शब्दशोध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शब्दशोध लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

दिवटा


आदिमानवाने अग्नी निर्माण केला तेव्हा तो इतर प्राण्यांपासून वेगळा आणि श्रेष्ठ ठरला. त्याच वेळी, अग्नीमुळे मानव निसर्गापासून दूरही झाला. त्याने हळुहळू निसर्गव्यवहारात हस्तक्षेप सुरू केला. मानवाने प्रगती शिकार केलेले मांस अग्नीवर भाजण्यापासून ते अग्नीचा प्रकाशासाठी उपयोग करण्यापर्यंत साधली. वि.म.कुलकर्णी यांची ज्योतनावाची सुंदर कविता आठवणीतील कवितांमध्ये आहे. ज्योतीचा प्रवास दिवटी, पणती, समई, कंदील, बत्ती असा पुढे सरकत बिजलीपर्यंत कसा झाला याचे सुरेख वर्णन त्या कवितेत आहे. त्या कवितेची सुरुवात
आधी होते मी दिवटी
शेतकऱ्यांची आवडती
झाले इवली मग पणती,
घराघरांतून मिणमिणती
या कडव्याने झाली आहे. थोडक्यात दिवटी म्हणजे मशाल. पूर्वी रात्रीच्या वेळी प्रवास करणे झाल्यास काही जण मार्ग दाखवण्यासाठी दिवटी हातात घेऊन पुढे चालत. मशाल किंवा दिवटी हातात धरून मार्ग दाखवणाऱ्या अशा व्यक्तींना मशालजी किंवा दिवटा असे म्हणत. ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,
तयां तत्त्वज्ञां चोखटां
दिवी पोतसाची सुभटा
मग मीचि होऊनी दिवटां
पुढां पुढां चाले.
त्याचा अर्थ अर्जुना, त्या श्रेष्ठ, शुद्ध प्रेमळ भक्तांकरता तत्त्वज्ञानरूपी मशाल घेऊन, मी स्वत: दिवटा होऊन त्यांच्यापुढे दिवसरात्र चालतो’. श्रीकृष्ण स्वत:ला अशा तऱ्हेने दिवटा म्हणजे मार्ग दाखवणारा, वाटाड्या म्हणवून घेतात.
नंतर मात्र दिवटा या शब्दाला जरा हलका अर्थ प्राप्त झाला. दिवटा म्हणजे वाया गेलेला, दुर्गुणी, वाईट मार्गाला लागलेला असे अर्थ त्याला चिकटले गेले आहेत.
- उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

हातखंडा

काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे म्हणजे हातखंडा. तर हातखंड म्हणजे मधून मधून सोडवणूक करणारा, मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); तसेच अडल्यावेळी उपयोगी पडेल अशी व्यक्ती.
कारागीर त्याच्या कलेत अतिशय निष्णात असेल, त्या कलेत त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नसेल तर त्याच्या कामाचे वर्णन हातखंडा काम असे केले जाते. गालिच्यांवर नाजूक कलाकुसर करणारे, दगडी शिल्पांमध्ये सजीवतेचा आभास निर्माण करणारे, ताजमहालसारख्या कलाकृतीमध्ये संगमरवरावर सुंदर नक्षीकाम करणारे अशा विविध कलांमधे श्रेष्ठ असणाऱ्या कलावंतांचे कार्य हे हातखंडा काम म्हणून ओळखले जाते. एवढेच काय रोजच्या व्यवहारातही, स्वयंपाकातील पुरणपोळीसारखा पदार्थ करण्यात एखादी गृहिणी वाकबगार असेल तर पुरणपोळी म्हणजे तिचे हातखंडा काम असे अभिमानाने सांगितले जाते!

हातखंडा काम या वाक्प्रचारामागे एक कटू सत्य आणि भीषण वास्तवता दडली आहे. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे, सुलतान, जहागीरदार यांसारखे राज्यकर्ते त्यांच्या राज्यांतील वा संस्थानातील कुशल कारागिरांकडून अलौकिक शिल्प, वास्तू किंवा स्वत:चे चित्र तयार करून घेत. पण त्यानंतर भविष्यात त्या कारागिरांनी इतरत्र कोठेही तशा तऱ्हेचे किंवा त्याहून चांगले काम करू नये म्हणून त्यांना एक आगळेवेगळे बक्षीस देत; म्हणजे त्यांचे हात छाटून टाकत! त्यावरून हातखंडा काम हा वाक्प्रचार तयार झाला असावा. चि.वि.जोशी यांच्या ओसाडवाडीचा देव या छोटय़ा, पण सुंदर पुस्तकात सुरुवातीला ओसाडवाडीतील गणपतीच्या मंदिरातील गणपतीच्या मूर्तीचे वर्णन वाचनात येते. ते असे, ‘ही गणपतीची मूर्ती इतकी सुंदर आहे, की ती तयार करणाऱ्या कारागिरांचे हात तोडून राजाने त्याला जहागीर बक्षीस दिली होती. त्याला हातखंडा काम म्हणतात. पूर्वीचे राजेलोक कलेला अशा प्रकारचे उत्तेजन देत असत!’- उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in

डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

हळदिवी (Haldivi)

हळदिवा किंवा हळदिवी याचा शब्दकोशातील अर्थ हळदीच्या रंगाचा, पिवळा असा आहे. शब्द आरती प्रभू यांच्या कवितांमध्ये अनेकदा दिसतो. प्रामुख्यानेजोगवाया काव्यसंग्रहातील कवितांमध्ये. हळदिवी हा शब्द किती वेगवेगळ्या संदर्भात आणि तरीही चपखलपणे त्या कवितांमध्ये आला आहे.
                        ‘हिरव्याशा गवतांत हळदिवीं फुले, हलकेच केसरांत दूध भरूं आले’ (गंध)
तर मिळालेले खूळया कवितेत पिकून पिवळ्या झालेल्या फळाचे वर्णन करताना तो असा आला आहे -
फळा हळदिव्या झाकी हिरवासा पंख

रस गळे.. करी चोंच लालसर डंख’.

मात्र कधी कधी अर्थ आकळत नाही जसे...

धुकें फेसाळ पांढरे दर्वळून दवे

शून्य शृंगारते आता होत हळदिवें
(शून्य शृंगारते) या शब्दाची नशा वाचकाला चढते. पण सर्वात भन्नाट म्हणजे
हळदीची पाने हळदिवी झाली,

कुठे कोण जाणे पिंगाळी पळाली’ (हिरव्या चुका)
हळदीच्या सुकलेल्या पिवळ्या पानांना हळदिवीची उपमा देणे म्हणजे थोरच. त्या कविता वाचल्यावर वाटते, की हळदिवी हा शब्द आरती प्रभूंचा. तो त्यांनीच वापरावा! मात्र तो शब्द आणखीही एका कवयित्रीने सुंदर वापरला आहे. त्या कवयित्री म्हणजे कविता महाजन. त्यानी त्यांच्या कुहूमध्ये तो योजला आहे.
                            मृदु मंद हळदिवी उन्हे जांभळा गर्द गारवा, अशा क्षणी झाडावर का पक्षी नवा उतरावा.
- उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ख (Kha)


हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी हा एकाक्षरी शब्दही आहे. ख म्हणजे आकाश. त्यावरून आकाशातील ग्रहांना खगोल आणि त्यांच्या अभ्यासाला खगोलशास्त्र असे म्हटले जाते.  म्हणजे आकाशात, म्हणजे गमन करणारा असा तो खग (पक्षी). काही शब्द पासून तयार झाले आहेत. उदाहरणार्थ म्हणजे शुभ असते. आकाशात दिव्यासारखा चमकणारा खद्योत म्हणजे काजवा. खगंगा म्हणजे आकाशगंगा, खवल्ली म्हणजे आकाशवेल. खनगर (गंधर्वनगर), खस्थान (घरटे, ढोली), खद्रु:(चारोळी) तर खहर: म्हणजे शून्याने भागलेली संख्या (अनंत) शंख ज्याच्यातील म्हणजे आकाश. त्याशिवाय ख शब्दाचे सूर्य, स्वर्ग, इंद्रिय, अवकाश, छिद्र, पोकळी, शून्य टिंब, जखम, कर्म, ब्रह्म, ज्ञान, शेत, अभ्रक आणि शहर असे अर्थ गीर्वाणलघुकोशात दिले आहेत.
मनुष्यशरीर पंचमहाभूतांनी बनलेले असते असे आयुर्वेदात सांगितले आहे. मानवी शरीरातील सूक्ष्म पोकळ्या म्हणजे स्रोतस. ती आकाशे महाभूताने व्यापलेली असतात. मानवी शरीराची दोन कान, दोन डोळे, दोन नाकपुड्या, तोंड, गुदद्वार आणि मूत्रद्वार ही नऊ द्वारे आहेत. ती द्वारेही आकाश महाभूताने व्यापलेली असतात. त्यांतील सर्वात मोठे आणि मुख्य म्हणजे मुख किंवा तोंड; तर शरीरात जेथे अजिबात नसते असा अवयव म्हणजे नख. शरीरातील या पोकळ्यांच्या अवस्थेवर शरीराची अवस्था अवलंबून असते. जेव्हा पोकळ्यांत दोष साठतात, त्यांच्यात अवरोध निर्माण होतो तेव्हा शरीर अस्वस्थ होते आणि व्याधी अवस्था निर्माण होते. 
                                     शब्दशोध सदरातील हे ही लेख वाचा - 
                                                                         अक्षता
                                                                          वागुर
                                                                         फालतू

शरीरातील आकाश बिघडल्यामुळे रोग निर्माण होतात, म्हणून रोगाला दु:ख असे म्हटले जाते. शरीरातील सर्व स्रोतसे म्हणजेच आकाश महाभूत सुस्थितीत असेल तर आपण निरोगी अवस्था अनुभवतो. त्यालाच सुख असे म्हटले आहे. तसेच, शरीरातील त्रिदोषांची साम्यावस्था काल, आहार-विहार, वय अशा अनेक कारणांनी सतत बिघडत असते आणि त्यामुळे मनुष्य व्याधि अवस्था म्हणजेच दु:ख अनुभवत असतो. म्हणून सुख आणि दु:ख या दोन्ही गोष्टी महाभूतावर अवलंबून असतात, हे खरे!
- उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------