धर्मगुरू क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा
धर्मगुरू क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

वसईतील मराठी ख्रिस्ती विवाह-विधी (Weddings of Marathi Christians in Vasai)

 

भाविक मंडळी,वराचा 'बेस्टमन' आणि वधूची 'बेस्टगर्ल'(करवली) यांच्या साक्षीने धर्मगुरू चर्चमध्ये विवाह लावतात.

नाताळचा सण येऊन गेला, की वसईच्या ख्रिस्ती समाजात लग्नाचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे शहरभर जल्लोषाचे नि उत्साहाचे वातावरण असते. तो उत्साह 2020 साली कोरोनाचे सावट असल्याने झाकोळून गेला. उत्तर वसईत कादोडी बोलीभाषा बोलणारा सामवेदी बोली असलेला कुपारीख्रिस्ती समाज राहतो. त्या समाजाच्या नंदाखाल, आगाशी, नानभाट, निर्मळ, गास, भुईगाव येथे छोट्यामोठ्या वस्त्या आहेत. त्यांची एकूण लोकसंख्या पन्नास हजार असावी.

वसईतील ख्रिस्ती लग्ने आरंभी हिंदू संस्कृतीनुसार होत. उदाहरणार्थ, अंगाला हळद लावून नियोजित वधू-वरांना आंघोळ घालणे, आंब्याच्या पानांची तोरणे नि केळीची रोपे वापरून मंडप सजवणे इत्यादी. पण त्या प्रथा बंद झाल्या. आधुनिक पद्धतींनी नव्या जमान्यात शिरकाव केला आहे. नियोजित वधू-वरांना लग्नाआधी त्यांच्या विवाहाची धर्मग्रामातील धर्मगुरूकडे नोंदणी करावी लागते. धर्मगुरू विवाहविधीच्या महिनाभर आधी सतत तीन रविवारी, पवित्र मिस्साबळीवर त्या नियोजित विवाहाची घोषणा करतात आणि त्या विवाहाला समाजातील भाविकांचा विरोध नाही ना याची खात्री करून घेतात. लग्न नात्यात होत असल्यास तेही धर्मगुरूंच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन ते करतात. त्यास चिठ्ठी पडणेअसे म्हणतात. म्हणजे नियोजित विवाहास धर्मगुरूंची मान्यता मिळाली असे होते. मग नियोजित वधू-वरांना विवाहपूर्व मार्गदर्शन शिबिराला हजर राहून तसा दाखला घ्यावा लागतो.

आयेसहाडी-चोळी’ भेट

            विवाहसोहळा तीन दिवस चालतो. लग्न साधारणत: रविवारी असते. मांडव शुक्रवारी सकाळी घरासमोर उभा होतो. कुटुंबीय आणि जवळचे आप्त नि मित्र लग्नघरी शनिवारी गोळा होतात. त्या सायंकाळी मांडवात बँड वाजत असतो व नाचगाण्यांची धमाल सुरू असते. त्याच दिवशी, दुपारनंतर तीन मुख्य कार्यक्रम पार पडतात. वराच्या घरून त्याचे मामा, मावशे मुलीच्या घरी आयेस’ (वधूसाठी केलेले दागिने) घेऊन जातात. त्यानंतर सायंकाळी कार्यक्रम असतो साडी-चोळी’चा. वराच्या घरून पाहुणे नातेवाईक बँड वाजवत वरातीने त्यांच्या आजोळी जातात आणि वधूसाठी मामा-मामीने आणलेली खास साडी-चोळी घेऊन येतात. ते आल्यावर वराची मामाच्या मांडीवर बसवून मोया केला जातो. म्हणजेच आमंत्रित न्हावी घरची व जवळच्या नात्यातील पुरुषांची चकाचक दाढी करतो. तो मोठा गमतीजमतीचा मामला असतो.

नावळ (वरात)

          सुटाबुटातील नवरदेव त्याच्या बेस्टमनसह आणि नववधू वेडिंग गाऊन पेहरून तिच्या करवलीसह त्यांच्या त्यांच्या घरून रविवारी सकाळी वरातीने देवळात येतात. धर्मगुरू त्यांचा विवाह पवित्र मिस्साबळीच्या प्रार्थनेत भाविकांच्या साक्षीने लावतात. पुरोहित भाविकांच्या साक्षीने वधू-वराकडून एकनिष्ठ जगण्याची शपथ घेतात आणि जे देवाने जोडले आहे, ते माणसांनी तोडू नयेअसा आध्यात्मिक सल्ला देतात. वधू-वर एकमेकांना अंगठी त्यांच्या प्रेमाची साक्ष म्हणून घालतात; एकमेकांना सुखदु:खांत, आजारात साथ देण्याचे वचन देतात. मग रिसेप्शन असते. दोन्ही कुटुंबांकडून एकत्र वा वेगवेगळ्या जेवणावळी उठतात. वरात, फटाके, नाचगाणी असा धमालीचा उत्सव दिवसभर सुरू असतो. आप्त व गोतावळा यांच्यासाठी श्रमपरिहाराचा कार्यक्रम बर्‍याच ठिकाणी सोमवारच्या सकाळी असतो. लग्नाच्या दिवशी सायंकाळी वर वधूला वरातीत आणण्यासाठी तिच्या घरी जातो, तेव्हा वरातीच्या मागोमाग वधूकडील मंडळी तिचे कपड्यालत्त्याने भरलेले नवेकोरे लाकडी कपाट तिच्या सासरी आणतात. त्यातील बुजुर्ग मंडळी निरोप घेताना ‘नीरवनी’ करतात, म्हणजेच ‘आमच्या पोरीला सांभाळून घ्या’ अशी विनवणी करतात. आता तो प्रकार कालबाह्य होत आहे.


          सोयरीक पूर्वीच्या काळी जमवली जाई. मुलीच्या घरून निरोपजाई व संमती मिळाली, की दोन्हीकडील निवडक व्याही मंडळी एकत्र बसून त्या नात्यावर शिक्कामोर्तब करत. अलिकडच्या काळात अधिकतर लव्ह मॅरेज होतात आणि लग्ने एंगेजमेंट पार्ट्यांचे सोहळे होऊन त्यातही जमतात.

आयेस, मोवा, हाडीसोळी (साडीचोळी) या जुन्या पद्धती मध्यंतरी समाजधुरीणांनी बंद पाडल्या होत्या, कारण त्यामध्ये सक्ती, जबरदस्ती व लुबाडणूक होऊ लागली होती. पण त्या आता श्रीमंत, पैसेवाल्या व्यक्तींकडून उत्साहात, मजा करण्यासाठी उर्जित केल्या जात आहेत. मग सर्व समाज त्याचे हळुहळू अनुकरण करतो. आजकालच्या विवाह-सोहळ्यात इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. मात्र, काळ आणि वेळेचे भान ठेवून कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांना फाटा दिला जात आहे ही एक स्वागतार्ह बाब आहे. वधुवरांच्या घरी, मांडवात व वरातीत नृत्य असते. ते उत्स्फूर्त असते, कोठल्याही विशिष्ट पद्धतीने केले जात नाही. पूर्वी लग्नाच्या जेवणावळी त्यावेळच्या परिस्थितीनुसार भात, मटण व तेलात तळलेले वडे अशा असत. आता सर्व सोयी कॅटरर्स पाहतात. विवाह सोहळ्यात मद्यपान खाजगी स्वरूपाचे असते. पूर्वी बुजूर्गांना गावठी वाढली जाई. सध्याची तरुणाई गटागटाने इंग्लिश ढोसतात, अर्थात यजमानाच्या खर्चावर. हा विधी उत्तर वसईतील ख्रिस्ती लोकांचा आहे. दक्षिण वसईतील वाडवळ समाजात धार्मिक विधी हाच असतो पण काही विधी वेगळे असतात.

मिस्साबळी - चर्चमधील पवित्र वेदीवर होणारी सामूहिक प्रार्थना
श्रमपरिहार - लग्नसोहळ्यात सेवाकाम करणाऱ्या नातेवाईक व मित्र यांना कृतज्ञतेपोटी दिलेली मेजवानी.

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

- जोसेफ तुस्कानो 98200 77836 haiku_joe_123@yahoo.co.in

जोसेफ तुस्कानो हे विज्ञान लेखक आहेत. ते ‘भारत पेट्रोलियम’ या राष्ट्रीय तेल कंपनीतून पश्चिम विभागाचे गुणवत्ता आश्वासन प्रबंधक म्हणून निवृत्त झाले. ते पर्यावरण आणि शिक्षण या संबंधित विषयांत कार्यरत आहेत. त्यांची विज्ञानातील नवे कोरे, विज्ञान आजचे आणि उद्याचे, आपले शास्त्रज्ञ, कुतूहलातून विज्ञान, ओळख पर्यावरणाची अशी अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.   

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सोमवार, २२ फेब्रुवारी, २०२१

अठराव्या शतकातील सुंता विधी! (Sunta Ritual Eighteenth Century)

 


अल्तापहुसेन रमजान नबाब यांचा सुंता विधीबाबतचा लेख थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर वाचून एक किस्सा लिहावासा वाटला. हिंदुस्थानी माणसाने इंग्रजीत लिहिलेले पहिले पुस्तक आयर्लंडमध्ये अठराव्या शतकाअखेरीस प्रकाशित झाले (1794). साके दीन महोमेत या भारतीय माणसाने ते पुस्तक लिहिले होते. तो ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत कॅम्प फॉलोअर या हुद्यावर काम करत होता. ते पुस्तक पत्ररूपात आहे. त्यातील एक पत्र सुंता या विधीवर आहे.

पत्र 12 महोदय,

मला माझा एक मुस्लिम नातेवाईक मिरवणुकीनंतर काही दिवसांनी भेटला. त्याने मला विनंती केली, की त्याच्या मुलाच्या सुंता समारंभाला मी हजर राहवे. तो समारंभ म्हणजे नक्की काय असते ते मी सांगणारच आहे, पण त्यापूर्वी हे स्पष्ट करण्यास हवे, की  मुस्लिम धर्माच्या संस्कारांप्रमाणे तो विधी करण्यापूर्वी आणखी तीन महत्त्वाचे संस्कार मुलावर केले जातात. पहिला संस्कार हा मुलाच्या जन्मादिवशी केला जातो. तो संस्कार ब्राह्मण करतो. ब्राह्मण लोक जरी वेगळ्या धार्मिक तत्त्वाचे असले तरी त्यांना असलेल्या भविष्यविषयक ज्ञानामुळे त्यांच्याबद्दल मुस्लिमांना आदर असतो. तो त्याच्या ज्ञानानुसार मुलाचे भविष्य सांगतो आणि त्याने त्याचे कर्तव्य केले (ते फक्त भविष्यकथन असते) आणि मुलास योग्य असे सर्वात चांगले असे नाव सांगितले की त्याला मुलाच्या पालकांकडून भेटीदाखल काही दिले जाते आणि तो त्याच्या घरी परततो. दुसरा संस्कार मूल चार दिवसांचे झाले की केला जातो. तो मुस्लिम धर्मगुरू म्हणजे मुल्लाहकडून केला जातो. तो मुलाच्या आईला प्रसूतीनंतर भेटण्यास येणाऱ्या अनेक स्त्रियांच्या उपस्थितीत केला जातो. मुल्लाह प्रथम कुराणातील काही प्रार्थना म्हणतो, मुलावर मंतरलेले पाणी शिंपडतो, त्याच्या बेंबीवर आणि कानांत मोहरीचे तेल लावतो. ते झाले की समारंभ संपतो. मुल्लाह महिलांच्या मेळ्यामधून निघून पुरुषांच्या दिवाणखान्यात जातो. मुल्लाह गेला की हजामांच्या स्त्रिया प्रवेश करतात. मुलाच्या आईला त्या सर्व प्रकारे मदत करतात. एक तिला नखे कापण्यास मदत करते, दुसरी तिला हात धुण्यासाठी भांडे आणते, इतर जण तिला ठाकठीक रीतीने पोशाख चढवण्यास मदत करतात. थोरामोठ्यांच्या बायका मोठ्या संख्येने तिला भेटण्यास येत असतात. तिचे अभिनंदन करून समृद्धीचे प्रतीक म्हणून तिच्या मांडीवर ताजी फळे ठेवतात. ते सर्व झाले, की हजाम आणि त्याहून (तथाकथित) खालच्या वर्गाच्या स्त्रिया वरिष्ठ माहिलांचा पाहुणचार करतात. त्यात अनेक प्रकारच्या मिठायांचा आणि चवदार पदार्थांचा समावेश असतो. मुलाच्या वडिलांवरही पुरुषांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतो. पुरुषांनाही मिठाया व इतर चविष्ट पदार्थ वाढले जातात. त्या नंतर दुसरा संस्कार संपतो. तिसरा संस्कार विसाव्या दिवशी होतो. त्या दिवशी हेच सारे विधी पुन्हा केले जातात.


        चौथा संस्कार म्हणजे सुंता. तो मूल सात वर्षाचे झाल्याशिवाय केला जात नाही. संस्कार करण्यापूर्वी मुस्लिम धर्मातील महत्त्वाची तत्वे - अर्थात त्याच्या वयाला समजतील इतपत - त्याला समजावून सांगितली जातात. समारंभ करण्यापूर्वी काही दिवस गरीब लोकांना खूप काटकसर करावी लागते. त्यांची इच्छा तशा प्रसंगी मोठी हौसमौज करणे आणि लोकांना चांगलेचुंगले खाऊ घालणे ही असते. त्यासाठी पैसे साठवणे जरुरीचे ठरते. तो पवित्र संस्कार करण्याचा दिवस जवळ आला, की ते हजामांना - कारण त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना शहर पूर्णपणे माहितीचे असते- मुर्शिदाबाद शहरात राहणाऱ्या सर्व मुस्लिम लोकांकडे जायफळ घेऊन पाठवतात. जायफळ हे निमंत्रणपत्रिकेसारखे असते. बोलावलेले सर्व लोक एका मोठ्या जागी जमतात. मी गेलो ती जागा एवढी मोठी होती, की तेथे एका वेळी दोन हजार माणसे वावरू शकतात. तेथे एक शामियाना उभारला होता. शामियाना आणि त्याच्या भिंती मलमलीच्या कापडाच्या होत्या. तेथे मुस्लिमांशिवाय कोणालाही प्रवेश नव्हता. शामियान्यातच एक वाद्यवृंद बसला होता, त्याने मौलवी आल्याची सूचना वाद्यें वाजवून दिली. मौलवींच्या दिमतीला एक हजाम होता. ज्या मुलाची सुंता करायची होती त्याला लाल रंगाचे नवे कपडे आणि दागिने घालून सजवले होते. रेशमी झालर सोडलेल्या एका छत्रीखाली तो एका हातवाल्या खुर्चीत मागे आणि हाताखाली मखमली तक्के घेऊन बसला होता. त्याला हजामाने तेथून उचलून एका घोड्यावर बसवले. घोड्याबरोबर मुलाचे जवळचे असे चार नातेवाईक होते. प्रत्येकाच्या हातात एक खुली तलवार होती आणि त्यांचे कपडे मुलाप्रमाणेच लाल रंगाचे आणि मलमलीचे होते. मुस्लिम लोकांपैकी प्रतिष्ठित लोक आल्याने समारंभाची शोभा वाढली होती. ते घोड्यावर बसून येतात आणि त्यांच्या मागे त्यांचे उंटही असतात. पण आता मुख्य समारंभाकडे वळतो. अशा तऱ्हेने घोड्यावर बसवून मुलाला एका मशिदीत नेले गेले. बरोबरच्या चौघांच्या मदतीने मुलगा मशिदीच्या दाराशी पायउतार झाला. ते चौघे त्याच्या बरोबर मशिदीत गेले. तेथे त्याने अल्लाहाच्या दूताची प्रशंसा केली, आई-वडिलांनी शिकवलेली प्रार्थना म्हटली. ते झाल्यावर त्याला पुन्हा घोड्यावर बसवून दुसऱ्या मशिदीत नेले. तेथे त्याने तशाच प्रकारे प्रार्थना वगैरे म्हटली. त्याच्याबरोबरच्या सर्वांनी सर्वशक्तिमान अल्लाहने सुंता करताना होणाऱ्या इजेपासून त्याचे रक्षण करावे अशी करूणा भाकली. अशा तऱ्हेने त्या मुलाने अनेक मशिदींत प्रार्थना केल्या.

त्यानंतर ते सर्व मूळ शामियान्यात आले. त्या मुलाला त्याच्या मूळ जागेवर बसवले गेले. वाद्यांचा गजर अचानक थांबला. मौलाना त्यांची समारंभाची वस्त्रे घालून अवतीर्ण झाले. त्यांच्या हातातील चांदीच्या घंगाळात मंतरलेले पाणी होते. ते पाणी त्यांनी मुलाच्या अंगावर शिंपडले. मुलाची सुंता करणारा हजाम हळू हळू पुढे आला. त्याने सुंता विधी एका झटक्यात उरकला. त्या कसोटीच्या वेळी सर्व जण एका पायावर उभे राहिले आणि मुलाच्या आईवडिलांसह त्या सर्वानी स्वर्गस्थ अल्लाहकडे मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. पुन्हा संगीत सुरू झाले. आता स्वर आनंददर्शक वाजू लागले. त्यानंतर मुलाला घेऊन त्याचे वडील घरी गेले आणि त्यांनी त्याला बिछान्यावर झोपवले. सर्व लोकांना हजामांनी हात धुण्यासाठी पाणी आणि नॅपकिन वाटले. सर्व लोक हात धुऊन अनवाणी पायांनी उत्कृष्ट अशा गालीचावर येऊन बसले. तेथे त्यांनी त्यांच्या आवडत्या खाद्याचा स्थानिक भाषेत पुलाव, म्हणजे शिजवलेले भात आणि मासा घातलेले मटण - आस्वाद घेतला. सर्वत्र मशाली लावल्या होत्त्या. त्याने शोभा अधिकच वाढली होती.

(वझे यांनी साके दीन महोमेत यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला असून तो लवकरच प्रसिद्ध होणार आहे.)

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

- रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध  झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------