चीन क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा
चीन क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा

मंगळवार, १४ एप्रिल, २०२०

कोरोना - चीनची मात; भारतास संधी! (Corona- India's Opportunity)

कोरोना साथीचा आरंभ चीनमध्ये झाला. तो कसा झाला? केव्हा जाहीर झाला? याबद्दल विवाद आहेत. खरे तर, तो सोशल मीडियावरून भारतात कळला. भारतानेच नव्हे, तर साऱ्या जगाने तो चीनचा स्थानिक प्रश्न म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. तरी ती रस्त्यावर अचानक पडणाऱ्या वुहानमधील माणसांची दृश्ये आठवतात. लॉकडाऊन काळातील या नोंदी प्रकट होण्यास सुरुवात केल्यापासून आठ-दहा वेगवेगळ्या व्यक्तींसंदर्भात लिहिले गेले आहे. त्यात सर्वात जास्त वाचला व चर्चिला गेला, तो लेख होता शांघायमधील अमित वाईकर याच्या अनुभवासंदर्भातील. 'थिंक महाराष्ट्र'कडे त्या संबंधात मोठा प्रतिसाद आलाच, त्यात काही प्रश्न उपस्थित केले गेले; तशाच विचारणा अमित याच्याकडेही झाल्या. स्वभाविकच, मी व अमित, आम्ही दोघांनी थोडा अधिक वेळ सविस्तर गप्पा फोनवर मारल्या. त्याचे हे प्रकटन.
          वुहान ही हुबे प्रांताची राजधानी आहे. तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव डिसेंबर मध्यानंतर केव्हातरी जाणवला. आरंभी तो न्युमोनियासारखा आजार आहे, म्हणून त्यावर उपचार झाले. परंतु थोड्याच काळात त्याचा संसर्ग होत असल्याचे लक्षात आले. डॉक्टर व नर्स हेच आजारी झाले तेव्हा तशी खात्री पटली आणि साथीच्या आजाराच्या दृष्टीने उपचारांची तयारी सुरू झाली.
बघता बघता, रोगाने गंभीर स्वरूप धारण केले, परंतु काळ ख्रिसमसचा होता,  चिनी नववर्ष लवकरच सुरु होणार होते(जानेवारी अखेर). वुहानमध्ये तीन लाख परदेशी लोक आहेत. त्यामुळे सुट्टीचे वातावरण होते. लोकांचे लांब लांब प्रवासाचे बेत सुरु झाले होते. तरीदेखील चीनमधील आरोग्याधिकाऱ्यांनी संसर्गाचे गांभीर्य ध्यानात घेऊन काही तयारी सुरू केली. तेवढ्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी बीजिंगमध्ये 13 जानेवारीला जाहीरपणे सांगितले, की आजार संसर्गजन्य असला तरी तो व्यक्ति संपर्कातून पसरणारा दिसत नाही. त्यामुळे एकूण तयारी व उपचार यांत थोडा ढिलेपणा राहिलाच. पण रोग्यांची व मृत्यूंची संख्या वाढत राहिली. तेव्हा चीन सरकारने तेथे 23 जानेवारीला लॉकडाऊन जाहीर केला आणि बीजिंग-शांघायसह सर्व शहरांमध्ये 27 जानेवारीला लॉकडाऊन जाहीर झाला. चीनने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सर्व प्रवास बंद केला. प्रवासाचे सर्व दोरच कापले गेले. अवघा चीन देश जवळ जवळ महिना-सव्वा महिना ताळेबंदीखाली होता. सरकारने एकेक शहर व प्रांत खुले करणे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आरंभले. अक्षरशः एकाद्या मोठ्या सभागृहातील प्रकाश एकेक बटन दाबून पसरत जावा तसा चीनचा एकेक प्रदेश उघडा होत गेला. साथ वुहानमध्ये सुरू झाली, तेथेच ती गेल्या आठवड्यात संपली. पण अजूनही अवघ्या देशभर त्या रोग संसर्गाची काळजी सतत घेतली जात आहे. त्यातून एकाही नागरिकाची सुटका नाही. क्युआर कोडने प्रत्येक नागरिकाच्या स्वास्थ्यावर लक्ष ठेवले जाते.
          अमितने उदाहरण देऊनच सांगितले. तो म्हणाला, की मी राहतो ती इमारत सात मजली आहे. शेजारीच जिमखाना आहे. समजा, मी जिमखान्यात गेलो, तर दारावरील पहारेकरी क्युआर कोड पाहतो. तो 'यलो' झाला असेल तरी मला तो तेथे प्रवेश देत नाही. मी घरी परतलो, की रिसेप्शनचा माणूस खुलासा करतो, की चौथ्या मजल्यावरील अमुकअमुक व्यक्‍ती संशयित रोगी आहे. त्यामुळे इमारतीमधील सर्व रहिवासी मुलाबाळांसह देखरेखीखाली राहतील. एवढी दक्षता व तत्परता असल्याने रोग आटोक्यात आला आहे.
          चीनची कार्यपद्धतच अशी आहे, की त्यांचे काम शंभर टक्के प्रयत्नांचे असते. तसेच प्रयत्न करोनाविरुद्ध चीनदेशात झाले. त्याउलट युरोपीय देश वा अमेरिका यांचे झाले आहे. त्यांनी हे करू - ते करू असे प्रयत्न चालवले आहेत व त्यात रोगाची साथ भडकत गेली आहे. स्वास्थ्यकारण की अर्थकारण अशीही दुविधा तेथे असते. चीनमध्ये सरकार ही सर्वश्रेष्ठ गोष्ट असते. सरकारचे सर्वांनी ऐकायचे हे गृहीत धरलेले असते.
          चीनबद्दल गैरसमजुती बर्‍याच आहेत आणि त्या त्यांच्या गेल्या साठसत्तर वर्षांच्या इतिहासामधून निर्माण झालेल्या आहेत. अफाट लोकवस्तीचा हा देश अतोनात दारिद्रयाखाली पिचलेला होता. गरिबी, भुकमरी याखेरीज वेगळे काही त्या देशाने गेली कित्येक शतके पाहिलेच नव्हते. तेथील कम्युनिस्ट सरकारने अक्षरश: काही दशकांत ती परिस्थिती बदलली. बरीच जुलुमजबरदस्ती झाली, पण चीनच्या विद्यमान सोयीसुविधा या पाश्चात्य देशांच्या तोडीस तोड, किंबहुना त्यांच्याहून सरस आहेत. तेथील सरकारने सत्तर कोटी जनतेला सत्तर वर्षांत दारिद्र्यरेषेच्या वर, मध्यमवर्गीय जीवनशैलीत आणून ठेवले आहे. त्यामुळे तेथील जनतेला सरकार देवासमान आहे. भारतात जनता जीवनात जे बरेवाईट घडेल ते परमेश्वराची कृपा असे समजते. चीनमधील लोक त्यांच्या जीवनात देवाची जागा सरकारला देतात. त्यामुळे तेथे खरोखर कोणतीही बंधने नाहीत, पण सरकारचे स्थान लोकजीवनात असे अनन्य आहे, की सरकार सांगेल ती पूर्व दिशा असते. तेथे सरकारवर जाहीरपणे टीका करायची नाही एवढे एक बंधन वगळले तर दुसरे कोणतेच बंधन नाही. सरकारला सारे समजते हीच तेथील लोकांची भावना आहे. जगातील कोणत्याही जनसमुदायाला हेवा वाटावा असे सुखी जीवन चीनमधील जनता जगत आहे!
          चिनी लोकांच्या जेवणाखाण्याच्या सवयींतून कोरोना उद्भवला असा एक समज प्रसृत झाला आहे आणि अमित वाईकर अन्नपदार्थ उद्योगातच आहेत. त्यांच्या उद्योगाच्या भारतासहित चार देशांत शाखा आहेत. चीनमधील कार्यालयात जवळजवळ अकराशे लोक काम करतात. ते बहुसंख्य चीनी आहेत. त्यामुळे अमित यांची उठबस चीनी लोकांत बरीच आहे. त्यामुळे अन्नपदार्थांचा विषय निघाला तेव्हा अमित म्हणाला, की चिनी लोकांच्या खाण्याच्या चवी 'एक्झॉटिक' आहेत, हे खरंच. पण ती त्यांच्या दारिद्र्यातून उद्भवलेली सवय आहे. सुखस्वास्थ्य आल्यावर उधळमाधळ होते तसा तो प्रकार आहे. तशी उधळमाधळ भारतातील लग्नसमारंभांतूनही दिसते. फक्त तेथे शाकाहारी पदार्थ असतात. चीनमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींत जो अनाचार दिसतो त्या सवयी पूर्वीच्या तेथील अभावातून, दारिद्र्यातून उद्भवल्या आहेत. 'कोरोना'नंतर त्या सवयी बदलण्याची शक्यता दिसत नाही. भारतात ताट चाटुनपुसून खाण्याची पद्धत आहे. ती चीनी लोकांना अजिबात आवडत नाही. अमित म्हणतो, की "मी दहा वर्षांपूर्वी चीनमध्ये आलो तेव्हाची गंमत आहे. ऑफिसचे एक डिनर होते. यजमान पदार्थांवर पदार्थ मागवत होते, मी खात होतो. माझ्या स्टाफमधील एका मुलगी आली. तिने सांगितले, की तुम्ही प्लेट रिकामी केलीत की कोणीतरी काहीतरी तुम्हाला वाढणार. ताटात काहीतरी ठेवून द्यायचे, टाकायचे अशी येथील पद्धत आहे. तरच तुमचे पोट भरले असे समजून तुम्हाला वाढण्याचे थांबवतील. एकेकाळचा अभाव आणि विद्यमान विपुलता यामधून या सवयी तयार झाल्या आहेत.
          चीनची अर्थव्यवस्था कोरोनानंतर लगेच सावरेल असा विश्वास अमितला वाटतो. कारण तो म्हणाला, की चीन ही जगाची फॅक्टरी आहे. चीन जगातील सर्व देशांना लागेल ती गोष्ट गेली तीन दशके पुरवत आला आहे. चीनने त्यांच्या देशातील दारिद्र्य जसे हटवले तशी जगातील अनेक देशांना विपुलता व विविधता ही दृष्टी दिली. ते सर्व देश चीनच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहेत. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे. तिला दूर सारून जग पुढे कसे जाऊ शकेल?
          अमित यास भारताच्या, विशेषत: कोरोना काळातील कामगिरीचे कौतुक वाटते. तो म्हणतो, की केंद्र व विविध राज्य सरकारे परिस्थिती खंबीरपणे हाताळत आहेत. महाराष्ट्र सरकार तर तिपेडी असूनदेखील एकसूत्राने चालल्यासारखे भासते. कडक नियमांची कडक अंमलबजावणी हेच कोरोनावर सध्यातरी उत्तर आहे. ते चीनच्या स्वभावात आहे. भारतात ती भूमिका घेतली जात आहे. कोरोनानंतरच्या काळात चीनबद्दलच्या शंका जगभर आणखी उफाळून येतील, तो काळ भारताला अनुकूल असेल; किंबहुना जगभरचे उद्योग व अर्थकारण स्वतःकडे खेचण्याची संधी भारताकडे येत आहे. तिकडे लक्ष ठेवले गेले पाहिजे.
          अमित यांनी त्यांच्या बलाढ्य कंपनीचा जर्मन प्रमुख(सीइओ) आहे, त्याचे एक संभाषण सांगितले. तो म्हणतो, की भारताकडे बुद्धिमत्ता आहे, गुणवत्ता आहे, तरुणवर्गाची मोठी शक्ती आहे, अत्याधुनिक शिक्षण सोयी आहेत आणि मुख्य म्हणजे पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचा इतिहास आहे. या सगळ्यांची बेरीज का होत नाही? तोच पुढे म्हणतो, की अनेक घटक एकत्र करून खिचडी बनवण्यास खानसामाही कुशल असावा लागतो. भारतीय नेतृत्वाची कसोटी या संकटकाळातून बाहेर आल्यावर लागणार आहे!
अमित वाईकर +8613918228393 wa_amit@hotmail.com
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
---------------------------------------------------------------------------------------------------------------


बुधवार, १५ एप्रिल, २०२०

कोरोना - चीनचे कारस्थान?(Corona - China's Conspiracy)


अमित वाईकर
कोरोना चीनमध्ये उद्भवला, जगभर पसरला, आता स्थिरावला. म्हणजे त्यामुळे देशोदेशांची जी अवस्था झालेली आहे, ती अटळ आहे; त्या देशांचा विचार व कारवाई ती अवस्था कशी सांभाळायची, अधिक बिघडू द्यायची नाही हे सर्व देशांनी स्वीकारले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनताही स्थिरावत आहे. कोरोनावर औषध निघेल तेव्हाच जगाची या आजारातून सुटका होणार आहे. त्यामुळे जगाची सारी भिस्त वैज्ञानिकांवर आहे.
          दरम्यान, हे संकट उद्भवले त्यामागे कोणाचा हात आहे? निसर्ग-पर्यावरणाची गेल्या काही दशकांत झालेली हानी हे त्याचे सोपे उत्तर झाले. त्यासाठी विकासवाद्यांना दोषी ठरवता येते, परंतु त्यामुळे प्रश्न सुटत नाही.  
          कोरोना व्हायरस हे चीनचे कारस्थान आहे, चीनने तो जाणीवपूर्वक जगभर पसरवला, त्या रोगामुळे युरोप-अमेरिकेत जसा हाहाकार माजला तसा तो रोग चीनमध्ये पसरला नाही, तेवढी जीवितहानी तेथे झाली नाही - त्याबाबतही कमी-जास्त-अफाट आकडे प्रसृत होत राहिले. त्यामुळे कोरोना हे चीनचे कारस्थान असावे का? या दृष्टीने जगात सर्वत्र चर्चा सुरू झाली. मुंबई-महाराष्ट्रातही तळच्या वर्गापासून उच्चभ्रू लोकांपर्यंत सर्वत्र तोच विषय बोलण्याचा व कुजबुजीचा बनला. त्याची कडी गेल्या आठवड्यात झाली. 'द ओरिजिन ऑफ व्हायरस' नावाची 'डॉक्युमेंटरी कम मूव्ही' गेल्या आठवड्यात सर्वत्र प्रसृत झाली, ऑस्ट्रेलियातील एका वर्तमानपत्राने चीनवर आरोपपत्र जगजाहीर ठेवले - त्यास चीनच्या परराष्ट्र खात्याने उत्तरे दिली, त्यांचाही समाचार वर्तमानपत्राने घेतला, अमेरिका-ऑस्ट्रेलिया व भारत येथील व्यक्ती अथवा संस्था यांनी चीनवर कोरोनासाठी अब्जावधी रुपयांच्या नुकसानभरपाईच्या फिर्यादी गुदरल्या आहेत. हे सारे गेल्या आठ-दहा दिवसांत जगासमोर आले, सर्वत्र पसरले गेले. चीन देश मात्र जगभरच्या विचारी जगात अशी खळबळ माजली असताना शांत होता! शांत आहे आणि देशोदेशीची सरकारे कोरोनावर मात करण्याच्या लढाईत गुंतली आहेत. 

          अमित वाईकर हा मराठीपुरता चीनमधील माहितीदूत आहे. त्याच्यापुढे ही सर्व हकिगत ठेवली. तेव्हा तो म्हणाला, की ते चीनबद्दलचे गैरसमज! आत्ताच बघा चीनच्या सर्व शहरांत कोरोनाची लागण झाली, कोरोनाचे मृत्यू झाले ते आकडे येथील मिडीयात प्रसिद्ध झाले परंतु जगात मात्र वुहानबद्दलच बोलले गेले. अशा अंशतः माहितीमुळे गैरसमज तयार होतात आणि वाढतात. मी चीनचा वकील नव्हे, परंतु मला गेल्या दहा वर्षांत चीन बऱ्यापैकी जवळून पाहण्यास मिळाला आहे. मी चीनमध्ये सर्वत्र फिरत असतो. तेथे लपवाछपवी आहे असे जाणवत नाही. मी पुनःपुन्हा हेच सांगेन, की तेथील लोकांचा सरकारवर देवाइतका विश्वास आहे. तो गेल्या साठ-सत्तर वर्षांत तसा घडवून घेण्यात आला आहे. चिनी लोकांना जनता म्हणून जगाचे काहीही पडलेले नाही. जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते युरोप-अमेरिकेतील मृत्यूचे तांडव पाहून-वाचून हळहळतात. तरुणवर्ग त्यांच्या जीवनात मग्न असतो. रोगाची चीनमध्ये सुरुवात झाली, तेव्हा जगाने त्याची फिकीर केली नाही, मग चीनने जगाची का चिंता करावी? असा त्यांचा सवाल असतो. शेजाऱ्याचे घर जळते तेव्हा ...तसा तो प्रकार आहे.
          अमित यास चीनचे हे कारस्थान आहे असे प्रसृत होण्याचे आणखी एक कारण वाटते. तो म्हणतो, की हिटलरचा प्रोपागंडा जसा प्रसिद्ध आहे, तशी माओची 'वॉर ऑफ टंग' थिअरी चीनमध्ये ग्राह्य मानली जाते. म्हणजे देशावर कोणी एक शाब्दिक आघात केला तर देशाने त्यावर त्या प्रकारचे चार संभाव्य आघात पसरून द्यायचे आणि विरोधकाच्या/शत्रूच्या मनात गोंधळ निर्माण करायचा - येथेही चीनने तसेच तंत्र वापरले आहे, स्वतः काही न बोलता वेगवेगळे प्रवाद पसरवून दिले आहेत. खुद्द चीनमध्ये असा प्रवाद आहे, की अमेरिकन सैन्यदलाच्या तुकडीने ते चीनमध्ये नोव्हेंबरात आले असताना या रोगाचे बीज पसरवून दिले! चीनमध्ये त्या वेळी 'वॉर गेम्स' झाले व त्यांत पाच देशांच्या सैन्यदलांनी भाग घेतला होता.
          सार्स, मॅड काऊ या रोगांच्या साथी गेल्या पंधरा-वीस वर्षांत आल्या व गेल्या. त्या वेळीही असे आरोप-प्रत्यारोप झाले. कोरोनामध्ये संसर्ग फार भेदक व व्यापकही आहे. त्यामुळे या वेळेची टीका अधिक बोचरी व लागट असणार. महत्त्वाचे आहे, की कोरोनानंतरचे जग कसे असणार आहे? अमितच्या मते, जग एकत्र येणार की दूर जाणार हा खरा प्रश्न आहे. जगातील देश एकेकटे झाले, 'ग्लोबल' वातावरण दशक-दोन दशकांसाठी संपले तरी चीनचे नुकसान नाही, जगाचे विशेषत: गरीब देशांचे मात्र फार नुकसान होऊ शकते. चीन जसा ग्लोबलायझेशनच्या आधी कोशात होता तसा तो एका सेकंदात जाऊ शकतो. तेथील सर्व बंधने पुन्हा येऊ शकतात; खरे तर, ती जनतेने स्वेच्छेनेच सध्याही स्वतःवर लादून घेतली आहेत. चिनी लोक काही प्रमाणात एक दिशेने चालणारे आहेत. ते बहुअंगी विचार करू शकत नाहीत. त्यांना अस्मिता/अहंकार मात्र फार आहेत. ते दुखावले गेले तर ते उसळून उठतात, पण तसे त्यांच्या चेहऱ्यावर दिसणार मात्र नाही. ते शब्दांचा प्रहार सरळ करत नाहीत, शालजोडीतील शब्दांमधून मारतात. चिनी जनता कम्युनिस्ट राजवटीपासून श्रेणीबद्ध आहे, हुकुमाची ताबेदार आहे. तेथील राजकीय नेते जो निर्णय करतात तो जनता निमूट मान्य करते.
          अमित यांच्या मते, जग विभक्त झाले तर ते आणखी छोटे होईल, पंधरा वीस वर्षे मागे जाईल. 'युनो', 'हू' या संघटनांना सध्याच फार प्रभावी स्थान नाही. विभक्त परिस्थितीत त्यांचे अस्तित्वच संपून जाईल. चीनला जर असे विभक्त, छोटे जग हवे असते तर त्यांनी केव्हाच हात वर केले असते.
          जगात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्यामागील सत्य कधीच बाहेर येत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की भारताने कोरोना संकटाचे इष्टापत्तीत रूपांतर करून घेतले पाहिजे. जगभर जर चीनबद्दल संशय निर्माण झाला आहे तर भारत हे जगाचे आकर्षणकेंद्र बनू शकते. मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कारकिर्दीत पहिल्या दोन वर्षांत जगभर दौरे करून खूप मोठी सदिच्छा निर्माण केली होती. मंगोलियापासून चीन-अमेरिकेपर्यंत त्यांच्याविषयी सद्भाव तयार झाला होता. परंतु नंतर ते देशांतर्गत घडामोडींत अधिक गुंतून गेले. त्यांनी देशांतर्गत हुरुप कायम ठेवलाच पाहिजे, त्यासाठी विकासात्मक योग्य धोरणे आखली पाहिजेत; त्याचबरोबर परदेशांना भारताकडे खेचून घेतले पाहिजे. हीच ती वेळ आहे. भारताकडे जी आध्यात्मिक, भावनात्मक शक्ती आहे ती चीनसहित अन्य कोणत्याही देशाकडे नाही. तो ही भारताच्या बाजूने अधिकचा मुद्दा आहे.
अमित वाईकर +8613918228393 wa_amit@hotmail.com
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------बुधवार, १७ जून, २०२०

समुद्र प्रवास आणि कोरोना (Sailor Experience of Corona)

नाविक आम्ही फिरतो सात नभांखाली...

कॅप्टन सुहास कणसे
बहुतेक लोकांना असे वाटते, की नाविक व्यक्तींचे जीवन मनमोहक असेल, त्यांना भरपूर जगभर फिरण्यास, भरपूर वाइन पिण्यास मिळत असेल आणि त्यासोबत पैसेही कमावता येत असतील! पण जसे म्हणतात, ना 'अज्ञानात आनंद आहे' तसेच हेही आहे. सेलिंग करता करता चहा पिणे प्रत्येकाच्या नशिबात नसते. त्यासाठी जिगर लागते!
          शिपिंग उद्योग हा जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यात नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त व्यापार जहाजांद्वारे केले जातात. अन्नधान्यापासून तेल, कार आणि फोन यांसारख्या लक्झरी वस्तूंची ने-आण समुद्रमार्गे केली जाते. ते काम करणारे नाविक त्यांच्या कुटुंबीयांपासून दूर, ताणतणाव असलेल्या वातावरणात, कधीकधी वादळाशी झुंज देत समुद्रातून प्रवास करत असतात. कोट्यवधी डॉलर्स किमतीची मालवाहतूक अशा तऱ्हेने होत असते.
          आम्ही नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतून निघालो. माझे जहाज डिसेंबरमध्ये अटलांटिकमध्ये होते, आम्ही अमेरिकेहून युरोपकडे जाण्याच्या मार्गावर होतो. तेव्हा आम्ही प्रथम नोव्हल कोरोना विषाणू आणि कोविद-19 यांबद्दलची बातमी ऐकली. त्यावेळी कोरोना मुख्यतः चीन भागात होता; अन्य जग सुरक्षित वाटले. खोल समुद्रात नेटवर्क कनेक्टिव्हिटी खूपच खराब असते. त्यामुळे आम्हांला बंदरात पोचलो, तरच माहिती मिळू शकत होती. मी जानेवारी महिन्यात बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये होतो, तेव्हा काही कोरोना रोगी युरोपमध्ये आढळले. तरीही जनजीवन सर्वसामान्य होते. आम्हाला कोरोना ही जगातील इतर समस्यांप्रमाणे एक वाटत होती. परंतु फेब्रुवारीपासून, युरोप हा कोरोनाचा केंद्रबिंदू बनू लागला आणि मार्चपर्यंत जहाज वाहतूक उद्योग आणि विशेषत: समुद्रकिनाऱ्यांवरील कामगारांचे काम यावर फार मोठा परिणाम झाला. जागतिक व्यापार ठप्प होऊन गेला. त्याचा थेट परिणाम जहाज वाहतुकीवर झाला. तेलासह इतर वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्यामुळे जहाजे बंद पडली.          
            आम्ही ज्या देशांना भेट दिली (अॅमस्टरडॅम, नेदरलँड, बेल्जियम) त्या देशांत असे दिसून आले, की ते देश त्यांच्या पद्धतीने या स्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या सुविधांवर लक्ष दिले. काहींनी मास्क, काहींनी पीपीई किटवर अधिक लक्ष केंद्रित केले. आमचे खलाशी लोक स्वत:चा बचाव कोरोना आजारापासून करण्यासाठी खबरदारी घेत होते. स्थानिकांना त्या संबंधात जी पथ्ये होती (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची) त्यांची अडचण वाटे. कोरोनामुळे समुद्रात प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी प्रवासादरम्यान कोणती काळजी घ्यावी याची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात जहाजात येण्यापूर्वी प्रत्येकाच्या शरीराचे तापमान मोजले जाते. सॅनिटाइझरचा वारंवार वापर करण्याच्या सूचना दिल्या जात. जेथे जेथे जहाजातील व्यक्तींनी बंदर गावांना भेटी दिल्या तेथे तेथे पीपीईकीट वगैरे गोष्टी परिधान करणे आवश्यक होते. मी सेनेगलमधील डाकार येथे तो अनुभव घेतला. तेथील स्थानिकांना खात्री होती, की त्यांच्या देशावर कोरोनाचा कोणताही परिणाम झालेला नाही आणि तेथील स्थानिक अधिकाऱ्यांसह प्रत्येकाने जहाजात सुरक्षिततेच्या दृष्टीने पुरवले गेलेले साहित्य वापरण्यास नकार दिला. त्यामुळे आमचे खलाशी लोक बिथरले. कंपनीने दीर्घकाळासाठी आवश्यक तेवढे अन्नधान्य जहाजावर ठेवलेले असते. मात्र जहाज दुरुस्ती किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे साहित्य लागले तर ते जहाजांना पुरवताना कंपनीस अडचणी येत होत्या. कारण विमानसेवा बंद होती. त्यामुळे जहाजाला जनरल मेंटेनन्ससाठी रंग, ल्युब्रिकेशन ऑईल वगैरे मिळण्यास वेळ लागत होता. ते साहित्य जहाजात रवाना करण्याची प्रोसिजर वाढली.

          देशोदेशीच्या लॉकडाऊनचा थेट परिणाम समुद्रात काम करणाऱ्या खलाशांवर झाला. जहाज वाहतूक बंद पडल्यामुळे ते ज्या बंदरात असतील ते त्या त्या बंदरांत अडकून पडले. आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाल्यामुळे, ज्या खलाशांचे करार संपले होते त्यांना त्यांच्या देशी परत जाणे गरजेचे होते. घरी त्यांचे कुटुंबीयही वाट पाहत होते. परंतु तशा खलाशांची स्थिती अधांतरी झाली. त्यांना काही आशा दिसत नव्हती. त्यामुळे खलाशी थकून गेले. त्यांची 'सागरा प्राण तळमळला' अशी व्याकुळ भावना झाली. तरीसुद्धा जे नाविक स्वदेशी परतू शकले त्यांना त्या त्या ठिकाणी क्वारंटाइनमध्ये राहवे लागले. आधीच समुद्रातील एकांतवास त्यात क्वारंटाइनमधील अलगता, यामुळे त्यांची मनःस्थिती हवालदिल झाली. त्यामुळेच पुन्हा त्यांच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या.   
          कोरोना विषाणूचा फैलाव जगभर झाल्यामुळे जगभरातील जहाजांवर काम करणारे भारतीय लोक रोजगार मोठ्या प्रमाणावर गमावत आहेत. चीन, जपान आणि जगभरातील गोद्या दर आठवड्याला डझनभर नवीन जहाजे तरी त्यांच्या समुद्रातून रवाना करतात. परंतु भारत लॉकडाऊनमध्ये आहे, त्यामुळे भारताच्या समुद्रकिनाऱ्यातून वाहतूक होत नाही. त्यामुळेच भारतीय कामगारांनाही आंतरराष्ट्रीय जहाजांवर कामासाठी जाणे शक्य नाही. त्यांच्याऐवजी त्या जहाजांवर चीन आणि फिलिपाईन्ससारख्या देशांतील कामगार वाढले आहेत. जर लॉकडाऊनची परिस्थिती कायम राहिली तर भारतीय खलाशी आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांच्या बाहेर फेकले जातील.   
पत्नी शीतल आणि मुलगी ओवीसोबत कॅप्टन कणसे
          कॅप्टन कणसे त्यांच्या घरी पुण्यात 14 मे रोजी पोचले. त्यांना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, की माझे जहाज डकार येथे फॉस्फेरिक अॅसिडचा माल भरून कांडला बंदरात येणार होते. सर्व देशांना मालाची गरज असते. त्यामुळे समुद्रमार्गावरील मालवाहतूकीवर कोणतेही निर्बंध नाहीत. फक्त जहाजातील प्रवाशांवर निर्बंध असतात. माझ्या एका मित्राचा चार महिन्यांचा कार्यकाळ संपून आठ महिने झाले तरी तो बोटीवरच आहे! माझे बोटीवरील कामकाज 4 मार्चलाच संपले. त्यावेळी आमचे जहाज युरोपात होते. मी तेथे उतरून विमानाने भारतात परतणार होतो पण विविध देशांत लॉकडाऊन झाले आणि माझे बोटीवरील वास्तव्य वाढले. तरीसुद्धा "मी नशीबवान. माझी बोट गुजरातच्या कांडला बंदरापर्यंत पोचू शकली. तेथे आम्ही तीन दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिलो. तेथे आमची कोविद-19 ची स्वॅब टेस्ट घेतली गेली. ती निगेटिव्ह आल्यावर मला घरी जाण्याचा पास मिळाला. मी स्वतः गाडी चालवत कांडल्याहून पुण्याला परतलो. माझ्याबरोबर असलेल्या माझ्या इतर सहकाऱ्यांनाही कोचीन, पाटणा, जम्मूपर्यंतचा पन्नास पन्नास तासांपर्यंतचा प्रवास रस्त्यानेच करावा लागला. अजूनही जी जहाजे भारतात येत नाहीत त्यातील भारतीय कामगार वेगवेगळ्या बंदरांतच अडकले आहेत."
- सुहास कणसे 9819563156
सुहास कणसे हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन आहेत. त्यांनी बारावी सायन्स केल्यानंतर बी एस्सी नॉटिकल सायन्स केले. त्यानंतर ते कमिशन्ड रँक घेत 2011 मध्ये कॅप्टनपदापर्यंत पोचले. त्यांना वाचनाची आणि  पर्यटनाची आवड आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुधवार, ७ एप्रिल, २०२१

अफूबंदीची अद्भुत कहाणी (The Truth About Opium Smoking)

 


गोष्ट आहे 1882 सालची. लंडनच्या एक्स्टर सभागृहात एक परिसंवाद आणि त्यानंतर एक जाहीर सभा झाली. त्या परिसंवादात आणि नंतरच्या सभेत जे सहभागी झाले होते त्यात नऊ मिशनरी, काही ब्रिटिश अधिकारी, बिशप, आर्चबिशप आणि काही खासदार होते. कार्यक्रमाचा हेतू होता, की जनसामान्यांना अफूबद्दलचे वास्तव समजावून सांगणे आणि त्यांना सरकारला विनंती करण्यास लावणे, की भारतातून चीनबरोबर चाललेला अफूचा व्यापार ताबडतोब थांबवावा !

हिंदुस्तानात पिकलेली अफू 1858 पासून चीनमध्ये निर्यात होत असे. अफूची पहिली लढाई 1841 मध्ये आणि दुसरी 1850 मध्ये झाल्या. दुसऱ्या लढाईनंतर इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, इटली आणि फ्रान्स यांनी स्वतंत्र करार चीनबरोबर केले. त्या करारांद्वारे या देशांना चीनमध्ये वकिलाती स्थापन करण्याची, मिशनरींना धर्मप्रसार करण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अफू अधिकृत रीत्या चीनमध्ये आणण्याची परवानगी मिळाली. ब्रिटिशांनी हिंदुस्तानात पिकवलेली अफू चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाठवण्यास त्यानंतरच्या वीस वर्षांत सुरुवात झाली. तो व्यापार किती मोठा होता? त्या व्यापारातून ब्रिटिश सरकारला भारताच्या कारभारासाठी 13.45 कोटी स्टर्लिंग पाउंड एवढा नक्त नफा वीस वर्षांत झाला ! से असताना ब्रिटिश लोकांनीच तो व्यापार सरकारने थांबवावा अशी मागणी का केली? ब्रिटनचे साम्राज्य त्या व्यापारामुळे मजबूत होत असताना लोक त्या व्यापाराविरूद्ध का उठले ?

त्याचे एक महत्त्वाचे कारण होते - ब्रिटिश सरकार चीनमध्ये अफू जवळजवळ जबरदस्तीने उतरवत होते आणि त्याचा अतिशय वाईट परिणाम चीनच्या सर्वसामान्य जनतेवर आणि काही अंशी वरील वर्गातील लोकांवर होत होता. त्यावर पुढील प्रश्न साहजिकच असा येईल, की वीस वर्षे व्यापार निर्वेध चालत असताना लोक एकाएकी त्याविरुद्ध उठले, याला काही तात्कालिक असे कारण झाले का?

तसे कारण झाले होते.

चिनी व्यापारी

लंडनच्या 'द टाइम्स' या अग्रगण्य वृत्तपत्रात 6 डिसेंबर 1881 रोजी एक पत्र प्रसिद्ध झाले. सर जॉर्ज बर्डवूड यांनी त्यांच्या त्या पत्रात असे म्हटले होते, की “अफू पिणे (अफूचे धूम्रपान) हे संपूर्णपणे निरुपद्रवी आहे - अंगठा तोंडात घालण्याची सवय निरुपद्रवी असते, अगदी तसे” त्या पत्राच्या प्रसिद्धीनंतर सर्वत्र निषेधाची लाट उसळली आणि परिणामी, तो उपरोल्लेखित परिसंवाद व नंतर सभा यांचे आयोजन करण्यात आले. तो परिसंवाद, सभेतील भाषणे आणि नंतर काही मुद्यांचा परामर्श असे सर्व पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. त्या पुस्तकाचे नाव आहे - The Truth about Opium Smoking, stated by Missionaries, British officials, Chinese officials, Archbishops and Bishops. ते पुस्तक रेअर बुक्स सोसायटीच्या साईटवर उपलब्ध आहे.

प्रिन्स कुंग आणि वेन सांग

त्या सभेत ब्रिटिश मिशनरी - त्यांपैकी काही वैद्यकीय पात्रता असलेले आणि चीनमध्ये नऊ वर्षे ते तेवीस वर्षे काम केलेले असे होते - आणि इतर यांनी मुख्यतः चिनी लोकांवर अफूचे दुष्परिणाम कसे आणि किती मोठ्या प्रमाणावर होत होते याचे अनेक तपशील दिले आहेत - त्यांतील निवडक येथे सांगितले पाहिजेत असे आहेत.

1. तंबाखू ओढणारा माणूस चटकन वेगळा करता येत नाही, पण अफू - धुम्रपान करणारा माणूस चटकन ओळखता येतो. त्याची त्वचा फिकुटलेली, ओठ निळे आणि घट्ट असतात. त्याच्यात कोणत्याही प्रकारची ताकद नसते. तो कामधंदा करू शकत नाही, संपूर्णतः निर्धन होतो आणि त्याच्या कुटुंबाची दैन्यावस्था होते.

2. शिक्षकांतही अफू खाण्याचे प्रमाण खूप आहे. असे शिक्षक पुस्तकावर लक्ष फार काळ केंद्रित करू शकत नाहीत.

3. पालखी वाहणारे भोई, अफूची वेळ झाली की पालखी वाटेतच सोडून अफूच्या शोधात जातात आणि ती मिळाल्यानंतरच कित्येक तासांनी परततात !

4. अफूचा प्रसार इतका वाढला आहे, की लोक पूर्वी पाहुण्यांना चहा देत असत, आता, त्याऐवजी अफू पुढे करतात.

5. अफूमुळे पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो, बद्धकोष्ठ मोठ्या प्रमाणावर होतो; श्वसनसंस्था हळुहळू निकामी होते. मलविसर्जन दहा किंवा पंधरा दिवसांतून एकदा होणे हे अफू पिणाऱ्या लोकात सर्रास दिसते.

6. अफूची सवय एकदा लागली, की अजिबात सुटत नाही. धूम्रपान आणि मद्यपान हे एकवेळ उपचाराने बंद करता येईल, पण अफू सुटत नाही. राजघराण्यातील एक तरुण रोज दोन औंस अफू आणि भरपूर वाईन पीत होता. त्याचे अफूचे व्यसन महत्प्रयासांनी थांबवावे लागले. तो व्यसनमुक्त झाल्यावर एका परिचितांकडे गेला - अफू पुढे आली, त्याने घेतली आणि तात्काळ मरण पावला.

7. अफू घेण्याचे व्यसन बुद्धिजीवी आणि उच्चवर्गीय यांच्यात वाढू लागले आहे. हेच लोक अखेर सत्तावर्तुळात जातात, त्यामुळे अफूच्या व्यसनाचा घातक परिणाम सत्ता- वर्तुळावर होत आहे.

8. अफूच्या व्यसनामुळे जनसामान्यांवर जो परिणाम होत आहे त्याला ब्रिटिश जबाबदार आहेत ही भावना सर्व लोकांची आहे. रस्त्यात खेळणी विकणाऱ्या माणसाकडे एक खेळणे ब्रिटिश माणसाची मूर्ती असे होती. तिच्या एका हातात तराजू व दुसऱ्या हातात अफूचा गोळा दाखवलेला होता.

चिनी प्रशासक ली हुंग- चँग

अफूच्या व्यसनातील विरोधाभास हा होता, की अफूच्या आहारी गेलेला माणूस आणि त्याचे सगेसोयरे, सारेच ते व्यसन लांछनास्पद मानत असत. अफू खाणाऱ्या माणसाला चर्चमध्ये प्रवेश देणे मिशनऱ्यांना शक्य होत नसे, कारण त्याबद्दल चिनी अधिकारी आणि लोक नाराजी व्यक्त करत असत. त्यामुळे मिशनरी लोकांना धर्मप्रसार करणे अवघड जाऊ लागले. चिनी लोक मिशनऱ्यांना प्रश्न विचारत असत – “हा व्यापार हे ख्रिस्ती धर्माचेच फळ आहे का?” मिशनरी व्यक्ती अफूच्या व्यापाराला विरोध करण्याचे तेही एक कारण होते. अफू व्यापार चालू ठेवण्याच्या बाजूच्या लोकांचा एक मोठा मुद्दा होता, की त्या व्यापारातून मिळणारा प्रचंड पैसा हा हिंदुस्तानात शिक्षण, न्यायव्यवस्था, वाहतूक आणि प्रशासन यांच्यासाठी ब्रिटिश खर्च करू शकत होते. त्याच्याशी प्रतिवाद त्या सभेत आणि नंतरच्या निवेदनांतून करण्यात आला. चिनी प्रशासक ली हुंग- चँग यांच्या अफूविरोधी उपायांच्या सच्चेपणाचा निर्वाळा देण्यात आला. चिनी लोक स्वतः अफू का पिकवत होते याचा खुलासा करण्यात आला - त्याशिवाय अफूच्या व्यापाराच्या समर्थकांचे विविध मुद्दे सभेत हजर असणाऱ्यांनी खोडून काढले. (अफूच्या व्यापारातून ब्रिटिशांनी साम्राज्यवाद कसा रुजवला आणि हिंदुस्तानातील लोकांची पिळवणूक केली हे अमिताव घोष यांच्या Sea of poppies या  2008 साली प्रकाशित झालेल्या कादंबरीत आले आहे. (हिंदू - पी सी कुमार यांचा लेख 3-3-2017))

सभेच्या अखेरीस एक ठराव मंजूर करण्यात आला – “चीनमध्ये दीर्घकाळ वास्तव्य केलेल्या आणि चीनमध्ये खूप प्रवास केलेल्या मिशनऱ्यांची निवेदने ऐकल्यानंतर, या सभेची खात्री पटली आहे, की अफूच्या व्यापाराचे घातक असे परिणाम शारीरिक, सामाजिक आणि नैतिक स्वरूपाचे होतात. त्या बाबतच्या आर्थिक मुद्यांची नोंद घेतल्यावरही सभेचे मत असे आहे, की भारत सरकार आणि चीन यांच्यादरम्यान अफूचा व्यापार चालू ठेवणे हे या देशाच्या लौकिकास साजेसे नाही. या विषयावर पार्लमेंटमध्ये त्वरित आणि प्रामाणिक चर्चा झाली पाहिजे”

सनदशीर उपायसुद्धा किती प्रभावी पद्धतीने करता येतात आणि त्याबरोबर ब्रिटिशांनी केलेल्या हिंदुस्तानच्या आर्थिक पिळवणुकीचा आणखी एक पदर यांचे प्रभावी दर्शन या पुस्तकातून होते. हे पुस्तक या लिंकवर वाचता येईल.

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

- रामचंद्र वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध  झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------