लंडन क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा
लंडन क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा

गुरुवार, २८ मे, २०२०

लंडन खूप दूर आहे... (Corona Experience in Britain)


अमेय आणि तेजश्री वेल्हाणकर
कोरोनासंबंधात लंडन येथे राहत असलेल्या वेल्हाणकर व दळवी कुटुंबीयांशी संपर्क साधला. अमेय आणि तेजश्री वेल्हाणकर या पतिपत्नींनी तेथील माहिती दिली. पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये 29 जानेवारी 2020 रोजी आढळला. बरेच लोक डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत इटाली, ऑस्ट्रिया अशा युरोपीयन देशांत सहलीसाठी जातात. तसेच ते या वेळीही गेले होते. युरोपीयन देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव आधीच झाला होता. दरम्यान, नववर्ष साजरे करून चीनमधून लोक कामावर हजर  होण्यासाठी ब्रिटनमध्ये परत येऊ लागले होते. परंतु त्यावेळी सगळीकडे पसरलेला कोरोना ब्रिटनमध्ये गांभीर्याने घेतला गेला नाही. त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. कोरोनाचा विषाणू ब्रिटनमध्ये शिरला. सरकारने पहिले पाऊल 16 मार्चला उचलले. परदेशी प्रवासावर निर्बंध घातले. परदेशी प्रवासी थांबले तरी देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच होते. ऑफिस अथवा कंपनीमध्ये एखादा कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघाला तर  तेवढा एक  मजला बंद ठेवला जाऊ लागला. तरीसुद्धा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत गेला. बऱ्याच कंपन्यांनी मग त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरांतून काम करण्याच्या सूचना दिल्या. सरकारने 20 मार्चला लॉकडाऊन जाहीर केले. सार्वजनिक स्थळे, मॉल्स, जिमखाने बंद झाले. विलगीकरणाबद्दलच्या सूचना 24 मार्चला दिल्या गेल्या. तोपर्यंत कोरोनाचा उद्रेक मोठा झाला होता. ब्रिटन कोरोनाबाधित देशांमध्ये जगात दुसऱ्या स्थानावर जाऊन पोचला होता.
        लॉकडाऊन जाहीर झाल्याबरोबर स्टोअर्सबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या, फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी होती. पण स्टोर उघडे आणि आत काही मालच नाही अशी परिस्थिती झाली. कोठेही गेलात तरी मनुष्यस्वभाव बदलत नाही हे म्हणतात, ते खरे आहे. लोकांनी साठेबाजी सुरू केली. सॅनिटायझरची विक्री चढ्या भावाने सुरु झाली. हगवण/डायरियाची साथ आल्याप्रमाणे टॉयलेट पेपरची विक्रमी विक्री झाली. टॉयलेट पेपर मिळेनासे झाले. त्यात सरकारने लक्ष घातले आणि रेशनिंग सुरु केले. एका वेळेस एका व्यक्तीला फक्त दोनच वस्तू खरेदी करता येतील असा नियम निघाला. परिणामी लोक रोज दुकानाबाहेर रांगा लावू लागले. ब्रिटनमध्ये ऑनलाईन खरेदी-विक्री भरपूर प्रमाणात होते. तेथेसुद्धा ऑर्डर देण्यासाठी लाख-दीड लाख लोक क्यूमध्ये असायचे. मर्यादित लोकांच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जायच्या. लोक परत दुसऱ्यादिवशी साईट सुरु झाली, की लॉगिनसाठी प्रयत्न करायचे. त्या सगळ्या गडबडीत जेष्ठ नागरिकांची पंचाईत होऊ लागली. त्यांना लांब रांगेत उभे राहणे जमेना. त्यांच्यासाठी दुपारचा एक तास आरक्षित केला गेला. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सकाळचा एक तास राखीव ठेवला गेला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होऊ लागला.

        सध्या तेथे काय परिस्थिती आहे? आर्थिक  केंद्र असलेल्या लंडन आणि व्यवसायाचे केंद्र असलेल्या मँचेस्टर येथे कोरोनाने  हाहाकार माजवला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे ती गर्दीची ठिकाणे आहेत. शरीर तंदुरुस्ती ही अनिवार्य गोष्ट आहे असे मानणाऱ्या सरकारने वॉकला जायला व डॉग रनिंगला बंदी घातली नाही. सार्वजनिक वाहतूक चालू आहे. फक्त अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी दिवसातून एकदा बाहेर पडा अशा सूचना आहेत. पण त्याची कडक अंमलबजावणी होत नाही. कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलिस दंड आकारू शकतात. पण एखादी व्यक्ती, दिवसातून किती वेळा बाहेर पडली आहे, ती नक्की कोणत्या कारणासाठी बाहेर पडली आहे, याचा माग ठेवणे हे काम तसे कठीणच. कोरोनाच्या तडाख्यातून अगदी पंतप्रधान बोरिस जॉन्सन व प्रिन्स चार्ल्सपण सुटले नाहीत. नव्वदी पार केलेल्या राणीच्या बाबतीत ते होऊ नये म्हणून तिला जनसंपर्कापासून दूर दुसऱ्या राजमहालात ठेवले आहे.
          इतर सर्व देशांप्रमाणे ब्रिटनचेही खूप आर्थिक नुकसान झाले आहे. जे.पी.मॉर्गनमध्ये व्हाईस प्रेसिडंट असलेले अमेय वेल्हाणकर सांगतात, की यावर्षी जीडीपीचा दर आठ टक्क्यांनी खाली जाईल असा अंदाज आहे. तेथील स्टॉक मार्केट जानेवारी 2020पासून पंचवीस टक्क्यांनी गडगडले आहे. रोख्यांचे भाव खाली आल्यामुळे उद्योजक पैसे उभारण्यासाठी धावाधाव करु लागले आहेत. सरकारने या सर्वांवर उपाय म्हणून देशाच्या जीडीपीच्या पाच टक्के मदत जाहीर केली आहे. कामगाराचा पगार देणे मालकाला शक्य झाले नाही तर त्याचा ऐंशी टक्के पगार अथवा दरमहा अडीच हजार पौंडांची मदत सरकारने प्रत्येक कामगाराला दिली. मोठ्या कंपन्यांमध्ये काम कमी झाल्याने थोडे कमी तास काम करा व कामानुसार पगार घ्या असे धोरण सुरु केले आहे. ते कर्मचाऱ्यांनापण फायदेशीर ठरत आहे, कारण मुले घरी असतात. त्यांना सांभाळून ऑफिसचे काम करण्याची तारेवरील कसरत सोपी होते. ते सांगतात, कोरोना हा ब्रिटनमध्ये दुष्काळातील तेरावा महिना आहे. ब्रेक्झिटमुळे अर्थव्यवस्था मंदावली होती. त्यात कोरोनाचे संकट आले. डिसेंबर 2020पर्यंत ब्रेक्झिटचे सोपस्कार पूर्ण करायचे होते. ती तारीख गाठणे कठीण आहे. ते पुढे सांगतात, की नॅशनल हेल्थ स्कीमच्या अंतर्गत सर्व वैद्यकीय सेवा सरकार मोफत पुरवते. तो मोठा फायदा नागरिकांना आहे. 
श्रेयस वेल्हाणकर
डेलॉइटमध्ये असिस्टंट मॅनेजर असलेले श्रेयस वेल्हाणकर सांगतात
, की व्हिसावर काम करणारे लोक नोकरीवरून कधी काढून टाकतील या भीतीच्या छायेत काम करत आहेत. नवीन नोकरभरती पूर्णपणे थांबली आहे. श्रेयस यांना मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात परदेश प्रवास करावा लागला. त्यांना परत आल्यावर सर्दीखोकला झाला. त्यांची एका दिवसात टेस्ट होऊन त्याचा रिपोर्टपण मिळाला. ते सांगतात, की आता तसे होत नाही. आजार खूप बळावला असेल तरच टेस्ट होते. आम्ही नॅशनल हेल्थ स्कीम व इतर सेवाभावी काम करणाऱ्या लोकांचे आभार मानण्यासाठी दर गुरुवारी बाल्कनीमध्ये उभे राहून टाळ्या वाजवतो. लॉकडाऊन कंटाळवाणा होऊ नये म्हणून ते व त्यांचे सहकारी लंच ऑनलाईन एकत्र घेतात.
         
दिनानाथ दळवी
लंडनला स्थायिक असलेले जेष्ठ नागरिक दळवी सांगतात
, की सरकार आमची खूपच काळजी घेत आहे. आमची मेडिकल हिस्टरी नॅशनल हेल्थ स्कीमकडे आहे. त्यानुसार आमची हाय रिस्क, व्हलनरेबल अशी वर्गवारी केली गेली आहे. त्यांना आमची गरजेची औषधे माहीत असतात. ते लोक आमच्या तब्येतीची चौकशी करतात. गरज पडल्यास औषधेगरजेच्या वस्तू, फूड पॅकेट्स पुरवतात.
        ब्रिटिश टेलिकम्युनिकेशनमध्ये Finance  Manager म्हणून कार्यरत असलेल्या तेजश्री वेल्हाणकर सांगतात, की लॉकडाऊनचा एक मोठा फायदा असा झाला, की अमेय बराच वेळ घरी असतो. माझा प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे मला पेंटिंग करायला, पियानो वाजवायला वेळ मिळतो. मी जीम बंद झाल्यामुळे परत योगाकडे वळले आहे. समर सुरु झाला आहे. लोक सनबाथसाठी उत्सुक आहेत. बरेच महिने घरी असलेल्या मुलांना घरी कसे रमवायचे यासाठी पालक नवनवीन शक्कला लढवत आहेत.     दळवी सांगतात, की व्हीलचेअरवर असलेल्या आमच्या शेजाऱ्याच्या पत्नीचे अचानक निधन झाले.  नॅशनल हेल्थ स्कीमच्या लोकांनी सगळी काळजी घेतली. आम्ही मात्र त्यांना काही मदत करू शकलो नाही. अगदी अंत्यदर्शनसुद्धा आम्हाला घेता आले नाही. तर वेल्हाणकर म्हणाले, की आमचे आईवडील भारतात असतात. आत्तापर्यंत वाटायचे, की त्यांना गरज लागली तर आम्ही लगेच भारतात पोचू. प्रवासाला आठ-दहा तास लागतात. लंडन काही दूर नाही. पण आता जाणवते, ते तेवढे सोपे नाही. लंडन खूप दूर आहे.
अमेय वेल्हाणकर 44-7768534848 ameyavelhankar@gmail.com
दिनानाथ दळवी 44-7521817483 dinanath1954@gmail.com
विनीता वेल्हाणकर यांचे एम ए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी बँकेत तेहेतीस वर्षे नोकरी केली आणि 2011 साली स्वेच्छानिवृत्ती पत्करली. त्यांचे पती चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांची मुलगी मानसी वैद्य व तिचा परिवार अमेरिकेत आहे आणि मुलगा अमेय व त्याची पत्नी तेजश्री लंडनला वास्तव्यास आहेत. विनीता यांना वाचनाची आवड आहे. तसेच, त्यांचा शेअर मार्केटचाही अभ्यास आहे.  

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२०

विस्मृतीत गेलेला स्वतंत्र पक्ष (Forgotten Political Party Swatantra & Its Founder Masani)


स्वतंत्र पक्ष नावाचा एक पक्ष भारतात होता. तो जून 1959 साली स्थापन झाला आणि 1974 साली विसर्जितही झाला. तरी त्याचा प्रभाव जाणवतो, कारण त्या पक्षात तशीच मोठी प्रभावशाली माणसे गुंतली गेली होती. त्या विस्मृतीत गेलेल्या पक्षाची आठवण जागी झाली, ती त्याच पक्षाच्या संस्थापकांपैकी एक, मिनू मसानी यांच्या ‘सोव्हिएट साईडलाईट्सया पुस्तकामुळे. ते पुस्तक गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकनॉमिक्स या संस्थेच्या डिजिटल लायब्ररीत उपलब्ध झाले.
मिनू (मिनोचर) मसानी हे स्वतंत्र पक्षाचे एक मान्यवर पुढारी होते. त्यांचा जन्म 1905 साली झाला. मिनू मसानी यांना ब्याण्णव वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यात त्यांनी अनेक चढउतार बघितले आणि भारताच्या सार्वजनिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचे वडील सर रुस्तमजी मसानी हे मुंबई महापालिकेचे कमिशनर आणि मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. मिनू मसानी यांचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि नंतर ब्रिटनमध्येच कायदा शाखेत झाले. ते मुंबईत वकिली केल्यावर काँग्रेसच्या असहकार चळवळीत सामील झाले. पुढे मुंबई महापालिकेत निवडून आले आणि मुंबईचे महापौरही झाले. ते ब्राझीलमध्ये भारताचे राजदूत 1948-49 या काळात होते. तेथपर्यंतचा त्यांचा प्रवास सुसंगत दिसतो.
मिनू मसानी नेहरूंसोबत चर्चा करताना
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा लौकिक तेथील डाव्या वळणासाठी आहे. तेथून पदवीधर झालेले मसानी पुढे काँग्रेसमध्ये गेले. तो काळ जवाहरलाल नेहरू यांच्या वर्धिष्णू प्रभावाचा आहे. त्यामुळे मसानी हेही डाव्या विचारसरणीकडे झुकले हे स्वाभाविक होते. त्याच प्रभावातून मिनू मसानी यांनी सोव्हिएट संघराज्याला दोन वेळा भेट दिली. 1927 व 1935 या वर्षी . सोव्हिएट साईडलाईट्स हे 1935 च्या प्रवासाचे वृत्त आहे. त्याच पुस्तकात मसानी यांनी 1927 साली सोव्हिएट संघराज्याला भेट दिली होती त्याचा उल्लेख आला आहे. सोव्हिएट साईडलाईट्स या पुस्तकाला पंडित नेहरू यांची प्रस्तावना आहे.

मी पुस्तक डाउनलोड केले ते प्रवासवर्णन असावे या अंदाजाने. ते तसे आहेही - काही अंशी, पण त्याशिवाय अधिक काही तरी आहे. मसानी यांनी लंडन ते लेनिनग्राड हा प्रवास रशियन बोटीने केला होता. पुस्तकाला सुरुवात होते ती त्या प्रवासाच्या तपशिलांनी. बोटीचे वर्णन, प्रवाशांचे वर्ग - म्हणजे पहिला, दुसरा वगैरे; त्यातील सुखसोयी, बोटीवरील प्रवासी इत्यादी. नंतर त्यांनी मॉस्को, पेट्रोग्राड, बाकू, अर्मेनिया इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. तो त्यांचा प्रवास व ठिकाणे बघणे यांची व्यवस्था Intourist या सोव्हिएट ट्रॅव्हल एजन्सिने केली होती. मात्र, मसानी यांनी त्या प्रवासात केवळ प्रेक्षणीय स्थळे व निसर्गसौंदर्य बघितले नाही तर रशियन क्रांतीनंतरचे तेथील सामान्य लोकांचे जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामागे अर्थात राज्यक्रांतीनंतर तेथील गरीब अशा वर्गाची आर्थिक स्थिती सुधारली आहे का हे बघणे हा प्रधान हेतू होता. त्याबरोबरच साक्षरता वाढली आहे का, विषमता अजून किती आहे, कोर्ट केसेस कशा चालतात - इतकेच काय पण लग्न आणि घटस्फोट कसे व किती होतात, सामायिक शेतीचा प्रयोग, धार्मिक व्यवहार, गुन्हेगारांचे परिवर्तन अशा अनेक गोष्टींची माहिती त्यांनी करून घेतली आणि ती या पुस्तकात सांगितली. त्यामुळेच त्या पुस्तकातील प्रकरणांची शीर्षके वेगळी आहेत.
एका सोव्हिएट बोटीवर, लेनिनग्राड, नवे मॉस्को उभे राहत आहे, मॉस्कोवासी काय खातात, सोविएट न्यायालये आणि वकील, गुन्हेगार होणे किती छान आहे, विवाह आणि फारकत, रोमँटिक बाकू, मी कमीसारला भेटतो, (कमीसार- राजकीय सत्तेतील अधिकारी), अर्मेनियातील सामुदायिक शेती... सारांश, त्या साऱ्या गोष्टी त्यांनी जेमतेम नव्वद पानांत सांगितल्या आहेत. त्यात बरीच आकडेवारी आहे आणि ती सर्व क्रांतीनंतर गोष्टी किती सुधारल्या आहेत हे दाखवणारी आहे. मसानी यांनी भेट दिली तेव्हा रशियन राज्यक्रांतीला अठरा वर्षे झाली होती आणि त्यांची भेट रशियन सरकारच्या ट्रॅव्हल एजन्सीने आखली होती हे लक्षात घेतले, की सामान्य प्रवाशापेक्षा मसानी यांनी वेगळ्या गोष्टी बघितल्या त्याचा उगम समजतो. त्यातील काही विधाने अचंबित करतात.
"प्रत्येक आरोपीला मोफत वकील मिळू शकतो. त्यासाठी त्याची पसंती विचारात घेतली जाते. वकिलांच्या फी इतर ( भांडवलशाही ) देशातल्यासारख्या 'अवास्तव' आणि 'अवाढव्य' नसतात. बऱ्याचशा प्रकरणांत पक्षकार स्वतःच बाजू मांडतात. वकील घेत नाहीत. न्यायाधीश हा व्यावसायिक वकील असतो. त्याने कायद्याची पदवी घेणे आवश्यक असते. तो पगारी नोकर असतो. त्याच्याबरोबर दोन assessor असतात. ते जनसामान्यांचे प्रतिनिधी असतात. "‘लग्न आणि फारकत या प्रकरणात ते सांगतात लग्न आणि विवाहविच्छेद, जन्म आणि मृत्यू यांच्या नोंदी 'रजिस्ट्री' या कचेरीत होतात. एका विभागात लग्न आणि फारकत, दुसऱ्यात जन्म आणि मृत्यू यांच्या नोंदी. एका दिवसात सात ते आठ घटस्फोट आणि पंधरा ते पंचवीस लग्ने यांची नोंद होते. घटस्फोट अगदी तातडीने हवाच आहे असे सांगितले तर तो लगेच दिला जातो. एरवी विवाहविच्छेद टाळण्याचा प्रयत्न केला जातो. स्त्रिया घटस्फोट बहुदा नवऱ्यांच्या अतिरिक्त मद्यपानामुळे मागतात. तर पुरुष बायकोचा व्यभिचार हे कारण सांगतात."
विवाहप्रसंगी तरुण-तरुणी, दोघांचे वय अठरा वर्षे असले पाहिजे असा नियम होता. पुढे, मसानी असेही सांगतात, की त्यांनी टर्किश वूमेन क्लबची संचालिका कादिरबेकोवा हिच्याशी हिंदुस्तानातील शारदा अॅक्ट व त्याच्या निष्प्रभतेबाबत चर्चा केली (Romance in Baku). मात्र येथे ते त्यांच्या पूर्वीच्या माहितीशी विसंगत माहिती (विवाहसमयीचे किमान वय) देतात.
बाकू येथील इस्लामी लोक, त्यांचे मशिदीत जाण्याचे कमी झालेले प्रमाण, बुरखा घालण्याची पद्धत... त्यावरही ते निरीक्षणे नोंदवतात.
सर्व प्रकरणांतून विविध प्रश्नांची तत्कालीन स्थिती ही राज्यक्रांतीपूर्वीच्या स्थितीपेक्षा खूप 'प्रगती'पथावरील होती असे मसानी आकडेवारीनिशी सांगतात. तरीही संपूर्ण प्रशस्ती ते करत नाहीत, काही मर्यादाही सांगतात.
'सारांश' या प्रकरणात ते म्हणतात, "जगाच्या पृष्ठभागाचा सहावा हिस्सा व्यापणाऱ्या त्या देशात गेल्या अठरा वर्षांत जे घडले आहे ते ' एक प्रयोग ' एवढेच मर्यादित नाही. मानवी वंशाच्या इतिहासात आत्तापर्यंत कधी नव्हता इतक्या वेगाने आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ते साध्य झाले आहे. अर्थात त्यामुळे सोविएट युनियनमध्ये स्वर्ग आला आहे असे म्हणता येणार नाही. कारण भांडवलशाही जगात संपूर्ण समाजवादी समाजरचना करता येईल का नाही याची शंका आहे. काही लोक म्हणतात, की "रशियात विषमता आहे. रशियाने सरकारी भांडवलशाही स्वीकारली आहे."विषमता आहे हे मान्य आहे आणि ती तशी नजरेत भरण्यासारखीही आहेत. मात्र जगातील इतर देशांपेक्षा ती कमी आहे . "  तशीच काही अन्य विधानेही ते करतात.
त्यांना एका समारंभात गॅलरीत ट्रॉटस्कीचे चित्र नाही हे बघून त्यांना आश्चर्य वाटले . ते म्हणतात " सर्व चित्रांत ट्रॉटस्की कोठे होता? Red Army चा संस्थापक कोठे होता? मी माझ्या एका बुद्धिजीवी मित्राला विचारले, हा असा क्षुल्लक पद्धतीने सूड घेणे कशासाठी? तो म्हणाला, ट्रॉट्स्की हा क्रांतिकारी विरोधक झाला. क्रांतीबाबत केलेल्या सर्व कामावर त्याने पाणी फिरवले . म्हणून वस्तुनिष्ठपणे तो कधीच अस्तित्वात नव्हता.
मला वाटते, वस्तुनिष्ठपणे तो शब्द इतका विपर्यस्त पद्धतीने कधीच वापरला गेला नव्हता. इतक्या डाव्या वळणाचे मिनू मसानी उजवीकडे वळले ते स्टॅलिनच्या शुद्धिकरणाच्या मोहिमेनंतर. ती बातमीच जगाला उशिरा समजली. त्यांनी टीका 1938 मध्ये केली - जनसामान्यांची एकाधिकारशाही संपली व व्यक्तीची एकाधिकारशाही सुरू झाली. त्यावर काँग्रेस वर्तुळात निषेध झाला. परंतु मसानी उजवीकडे झुकले ते झुकलेच. त्यांनी चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि प्रा. रंगा यांच्या बरोबर स्वतंत्र पक्षाची स्थापना 1959 मध्ये केली. स्वतंत्र पक्षाला विरोधी पक्षनेतेपदाचा मानही 1967 च्या निवडणुकीनंतर मिळाला. पक्षाला ओहोटी 1971 नंतर लागली आणि तो भारतीय लोक दलात विलीन 1974 मध्ये झाला. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने आणखी एकदोन गोष्टी नोंदण्यास हव्यात.
पंडित नेहरू यांनीसुद्धा सोव्हिएट संघराज्याला भेट 1927 साली दिली होती. निमित्त रशियान क्रांतीला दहा वर्षे पुरे झाल्याचे. नेहरूंच्या बरोबर त्यांची पत्नी व बहीण (विजयालक्ष्मी?) याही होत्या. त्यांनी त्या दौऱ्यानंतर एक पुस्तकही लिहिले आहे “Soviet Russia - Some Random Sketches and Impressions “ते प्रसिद्ध 1929 साली झाले. तो एक लेखसंग्रह आहे. त्यात त्यांनी काही निरीक्षणे दिली आहेत, ''मॉस्कोमध्ये सोळाशे चर्चेस होती. तेथे जरी धर्माविरुद्ध प्रचार हिरीरीने करणाऱ्या संस्था आहेत, तरी चर्चला जाणाऱ्या लोकांच्या आड कोणी येत नाही. फक्त चर्चच्या दाराशी भिंतीवर लिहून ठेवले होते - धर्म ही लोकांसाठी अफू आहे '' ते आणखीही सांगतात, की रस्त्यांवर खासगी गाड्या नव्हत्या. त्याशिवाय त्यांनी एक चित्रपट बघितला. ते लिहितात -  ''आम्ही चित्रपट बघितला, The last days of Petrograd हिंदुस्तानात आम्हाला सुंदर आणि कलात्मक चित्रपट बघण्यास मिळत नाहीत. आम्हाला खात्रीपूर्वक बघण्यास मिळतात ते भपकेदार पण मूर्ख आणि निरर्थक असे हॉलिवूडचे चित्रपट.'' येथे लक्षात घ्यायला हवे, की नेहरू 1927 सालच्या चित्रपटांबद्दल आणि परकीय सत्तेच्या खाली भरडलेल्या लोकांनी बनवलेल्या चित्रपटांबद्दल / न बनू शकणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलत आहेत. तेव्हा तो शेरा पूर्वग्रहामुळे आला असे म्हणण्यास हवे. म्हणजे काही एका मर्यादेपर्यंत मसानी आणि पंडितजी यांच्या लेखनाची प्रेरणा समान दिसते. मसानी यांनी जशी काही निरीक्षणे राज्यक्रांतीच्या मर्यादा दाखवणारी नोंदवली आहेत, तसे एक विधान पंडितजीही करतात - ''कम्युनिस्ट त्यांचा उपदेश करण्याची एकही संधी चुकवत नाहीत.''
पंडितजींच्या पुस्तकाच्या एका प्रकरणात ते म्हणतात - ''व्यक्तीच्या मनावर उमटलेला ठसा हा चित्रणाचा विश्वासू साथीदार कधीच नसतो. ''मात्र त्या वैशिष्ट्याचा वावर - म्हणजे वैयक्तिक ठशांचा - त्यांच्याही लिखाणात आहेच. उलट, मसानी यांच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना ते म्हणतात - ''अभ्यासकांना बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. परंतु सर्वसामान्यांना सोव्हिएट रशियामधील दैनंदिन जीवन पाहून लिहिलेले हलकेफुलके पुस्तक अधिक विचारप्रवृत्त करेल. पंडितजी आणि मसानी दोघांचा अधिक परिचय करून घेण्यास ही दोन्ही पुस्तके प्रवृत्त करून घेतील असे निश्चित वाटते.
- रामचंद्र वझे 9820946547
रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी 'बँक ऑफ इंडिया'मध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. मुकुंद वझे यांची 'शेष काही राहिले', 'क्‍लोज्ड सर्किट', 'शब्‍दसुरांच्‍या पलिकडले' आणि 'टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर' ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे 'महाराष्‍ट्र टाईम्‍स' आणि 'लोकसत्ता' या दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

रा.गो. भांडारकर - क्रियाशील सुधारक (Great Scholar R.G. Bhandarkar)


रामकृष्ण भांडारकर
रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि कर्ते धर्म व समाजसुधारक होते. त्यांचे मूळ आडनाव पत्की होते. त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते. म्हणून त्यांना भांडारकरहे नाव पडले. त्यांचे आजोबा लाडो विठ्ठल हे शिरस्तेदार म्हणून इंग्रजीत पुढे आले. त्यांचे वडील महसूल खात्यात होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव रमाबाई. त्यांचे चुलते विनायक भांडारकर हे पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते व क्रियाशील सुधारक होते. भांडारकर घराणे हे मूळ वेंगुर्ल्याचे. तेथील त्यांच्या वास्तूत रमा-गोपाळ कन्याशाळा आहे.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही पुणे शहरातील ऐतिहासिक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. ती पुण्यातील भांडारकर रस्त्यावर (विधी महाविद्यालय रस्ता) आहे. संस्थेची स्थापना रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने 6 जुलै 1917 रोजी करण्यात आली. ती संस्था भारतातील प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था गणली जाते. त्या संस्थेत अंदाजे सव्वा लाख प्राचीन दुर्मीळ ग्रंथ; तसेच, तीस हजार हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत.
भांडारकर यांचा जन्म मालवणमध्ये 6 जुलै 1837 रोजी झाला. त्यांचे आरंभीचे काही शिक्षण मालवण, राजापूर व रत्नागिरी येथे झाले. त्यानंतर ते मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमधून शिकले. ते हायस्कूलची परीक्षा 1854 साली उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी त्या इन्स्टिट्यूट कॉलेजचा अभ्यासक्रमही 1858 साली पूर्ण केला. पुढे, ते मुंबई विद्यापीठातून बी ए (1862) व एम ए (1863) या परीक्षांत उत्तीर्ण झाले. ते संस्कृतचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये 1879 पर्यंत होते. त्यांनी मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र व सिंडिकेटचे सदस्य म्हणून कामगिरी बजावली. ते नंतर कुलगुरु झाले. त्यांनी हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट कार्य हैदराबाद (सिंध) व रत्नागिरी येथे केले आहे. त्याच ओघातील त्यांचे वेगळे कार्य म्हणजे त्यांनी संस्कृतची दोन शालेय पाठ्यपुस्तके तयार केली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना संस्कृत शिकता आले. त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणूनही नोकरी केली. ते सेवानिवृत्त 1893 मध्ये झाले.
त्यांनी संस्कृतचा व्यासंग पुढे चालूच ठेवला. त्यांनी मुंबई व पुणे येथील जुन्या विद्वान शास्त्रीपंडितांजवळ न्याय, व्याकरण, वेदांत इत्यादींचा चांगला अभ्यास केला. भांडारकर यांनी संस्कृतच्या अभ्यासाला चिकित्सक व निःपक्षपाती संशोधनाचे स्वरूप दिले. त्यांचा निबंध लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत 1874 साली वाचला गेला. तो नासिकच्या शिलालेखांसंबंधी होता. जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाने त्यांना पी एचडी 1885 मध्ये दिली. व्हिएन्ना येथे काँग्रेस ऑफ ओरिएंटॅलिस्टस1886 साली भरली होती. भांडारकर तिला भारतीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. त्यांना एल एल डी ही पदवी 1904 मध्ये मिळाली. जगप्रसिद्ध संस्थांनी भांडारकर यांना सदस्यत्व दिले होते. त्यामध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी’, लंडन व मुंबई, ‘जर्मन ओरिएंटल सोसायटी’, ‘अमेरिकन ओरिएंटल सोसायटीइटली येथील एशियाटिक सोसायटी’, सेंट पीटर्सबर्ग येथील इंपिरियल अॅकॅडमी ऑफ सायन्सअशांचा समावेश आहे. त्यांनी संस्कृत हस्तलिखितांसंबंधी संशोधनात्मक लेख लिहिले व प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी प्राचीन गृह्यसूत्रादी संस्कारमंत्रांतील जरूर तेवढाच भाग घेऊन उपनयन, लग्नादि गृह्यसंस्कारसमयी उपयोगी पडणारा संस्कारविधीतयार केला; भक्तिपर कविता आणि पदे रचली.
धर्म हा भांडारकर यांच्या आस्थेचा व चिंतनाचा विषय होता. त्यांनी सामाजिक सुधारणांना धर्माचा व नीतीचा आधार दिला. त्यांनी परमहंस सभा आणि प्रार्थना समाज या संस्थांमार्फत अनेक वादग्रस्त विषयांवरील चर्चेत यशस्वी हस्तक्षेप केलेला दिसतो. प्रार्थना समाजाच्या सामुदायिक प्रार्थना आणि सामाजिक सुधारणेचा कार्यक्रम यांवर पुणे येथील ‘केसरी पत्रात चौफेर हल्ला करण्यात आला. त्यावर भांडारकर यांनी त्यांच्या धर्मपर लेखांत समर्पक अशी उत्तरे दिली. केसरीकारांचा आक्षेप प्रार्थना समाज हे ख्रिश्चन धर्माचे अनुकरण आहे असा होता. प्रार्थनेस प्रार्थना समाजाच्या पुरुषांबरोबर महिलाही सुरेख वेशभूषा करून उपस्थित राहतात. केसरीने अशी टिंगल केली होती. भांडारकर यांनी त्या आक्षेपास चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी सामुदायिक भजनपूजन आणि स्त्रीपुरुष यांचा एकत्र मेळावा या गोष्टी हिंदू धर्मालाही मान्य व हिंदू धर्मात प्रचलित आहेत असे सांगून अनुकरणाचा आरोप खोडून काढला.
ते व्हाइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य 1903 मध्ये होते. ते प्रांतिक लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्येही 1904-08 या कालखंडात होते. त्यांना दिल्ली येथे भरलेल्या दरबारप्रसंगी सरहा किताब 1911 मध्ये देण्यात आला. त्यांची वृत्ती नेमस्त होती. त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या कार्याला सर्वांगीण साथ दिली व रानडे यांच्या मृत्यूनंतरही प्रार्थना समाज वगैरे संस्थांची धुरा वाहिली. त्यांनी उक्ती व कृती यांचा मेळ घालण्याचा जीवनात अविरत प्रयत्न केला.
त्यांची अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन (1884), ‘वैष्णविझम’, ‘शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स (1913), ‘ए पीप इन टु द अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया (1920), कलेक्टेड वर्क्स ऑफ आर. जी. भांडारकर (1933) इत्यादी विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. एवढेच नव्हे, तर प्राचीन भारताचा इतिहास सुसंगत पुराव्यांच्या आधारे शोधून कसा काढावा, ऐतिहासिक घटनांचा अर्थ प्रमाणशुद्ध कसा लावावा याचा उत्कृष्ट नमुना त्यांच्या ऐतिहासिक लेखनात सापडतो. त्यामुळे त्यांचे ग्रंथ हे भारताच्या प्राचीन इतिहासाचे आधारभूत ग्रंथ म्हणून स्वीकारले जातात. त्यांनी मालती-माधव या संस्कृत ग्रंथाचे संपादन केले.
त्यांनी हिंदू धर्म वेळोवेळी कसा बदलत गेला आहे, वैदिक धर्माबरोबरच वेदिकेतर शैव, वैष्णव इत्यादी धार्मिक संप्रदाय कसे निर्माण झाले याचे विवरण केले. धर्म हा मानवांच्या हृदयांतून वेळोवेळी प्रकट होतो, त्याला शब्दप्रामाण्याची गरज नसते, मनुष्याच्या शुद्ध हृदयाला शब्दप्रामाण्यावाचून धार्मिक अनुभव प्राप्त होत असतो, हा विचार ब्राह्मो समाजामध्ये प्रथम मांडला गेला. त्याचे सविस्तर तात्त्विक समर्थन भांडारकर यांनी त्यांच्या लेखांद्वारे केले आहे. त्याला त्यांनी संस्कृतमधील आणि मराठीमधील धार्मिक साहित्याची बैठक प्राप्त करून दिली आहे. भांडारकर कीर्तनेही करत. त्यांचा पुराणांचा अभ्यास गाढा होता. पुराणांतही ग्राह्यांश पुष्कळ आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. त्यांचा पाली, अर्धमागधी भाषांचा अभ्यासही उत्तम होता. त्यांनी बौद्ध धर्मावर स्वतंत्र व चिकित्सक प्रकाश टाकलेला आहे.
भांडारकर यांनी त्यांचे ग्रंथ व संशोधन पत्रिका हे अनमोल साहित्य प्राच्यविद्या संशोधन मंदिरास देणगी दिल्यामुळे, ती महत्त्वाची संस्था उभी राहिली. पुण्या-मुंबईच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी’, ‘शिक्षणप्रसारक मंडळ’, ‘फीमेल एज्युकेशन सोसायटी’, ‘सेवासदन इत्यादी शैक्षणिक संस्थांना त्यांच्या ज्ञानाचा व दातृत्वाचा लाभ झाला. त्यांचे निधन 24 ऑगस्ट 1925 रोजीवयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी पुणे येथे झाले. ते व त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा यांना एकूण तीन मुलगे व दोन कन्या अशी अपत्ये होती. द्वितीय पुत्र डॉ. देवदत्त हेही विद्वान आणि संशोधक म्हणून मान्यता पावले. रामकृष्ण भांडारकर यांच्या अस्थी पुणे प्रार्थना समाजाच्या प्रांगणात एका स्तूपाखाली ठेवण्यात आल्या आहेत.
- (संकलित - मुख्य स्रोत - विश्वकोश)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------