 साली झाले ते शेवटपर्यंत.

मराठी वाचकांना आणि लेखकांना वाङ्मयचर्चेची गोडी लावण्यात केळकर यांचा वाटा मोठा आहे. केळकर यांनी अनेक वाङ्मयीन प्रश्न उपस्थित करून त्यांची चर्चा केली आहे. वाङ्मय म्हणजे काय, वाङ्मयानंदाचे स्वरूप काय, कलेचा हेतू व तिचे फळ - एक की भिन्न, वाङ्मयातून प्रकट होणारे सत्य व शास्त्रीय सत्य ह्यांतील फरक काय, अलंकार व रस ह्यांचा परस्परसंबंध काय, नवे वाङ्मय का व केव्हा निर्माण होते, वाङ्मयाच्या संदर्भात अश्लीलतेचा अर्थ काय, वास्तववाद व ध्येयवाद यांतील भेद काय, विनोद व काव्य ह्यांचे नाते काय, हास्याची कारणे कोणती, उपमेचे निर्णायक गमक काय, गद्य व पद्य आणि पद्य व काव्य ह्यांच्या परस्परसंबंधांचे स्वरूप काय, काव्याचे वर्गीकरण कसे करावे, नाटकातील पदे कशी असावीत, वाङ्मयीन टीका म्हणजे काय, आठवणी व आख्यायिका ह्यांत कोणता फरक असतो वगैरे ते प्रश्न आहेत. त्यांच्या समग्र लेखनाचे समग्र केळकर वाङ्मयया नावाने बारा खंड प्रसिद्ध आहेत. विशेषत: त्यांचे लोकमान्य टिळक चरित्र, मराठे व इंग्रज, हास्य-विनोद मीमांसा, तोतयाचे बंड, ज्ञानेश्वरी सर्वस्व यांसारखे हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचा मृत्यू 14 ऑक्टोबर 1947 रोजी झाला.

- वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------