प्रार्थना क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा
प्रार्थना क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

रा.गो. भांडारकर - क्रियाशील सुधारक (Great Scholar R.G. Bhandarkar)


रामकृष्ण भांडारकर
रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि कर्ते धर्म व समाजसुधारक होते. त्यांचे मूळ आडनाव पत्की होते. त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते. म्हणून त्यांना भांडारकरहे नाव पडले. त्यांचे आजोबा लाडो विठ्ठल हे शिरस्तेदार म्हणून इंग्रजीत पुढे आले. त्यांचे वडील महसूल खात्यात होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव रमाबाई. त्यांचे चुलते विनायक भांडारकर हे पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते व क्रियाशील सुधारक होते. भांडारकर घराणे हे मूळ वेंगुर्ल्याचे. तेथील त्यांच्या वास्तूत रमा-गोपाळ कन्याशाळा आहे.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही पुणे शहरातील ऐतिहासिक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. ती पुण्यातील भांडारकर रस्त्यावर (विधी महाविद्यालय रस्ता) आहे. संस्थेची स्थापना रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने 6 जुलै 1917 रोजी करण्यात आली. ती संस्था भारतातील प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था गणली जाते. त्या संस्थेत अंदाजे सव्वा लाख प्राचीन दुर्मीळ ग्रंथ; तसेच, तीस हजार हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत.
भांडारकर यांचा जन्म मालवणमध्ये 6 जुलै 1837 रोजी झाला. त्यांचे आरंभीचे काही शिक्षण मालवण, राजापूर व रत्नागिरी येथे झाले. त्यानंतर ते मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमधून शिकले. ते हायस्कूलची परीक्षा 1854 साली उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी त्या इन्स्टिट्यूट कॉलेजचा अभ्यासक्रमही 1858 साली पूर्ण केला. पुढे, ते मुंबई विद्यापीठातून बी ए (1862) व एम ए (1863) या परीक्षांत उत्तीर्ण झाले. ते संस्कृतचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये 1879 पर्यंत होते. त्यांनी मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र व सिंडिकेटचे सदस्य म्हणून कामगिरी बजावली. ते नंतर कुलगुरु झाले. त्यांनी हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट कार्य हैदराबाद (सिंध) व रत्नागिरी येथे केले आहे. त्याच ओघातील त्यांचे वेगळे कार्य म्हणजे त्यांनी संस्कृतची दोन शालेय पाठ्यपुस्तके तयार केली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना संस्कृत शिकता आले. त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणूनही नोकरी केली. ते सेवानिवृत्त 1893 मध्ये झाले.
त्यांनी संस्कृतचा व्यासंग पुढे चालूच ठेवला. त्यांनी मुंबई व पुणे येथील जुन्या विद्वान शास्त्रीपंडितांजवळ न्याय, व्याकरण, वेदांत इत्यादींचा चांगला अभ्यास केला. भांडारकर यांनी संस्कृतच्या अभ्यासाला चिकित्सक व निःपक्षपाती संशोधनाचे स्वरूप दिले. त्यांचा निबंध लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत 1874 साली वाचला गेला. तो नासिकच्या शिलालेखांसंबंधी होता. जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाने त्यांना पी एचडी 1885 मध्ये दिली. व्हिएन्ना येथे काँग्रेस ऑफ ओरिएंटॅलिस्टस1886 साली भरली होती. भांडारकर तिला भारतीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. त्यांना एल एल डी ही पदवी 1904 मध्ये मिळाली. जगप्रसिद्ध संस्थांनी भांडारकर यांना सदस्यत्व दिले होते. त्यामध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी’, लंडन व मुंबई, ‘जर्मन ओरिएंटल सोसायटी’, ‘अमेरिकन ओरिएंटल सोसायटीइटली येथील एशियाटिक सोसायटी’, सेंट पीटर्सबर्ग येथील इंपिरियल अॅकॅडमी ऑफ सायन्सअशांचा समावेश आहे. त्यांनी संस्कृत हस्तलिखितांसंबंधी संशोधनात्मक लेख लिहिले व प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी प्राचीन गृह्यसूत्रादी संस्कारमंत्रांतील जरूर तेवढाच भाग घेऊन उपनयन, लग्नादि गृह्यसंस्कारसमयी उपयोगी पडणारा संस्कारविधीतयार केला; भक्तिपर कविता आणि पदे रचली.
धर्म हा भांडारकर यांच्या आस्थेचा व चिंतनाचा विषय होता. त्यांनी सामाजिक सुधारणांना धर्माचा व नीतीचा आधार दिला. त्यांनी परमहंस सभा आणि प्रार्थना समाज या संस्थांमार्फत अनेक वादग्रस्त विषयांवरील चर्चेत यशस्वी हस्तक्षेप केलेला दिसतो. प्रार्थना समाजाच्या सामुदायिक प्रार्थना आणि सामाजिक सुधारणेचा कार्यक्रम यांवर पुणे येथील ‘केसरी पत्रात चौफेर हल्ला करण्यात आला. त्यावर भांडारकर यांनी त्यांच्या धर्मपर लेखांत समर्पक अशी उत्तरे दिली. केसरीकारांचा आक्षेप प्रार्थना समाज हे ख्रिश्चन धर्माचे अनुकरण आहे असा होता. प्रार्थनेस प्रार्थना समाजाच्या पुरुषांबरोबर महिलाही सुरेख वेशभूषा करून उपस्थित राहतात. केसरीने अशी टिंगल केली होती. भांडारकर यांनी त्या आक्षेपास चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी सामुदायिक भजनपूजन आणि स्त्रीपुरुष यांचा एकत्र मेळावा या गोष्टी हिंदू धर्मालाही मान्य व हिंदू धर्मात प्रचलित आहेत असे सांगून अनुकरणाचा आरोप खोडून काढला.
ते व्हाइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य 1903 मध्ये होते. ते प्रांतिक लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्येही 1904-08 या कालखंडात होते. त्यांना दिल्ली येथे भरलेल्या दरबारप्रसंगी सरहा किताब 1911 मध्ये देण्यात आला. त्यांची वृत्ती नेमस्त होती. त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या कार्याला सर्वांगीण साथ दिली व रानडे यांच्या मृत्यूनंतरही प्रार्थना समाज वगैरे संस्थांची धुरा वाहिली. त्यांनी उक्ती व कृती यांचा मेळ घालण्याचा जीवनात अविरत प्रयत्न केला.
त्यांची अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन (1884), ‘वैष्णविझम’, ‘शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स (1913), ‘ए पीप इन टु द अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया (1920), कलेक्टेड वर्क्स ऑफ आर. जी. भांडारकर (1933) इत्यादी विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. एवढेच नव्हे, तर प्राचीन भारताचा इतिहास सुसंगत पुराव्यांच्या आधारे शोधून कसा काढावा, ऐतिहासिक घटनांचा अर्थ प्रमाणशुद्ध कसा लावावा याचा उत्कृष्ट नमुना त्यांच्या ऐतिहासिक लेखनात सापडतो. त्यामुळे त्यांचे ग्रंथ हे भारताच्या प्राचीन इतिहासाचे आधारभूत ग्रंथ म्हणून स्वीकारले जातात. त्यांनी मालती-माधव या संस्कृत ग्रंथाचे संपादन केले.
त्यांनी हिंदू धर्म वेळोवेळी कसा बदलत गेला आहे, वैदिक धर्माबरोबरच वेदिकेतर शैव, वैष्णव इत्यादी धार्मिक संप्रदाय कसे निर्माण झाले याचे विवरण केले. धर्म हा मानवांच्या हृदयांतून वेळोवेळी प्रकट होतो, त्याला शब्दप्रामाण्याची गरज नसते, मनुष्याच्या शुद्ध हृदयाला शब्दप्रामाण्यावाचून धार्मिक अनुभव प्राप्त होत असतो, हा विचार ब्राह्मो समाजामध्ये प्रथम मांडला गेला. त्याचे सविस्तर तात्त्विक समर्थन भांडारकर यांनी त्यांच्या लेखांद्वारे केले आहे. त्याला त्यांनी संस्कृतमधील आणि मराठीमधील धार्मिक साहित्याची बैठक प्राप्त करून दिली आहे. भांडारकर कीर्तनेही करत. त्यांचा पुराणांचा अभ्यास गाढा होता. पुराणांतही ग्राह्यांश पुष्कळ आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. त्यांचा पाली, अर्धमागधी भाषांचा अभ्यासही उत्तम होता. त्यांनी बौद्ध धर्मावर स्वतंत्र व चिकित्सक प्रकाश टाकलेला आहे.
भांडारकर यांनी त्यांचे ग्रंथ व संशोधन पत्रिका हे अनमोल साहित्य प्राच्यविद्या संशोधन मंदिरास देणगी दिल्यामुळे, ती महत्त्वाची संस्था उभी राहिली. पुण्या-मुंबईच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी’, ‘शिक्षणप्रसारक मंडळ’, ‘फीमेल एज्युकेशन सोसायटी’, ‘सेवासदन इत्यादी शैक्षणिक संस्थांना त्यांच्या ज्ञानाचा व दातृत्वाचा लाभ झाला. त्यांचे निधन 24 ऑगस्ट 1925 रोजीवयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी पुणे येथे झाले. ते व त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा यांना एकूण तीन मुलगे व दोन कन्या अशी अपत्ये होती. द्वितीय पुत्र डॉ. देवदत्त हेही विद्वान आणि संशोधक म्हणून मान्यता पावले. रामकृष्ण भांडारकर यांच्या अस्थी पुणे प्रार्थना समाजाच्या प्रांगणात एका स्तूपाखाली ठेवण्यात आल्या आहेत.
- (संकलित - मुख्य स्रोत - विश्वकोश)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मंगळवार, २ जून, २०२०

दुबईतील ईद झाली व्हर्च्युअल (Dubai, Id Goes Virtual)

जगभर कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. लोकांना त्याच्या बातम्या, हकिकती वर्तमानपत्रे, टीव्ही आणि समाजमाध्यमे यांवरून कळतात. पण त्या सर्वांवर वाचक/प्रेक्षकांचा विश्वास बसतो असे नव्हे. भारतातील हकिकती आपल्याला अन्य विविध मार्गांनीही कळत असतात. परदेशस्थ जी मराठी मंडळी आहेत त्यांना स्थानिक परिस्थितीचा प्रत्यय आगळा येत असावा. तो थिंकच्या वाचकांपर्यंत पोचवावा म्हणून आम्ही प्रत्यक्ष परिस्थिती अनुभवातून लिहिण्याबाबत वेगवेगळ्या देशातील लोकांना सुचवत आहोत. या संयोजनाची जबाबदारी संध्या जोशी सांभाळत आहेत.

          या पद्धतीने प्राप्त झालेले विनीता वेल्हाणकर (इंग्लंड), अनघा गोडसे (ऑस्ट्रेलिया), रूपा जोशी(जपान), सोनाली जोग आणि अमेय वेल्हाणकर (इंग्लंड) यांचे अनुभव प्रसिद्ध केले आहेत. सोबत दुबई आणि इस्रायलचे अनुभव प्रसिद्ध करत आहोत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
दुबईतील ईद झाली व्हर्च्युअल (Dubai, Id Goes Virtual)

प्रिया सहानी परिवारासोबत
दुबईत बंधुभाव वाढवणारा ईद उल फितर हा सर्वात मोठा उत्सव, जसा महाराष्ट्रात दिवाळी किंवा गणपतीचा सण. रमझानच्या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात. दुबईतील रमझानचा महिना म्हणजे शॉपिंग मॉल्समध्ये भव्य सेल्स, भव्य इफ्तारचे डिनर मेळावे, मस्जिदीत दररोज प्रार्थना, चॅरिटी आणि दानधर्म.
          मी 2019 ला प्रथम रमझानमध्ये दुबईला आले. तेव्हा ईद सेलिब्रेशनचा पहिल्यांदा अनुभव घेतला. मी एका मित्राच्या घरी ईद साजरी केली. त्यांच्या घरी आम्ही पंधरा-वीस मित्र-बांधव मिळून खूप मज्जा केली; गप्पा मारल्या; बिर्याणी, शीर-कुर्मा (रमझान स्पेशल खिरीचा प्रकार), मिठाई आणि चॉकलेट्सवर ताव मारला. परंतु या वर्षी कोरोनामुळे ईद आणि रमझान सणाचे एकदम वेगळे रूप दिसून आले. रमझानच्या आधी एक महिनाभर दुबईत चोवीस तास लॉकडाऊन होते. फक्त आवश्यक कारणासाठी घराबाहेर फिरणे; तेसुद्धा ऑनलाइन परमिटद्वारेच शक्य होते. लॉकडाऊनचा कालावधी दुबईचे प्रशासन व लोक यांनी कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्याची क्षमता वाढवण्यासाठी वापरला. पूर्ण दुबईचे अनेक वेळा निर्जंतुकीकरण केले गेले. मोटारीतून जाऊन कोरोना व्हायरसची चाचणी करणारी केंद्रे चोवीस तास चालू होती. त्याशिवाय घरी येऊन तपासणी करण्यासाठी फिरती प्रयोगशाळा उपलब्ध करुन देण्यात आली होती. दुबई हा जगातील सर्वाधिक कोरोना व्हायरस चाचण्या (लोकसंख्येच्या तुलनेत) करणाऱ्या देशांपैकी एक आहे. दुबईमध्ये दर दहा लोकांच्या मागे दोन लोकांच्या कोरोना व्हायरस चाचण्या केल्या गेल्या आहेत (भारतामध्ये सध्या एक हजार लोकांच्या मागे दोन चाचण्या केल्या जात आहेत). कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळवण्यासाठी दुबईने तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. दुबई पोलिस लोकांची थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी 'स्मार्ट हेल्मेट'चा वापर करत आहेत. डॉक्टरांच्या हाताखाली वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या (पॅरामेडिकल)सुरक्षिततेसाठी 'सेल्फ सॅनिटाईझेशन वॉक' साधने देखील उपलब्ध केली गेली. तेथे फक्त वीस सेकंदात लोकांच्या कपड्यांना निर्जंतुक केले जाते.
बंगळोर आयआयएमच्या दीक्षांत समारोहप्रसंगी
दुबईने रमझानच्या सुरुवातीला लॉकडाऊन किंचित शिथिल केला; तीस टक्के दुकाने आणि रेस्टॉरंट्स उघडली गेली. एका कुटुंबातील पाचपर्यंत लोकांना एकत्र भेटून खाण्याची आणि प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात आली. परंतु मशिदींमध्ये एकत्रित प्रार्थना करण्यास परवानगी नव्हती. रमझान आणि ईद दरम्यान मशिदी बंदच राहिल्या.
साठ वर्षांवरील लोक आणि बारा वर्षांखालील मुलांना मात्र बाहेर फिरायला सतत मनाई आहे. लॉकडाऊनच्या एकूण परिस्थितीचा परिणाम वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा झाला आहे. माझ्या ऑफिसमधील एका सहकाऱ्याला नुकतीच मुलगी झाली. ती त्याच्या मुलीची पहिली ईद होती. त्यांनी ती ईद त्यांच्या मुली आणि बायको यांच्याबरोबर घरीच साजरी केली. त्यांनी मॉलमध्ये जाऊन नवीन कपडे आणि भेटवस्तू घेण्याऐवजी अॅमेझॉनवर शॉपिंग केले. 'ईद नेहमीपेक्षा वेगळी असली तरीही कुटुंबासमवेत घालवलेल्या वेळामुळे ती अधिक चांगली वाटली' असे त्याने मला सांगितले. परंतु माझ्या दुसर्‍या मित्राला रमझान हा सन एकट्यानेच साजरा करावा लागला. त्यांची पत्नी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या मुलाच्या बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी भारतात गेली होती. ती विमानसेवा बंद असल्याने भारतातच अडकून पडली. तो ईदच्या दिवशी, त्याच्या चुलतभावाच्या घरी गेला आणि त्याने त्यांच्या कुटुंबीयांसह ईद साजरी केली.
          सध्याच्या कोविद-19 परिस्थितीत धार्मिक उत्सवांमध्ये कसा बदल होईल ह्याचे उदाहरण दुबईतील ईद सण ज्या तऱ्हेने साजरा झाला त्यामुळे कळले. ईदिया म्हणजे ईदच्या दिवशी लहान मुलांना दिलेले पैसे/भेटवस्तू. ती कोरोना काळात 'व्हर्च्युअल' बनली; शुभेच्छा एकत्र भेटून देण्याऐवजी झूम कॉलच्याद्वारे दिल्या गेल्या, लोकांनी मशिदीत जाण्याऐवजी कुटुंबासमवेत घरीच प्रार्थना केल्या. या बदललेल्या पद्धतींचा परिणाम दीर्घकाळ होत राहील अशी शंका काही समाजचिंतकांना वाटते. समाजाच्या गरजेनुसार धार्मिक सण आणि उत्सव वर्षानुवर्षे बदलत आलेले आहेतच. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी गणेशोत्सव सार्वजनिक केला होता. पण महाराष्ट्रात त्या गणेशोत्सवाचे स्वरूप काळाच्या ओघात किती बदलले! लोकांचे सण कोरोनाव्हायरसमुळे डिजिटलाइझ होणार का? हे वेळच सांगेल. पण सणांमधील आनंद आणि नात्यांमधील ओलावा अशा अडचणींमुळे कधीच कमी होऊ शकणार नाही.
- प्रिया सहानी priyasahani101@gmail.com
प्रिया सहानी या मूळ मुंबुईतील दादरच्या. त्यांनी बंगळोर आयआयएममधून एमबीए केले आहे. त्यांनी शैक्षणिक कारकीर्दीमध्ये सतत अव्वल दर्जा मिळवला. त्या दुबईतील इवाय पार्थीनॉन कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्यांना पर्यटनाची व खाद्यपदार्थ बनवण्याची हौस आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
इस्रायल: धर्मांधतेची बाधा
मोजेस चांडगावकर त्यांच्या मुलासोबत
इस्रायल या राष्ट्रामध्ये नव्वद लाख जनता आहे. ह्या राष्ट्राचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे.  वर्षभरात लाखो स्त्री-पुरुष परदेशी जातात. तसेच, इतर राष्ट्रांमधूनही लाखो लोक पर्यटक म्हणून इस्रायलमध्ये येत असतात. इस्रायलमध्ये कोरोनासदृश्य परिस्थिती निर्माण होताच बाहेर देशांमधून आलेल्या लोकांना दोन आठवडे अलिप्त ठेवण्यात आले. त्यांची तपासणी पंधरा दिवसांनंतर करण्यात येत होती. सबंध इस्रायलमध्ये पंधरा मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यांना चेहऱ्यावर मास्क आणि हातमोजे घातल्याशिवाय बाहेर पडता येत नसे. इटली, स्पेन, फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका इत्यादी देशांत या विषाणूची लागण होऊन हजारो माणसे मृत्युमुखी पडत आहेत, हे लोकांना कळत होते. इस्रायल प्रशासन कोरोनापासून दूर राहण्यासाठी आरोग्य विभाग आणि पोलीस खात्याकडून सतत काळजी घेत आहे. त्याला जनतेची चांगली साथ मिळत आहे.
          तेथे यहुदी (धर्मपंथ) लोक आहेत. त्यांनी प्रथम कोरोनाकडे दुर्लक्ष केले. ज्या गावात रब्बाय लोक राहतात, तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. इस्रायलमध्ये धार्मिक पुजारी लोक आहेत, त्यांना रब्बाय म्हटले जाते किंवा मराठीमध्ये दाती असेही म्हणतात. त्यांनी खूप गोंधळ घातला होता. ते तेथील मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करू नका, असे सांगितले तरी एकत्र जमत होते. सरकारने त्यांच्यावर इतकी कठोर कारवाई केली; की त्या मशिदी, प्रार्थना मंदिरे बंद करून टाकली. तरीसुद्धा ते लोक जुमानत नव्हते. पण सरकारने खूप कठोर अॅक्शन घेतली. धर्मांधता किती असावी त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
          इस्रायलचे आकाश आता मोकळे झाले आहे. तेथे शाळा, ऑफिसेस, सिनेबॉक्स सर्वकाही सुरू झाले आहे. त्यामुळे तेथे आता आनंदी आनंद आहे.
 मायबोली स्नेह संमेलनात माधव गडकरी
भाषण करताना शेजारी बसलेले
मोजेस चांडगावकर व फ्लोरा सॅम्युअल
- मोजेस चांडगावकर, yosefyosefa@yahoo.com
मोजेस चांडगावकर हे इस्रायलमध्ये पंचेचाळीस वर्षांपासून राहत आहेत. ते इस्रायलमधील रांमले या गावात राहतात. ते मूळ भारतीय मराठी भाषिक बेने इस्रायल ज्यू आहेत. त्यांचे मूळ गाव खालापूर आहे. त्यांनी पनवेल येथे तहसीलदार म्हणून काही वर्षे नोकरी केली. ते हिब्रू भाषेसोबत मराठी उत्तम बोलू आणि लिहू शकतात. त्यांचा जेरुसलेम येथे 1996 मध्ये भरलेल्या 'जागतिक मराठी परिषदे'मध्ये सहभाग होता. त्यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्रावर अत्यंत प्रेम असल्यामुळे मायबोली या मराठी मासिकाचे कार्य केले. मायबोली हे मासिक इस्रायलमध्ये मराठीत प्रकाशित होते. त्यांना लोकमान्य समाजसेवक ही पदवी दिली गेली आहे. त्यांची मराठीत पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ठाणे येथील इव्हस असोसिएशनतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या 'शायली' या मासिकामध्ये त्यांचे लेख प्रकाशित होतात. 
 
 
 
 
 
 
मोजेस चांडगावकर यांनी लिहिलेले पुस्तकमोजेस चांडगावकर यांच्या पत्नी सिपूरा चांडगावकरशायली मासिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होत असते.


             ----------------------------------------------------------------------------------------------------------

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

अठराव्या शतकातील सुंता विधी! (Sunta Ritual Eighteenth Century)

 


अल्तापहुसेन रमजान नबाब यांचा सुंता विधीबाबतचा लेख थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर वाचून एक किस्सा लिहावासा वाटला. हिंदुस्थानी माणसाने इंग्रजीत लिहिलेले पहिले पुस्तक आयर्लंडमध्ये अठराव्या शतकाअखेरीस प्रकाशित झाले (1794). साके दीन महोमेत या भारतीय माणसाने ते पुस्तक लिहिले होते. तो ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत कॅम्प फॉलोअर या हुद्यावर काम करत होता. ते पुस्तक पत्ररूपात आहे. त्यातील एक पत्र सुंता या विधीवर आहे.

पत्र 12 महोदय,

मला माझा एक मुस्लिम नातेवाईक मिरवणुकीनंतर काही दिवसांनी भेटला. त्याने मला विनंती केली, की त्याच्या मुलाच्या सुंता समारंभाला मी हजर राहवे. तो समारंभ म्हणजे नक्की काय असते ते मी सांगणारच आहे, पण त्यापूर्वी हे स्पष्ट करण्यास हवे, की  मुस्लिम धर्माच्या संस्कारांप्रमाणे तो विधी करण्यापूर्वी आणखी तीन महत्त्वाचे संस्कार मुलावर केले जातात. पहिला संस्कार हा मुलाच्या जन्मादिवशी केला जातो. तो संस्कार ब्राह्मण करतो. ब्राह्मण लोक जरी वेगळ्या धार्मिक तत्त्वाचे असले तरी त्यांना असलेल्या भविष्यविषयक ज्ञानामुळे त्यांच्याबद्दल मुस्लिमांना आदर असतो. तो त्याच्या ज्ञानानुसार मुलाचे भविष्य सांगतो आणि त्याने त्याचे कर्तव्य केले (ते फक्त भविष्यकथन असते) आणि मुलास योग्य असे सर्वात चांगले असे नाव सांगितले की त्याला मुलाच्या पालकांकडून भेटीदाखल काही दिले जाते आणि तो त्याच्या घरी परततो. दुसरा संस्कार मूल चार दिवसांचे झाले की केला जातो. तो मुस्लिम धर्मगुरू म्हणजे मुल्लाहकडून केला जातो. तो मुलाच्या आईला प्रसूतीनंतर भेटण्यास येणाऱ्या अनेक स्त्रियांच्या उपस्थितीत केला जातो. मुल्लाह प्रथम कुराणातील काही प्रार्थना म्हणतो, मुलावर मंतरलेले पाणी शिंपडतो, त्याच्या बेंबीवर आणि कानांत मोहरीचे तेल लावतो. ते झाले की समारंभ संपतो. मुल्लाह महिलांच्या मेळ्यामधून निघून पुरुषांच्या दिवाणखान्यात जातो. मुल्लाह गेला की हजामांच्या स्त्रिया प्रवेश करतात. मुलाच्या आईला त्या सर्व प्रकारे मदत करतात. एक तिला नखे कापण्यास मदत करते, दुसरी तिला हात धुण्यासाठी भांडे आणते, इतर जण तिला ठाकठीक रीतीने पोशाख चढवण्यास मदत करतात. थोरामोठ्यांच्या बायका मोठ्या संख्येने तिला भेटण्यास येत असतात. तिचे अभिनंदन करून समृद्धीचे प्रतीक म्हणून तिच्या मांडीवर ताजी फळे ठेवतात. ते सर्व झाले, की हजाम आणि त्याहून (तथाकथित) खालच्या वर्गाच्या स्त्रिया वरिष्ठ माहिलांचा पाहुणचार करतात. त्यात अनेक प्रकारच्या मिठायांचा आणि चवदार पदार्थांचा समावेश असतो. मुलाच्या वडिलांवरही पुरुषांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो. पुरुषांनाही मिठाया व इतर चविष्ट पदार्थ वाढले जातात. त्या नंतर दुसरा संस्कार संपतो. तिसरा संस्कार विसाव्या दिवशी होतो. त्या दिवशी हेच सारे विधी पुन्हा केले जातात.


        चौथा संस्कार म्हणजे सुंता. तो मूल सात वर्षाचे झाल्याशिवाय केला जात नाही. संस्कार करण्यापूर्वी मुस्लिम धर्मातील महत्त्वाची तत्वे - अर्थात त्याच्या वयाला समजतील इतपत - त्याला समजावून सांगितली जातात. समारंभ करण्यापूर्वी काही दिवस गरीब लोकांना खूप काटकसर करावी लागते. त्यांची इच्छा तशा प्रसंगी मोठी हौसमौज करणे आणि लोकांना चांगलेचुंगले खाऊ घालणे ही असते. त्यासाठी पैसे साठवणे जरुरीचे ठरते. तो पवित्र संस्कार करण्याचा दिवस जवळ आला, की ते हजामांना - कारण त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना शहर पूर्णपणे माहितीचे असते- मुर्शिदाबाद शहरात राहणाऱ्या सर्व मुस्लिम लोकांकडे जायफळ घेऊन पाठवतात. जायफळ हे निमंत्रणपत्रिकेसारखे असते. बोलावलेले सर्व लोक एका मोठ्या जागी जमतात. मी गेलो ती जागा एवढी मोठी होती, की तेथे एका वेळी दोन हजार माणसे वावरू शकतात. तेथे एक शामियाना उभारला होता. शामियाना आणि त्याच्या भिंती मलमलीच्या कापडाच्या होत्या. तेथे मुस्लिमांशिवाय कोणालाही प्रवेश नव्हता. शामियान्यातच एक वाद्यवृंद बसला होता, त्याने मौलवी आल्याची सूचना वाद्यें वाजवून दिली. मौलवींच्या दिमतीला एक हजाम होता. ज्या मुलाची सुंता करायची होती त्याला लाल रंगाचे नवे कपडे आणि दागिने घालून सजवले होते. रेशमी झालर सोडलेल्या एका छत्रीखाली तो एका हातवाल्या खुर्चीत मागे आणि हाताखाली मखमली तक्के घेऊन बसला होता. त्याला हजामाने तेथून उचलून एका घोड्यावर बसवले. घोड्याबरोबर मुलाचे जवळचे असे चार नातेवाईक होते. प्रत्येकाच्या हातात एक खुली तलवार होती आणि त्यांचे कपडे मुलाप्रमाणेच लाल रंगाचे आणि मलमलीचे होते. मुस्लिम लोकांपैकी प्रतिष्ठित लोक आल्याने समारंभाची शोभा वाढली होती. ते घोड्यावर बसून येतात आणि त्यांच्या मागे त्यांचे उंटही असतात. पण आता मुख्य समारंभाकडे वळतो. अशा तऱ्हेने घोड्यावर बसवून मुलाला एका मशिदीत नेले गेले. बरोबरच्या चौघांच्या मदतीने मुलगा मशिदीच्या दाराशी पायउतार झाला. ते चौघे त्याच्या बरोबर मशिदीत गेले. तेथे त्याने अल्लाहाच्या दूताची प्रशंसा केली, आई-वडिलांनी शिकवलेली प्रार्थना म्हटली. ते झाल्यावर त्याला पुन्हा घोड्यावर बसवून दुसऱ्या मशिदीत नेले. तेथे त्याने तशाच प्रकारे प्रार्थना वगैरे म्हटली. त्याच्याबरोबरच्या सर्वांनी सर्वशक्तिमान अल्लाहने सुंता करताना होणाऱ्या इजेपासून त्याचे रक्षण करावे अशी करूणा भाकली. अशा तऱ्हेने त्या मुलाने अनेक मशिदींत प्रार्थना केल्या.

त्यानंतर ते सर्व मूळ शामियान्यात आले. त्या मुलाला त्याच्या मूळ जागेवर बसवले गेले. वाद्यांचा गजर अचानक थांबला. मौलाना त्यांची समारंभाची वस्त्रे घालून अवतीर्ण झाले. त्यांच्या हातातील चांदीच्या घंगाळात मंतरलेले पाणी होते. ते पाणी त्यांनी मुलाच्या अंगावर शिंपडले. मुलाची सुंता करणारा हजाम हळू हळू पुढे आला. त्याने सुंता विधी एका झटक्यात उरकला. त्या कसोटीच्या वेळी सर्व जण एका पायावर उभे राहिले आणि मुलाच्या आईवडिलांसह त्या सर्वानी स्वर्गस्थ अल्लाहकडे मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. पुन्हा संगीत सुरू झाले. आता स्वर आनंददर्शक वाजू लागले. त्यानंतर मुलाला घेऊन त्याचे वडील घरी गेले आणि त्यांनी त्याला बिछान्यावर झोपवले. सर्व लोकांना हजामांनी हात धुण्यासाठी पाणी आणि नॅपकिन वाटले. सर्व लोक हात धुऊन अनवाणी पायांनी उत्कृष्ट अशा गालीचावर येऊन बसले. तेथे त्यांनी त्यांच्या आवडत्या खाद्याचा स्थानिक भाषेत पुलाव, म्हणजे शिजवलेले भात आणि मासा घातलेले मटण - आस्वाद घेतला. सर्वत्र मशाली लावल्या होत्त्या. त्याने शोभा अधिकच वाढली होती.

(वझे यांनी साके दीन महोमेत यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला असून तो लवकरच प्रसिद्ध होणार आहे.)

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

- रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध  झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------