कला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

झाडीपट्टी रंगभूमीचा रंगमंच – प्रेक्षकांचे कुतूहल (Jhadipatti Drama stage: Unique development)

 

रंगमंचाची सजावट - पडदे, लाईटिंग

झाडीपट्टी नाटकांचे स्टेज (रंगमंच) हा विषय कायम कुतूहलाचा राहिलेला आहे. किंबहुना झाडीपट्टीत खुद्द नाटक, त्यातील नटनट्या हे जसे आकर्षणाचे व चर्चेचे विषय असतात, त्याप्रमाणे रंगमंच त्याची व्यवस्था - त्यावरील पडदे त्यानुसार पात्रांच्या हालचाली हादेखील प्रेक्षकांच्या कुजबुजीचा विषय असतो. त्यामुळे झाडीपट्टी नाट्यजगतात गावोगावची खुल्या जागेतील थिएटरे, त्यात केलेली बैठक व्यवस्था, बांधलेले स्टेज हे सगळे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. नाटकांचे दोन प्रकार झाडीपट्टीत पाहण्यास मिळतात. एक गावातील हौशी कलावंतांनी केलेले नाटक. त्यातील स्त्री पात्रे हा अडचणीचा मुद्दा असे. स्त्री कलावंतांना ठरावीक रक्कम मानधन देऊन नाटकासाठी बोलावले जाई. नाटकाचा प्रयोग साधारणतः मोफत असे. पुरूष कलावंत हौसेने महिना-पंधरा दिवस सराव करून नाटक बसवत. स्त्री कलावंतांना स्क्रिप्ट दिली जाई. त्या 'डायरेक्ट ऑन स्टेज परफॉर्म' करत. त्यांनी अनेक नाटकांतून भूमिका साकारलेल्या असतात. त्यामुळे त्या सराईत असतात. अर्थात, मुख्यत: त्यांच्यासाठी पार्श्वसूचक नेमलेला असे.

कलावंत नाटक सादर करताना

दुसरा नाट्यप्रकार हा झाडीपट्टीतील व्यावसायिक रंगभूमीच्या कसलेल्या कलावंतांनी सादर केलेला. हळुहळू गावातील हौशी नाट्य मंडळांच्या स्वत:च्या नाटकांची जागा व्यावसायिक रंगभूमीच्या स्थानिक कलावंतांनी घेतली. गावोगावची हौशी नाट्यमंडळे त्यांना पैसा मोजून संपूर्ण नाट्यसंचासहित सादरीकरणाला बोलावतात. तो नाट्यप्रयोग लोकांना तिकिट काढून पाहवा लागतो. पूर्वी पुण्या-मुंबईच्या कलावंतांचे नाट्यप्रयोग काही निवडक गावांत अशा तऱ्हेने बोलावले जात. परंतु त्यात अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागे. त्यातूनच प्रभावित होऊन, हौशी नाट्यप्रकारातून सरावाने कसदार बनलेल्या गावागावातील निवडक कलावंतांनी नाट्यसंचांची उभारणी केली. त्यांच्या प्रयोगांना गावागावांतून मागणी येऊ लागली आणि त्याला व्यावसायिक रूप प्राप्त झाले. झाडीपट्टीतील रंगभूमीवरील नाटके हा अभिनव नाट्यप्रकार निर्माण झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा हे तशा नाटकांचे केंद्र बनून गेले आहे.

नाटकाचा स्टेज उभारत असलेले कारागीर

नाटकांसाठी रंगमंच ही सर्वात मोठी गरज असते. प्रत्येक गावातील रंगमंच हा त्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे, वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. रंगमंचांची विभागणी पुढील प्रकारांत करता येईल - 1. सिमेंट काँक्रिटचे पक्के बांधकाम असलेले रंगमंच. ते ग्रामपंचायत निधीतून किंवा आमदार फंड वगैरेच्या माध्यमांतून उभे केलेले असतात. ते सिमेंटचे पक्के बांधकाम असलेले ओटे असतात. ते झाडीपट्टीत फार कमी गावांमध्ये पाहण्यास मिळतात. काही ठिकाणी, तसे ओटे गावांतील शाळांच्या मालकीचे असतात. त्यांचा वापर नाटकांसाठी व इतर कार्यक्रमांसाठी केला जातो, 2. मातीचा चौकोनी उंचवटा असलेले रंगमंच - मातीचे आयताकृती उंचवटा असलेले कायमस्वरूपी रंगमंच काही गावांमध्ये असतात. नाटकांचे प्रयोग त्या गावांमध्ये दरवर्षी निश्चित असतात. त्यामुळे गावात सार्वजनिक ठिकाणी माती टाकून 22×20 चौरस फूटांचा उंचवटा तयार केला जातो. त्या पलीकडे समोर साधारणतः पाचशे खुर्च्या मावतील एवढा खड्डा तयार केला जातो. खड्ड्यातील माती रंगमंचाचा उंचवटा तयार करण्यासाठी वापरतात. समोर हजारभर प्रेक्षक बसण्याच्या क्षमतेएवढे मोकळे मैदान असते. ती जागा आणि तो रंगमंच दरवर्षीच्या नाटकासाठी आरक्षित असतात. त्या खड्ड्यांत पाणी दरवर्षी पावसात साचते. स्टेजच्या उंचवट्यावरील माती वाहून जाते. नाटकाची तारीख जवळ आली, की मंडळांचे सदस्य स्टेजची डागडुजी करतात. परिसराची साफसफाई करून स्टेज नाटकासाठी सज्ज करतात, 3. सेंट्रिंग ठोकून तयार केलेले रंगमंच - ज्या गावांमध्ये नाटकासाठी पर्मनंट स्टेज नसते अशा ठिकाणी गावालगत असलेल्या ओपन स्पेसमध्ये किंवा शेतातील धानाचे पीक निघाल्यानंतर त्यात सेंट्रिंग ठोकून रंगमंच तयार केले जातात. अशा जागा मिळवण्यासाठी ग्रामपंचायत किंवा शेतमालकाची पूर्व परवानगी घ्यावी लागते. असे स्टेज तयार करण्यासाठी लाकडी पाट्या किंवा लोखंडी पत्रे असलेली सेंट्रिंग वापरतात. तसे स्टेज साधारणतः 20×22 फूट अथवा 22×25 फूट आयताकृती जमिनीपासून साडेतीन-चार फूट उंच बनवले जाते. स्टेजच्या चार कोपऱ्यांत चार बळकट लाकडी खांब रोवले जातात. टेलिफोन सेवा हल्ली विस्कटली असल्यामुळे टेलिफोनचे निरूपयोगी झालेले खांब स्टेजसाठी वापरल्याचे आढळून येते. त्या चार खांबांवर आढे लावून छत बनवले जाते. त्या छताला नाटकासाठी आवश्यक असलेले पडदे बांधले जातात.

पडदेबांधणी सर्व प्रकारच्या रंगमंचांवर साधारणतः पुढीलप्रमाणे केली जाते - समोर नाट्य मंडळीचे (रंगभूमीचे) नाव असलेली आडवी पट्टी असते. त्यामागे अंक पडदा. त्यानंतर प्रवेश पडदा. नंतर बगीचा दृश्य, झोपडी दृश्य, लावणीची कोठी, सर्वात शेवटी फ्लॅट सिन (बंगला) असलेले पडदे असतात. बाजूला लोखंडी पायऱ्या बसवल्या जातात. प्रत्येक पडद्याच्या दोन्ही बाजूंना विंग असते. प्रवेशाच्या वेळी उभे असलेले कलाकार थेट प्रेक्षकांना दिसू नयेत हा त्या मागील उद्देश असतो. ते सर्व पडदे पेंटरकडून रंगवून घेतले जातात. नाटकातील कथानकाला अनुसरून सिनसिनरी, विशिष्ट स्थळ, घटना, प्रसंग दाखवण्यासाठी त्यांचा वापर होतो. प्रत्येक पडद्याला वर-खाली ओढण्यासाठी दोरी बांधलेली असते. दृश्य संपले, की प्रवेश पडदा खाली सोडला जातो. त्यामागे पुढील प्रवेशाची तयारी केली जाते. नंतरच्या प्रवेशाचे दृश्य दर्शन घडवणारा पडदा खाली सोडला जातो. कलावंत प्रवेश करताच प्रवेश पडदा वर ओढला जातो. नाटकाच्या नंतरच्या प्रवेशाला सुरुवात होते. स्टेजच्या दोन्ही बाजूंला दोन खोल्या पडद्यांच्या बनवलेल्या असतात. त्यांचा वापर कलावंतांच्या मेकअप आणि ड्रेसिंग यांसाठी ग्रीन रूम म्हणून केला जातो. तेथे व्यवस्था एका बाजूला पुरूष आणि दुसऱ्या बाजूला स्त्री कलावंत अशी असते.

सिनेमा टॉकिजच्या धर्तीवर तयार केलेला पडद्यांचा बंद शामियाना

नाटकाचे प्रयोग हे बंद शामियान्यात होतात. नाटकाचा सीजन दिवाळी ते होळी हा म्हणजे ऐन कडाक्याच्या थंडीचे दिवस. त्यामुळे प्रेक्षकांना थंडीची बाधा होऊ नये यासाठी सिनेमा टॉकिजच्या धर्तीवर पडद्यांचा बंद शामियाना तयार केला जातो. शामियाना अठरा ते वीस पल्ल्यांचा असतो. त्यासाठी 20×30 चे चार पल्ले, 15×30 चे सोळा पल्ले वापरले जातात. ते सर्व पल्ले एकत्र शिवलेले असतात. त्यामुळे कामगारांना ते बांधण्यास त्रास जास्त होत नाही. त्यामुळे ‘घंटो का काम मिनटो में’ सहज साध्य होते. तो पल्ल्यांचा एकजिनसी तंबू दोरांच्या साहाय्याने ताणला जातो. भिंती चारही बाजूंला 15×30 च्या बारा ते चौदा साईडिंग वापरून तयार केल्या जातात.

पडद्यांचे थियेटर (बंद शामियाना)

स्टेज आणि प्रेक्षकांची बैठक व्यवस्था असलेल्या संपूर्ण जागेवर पडद्यांचे छत आच्छादले जाते. चहूबाजूंनी पल्ले लावले जातात. बाहेरील प्रेक्षक विनातिकिट प्रवेश करू नये यासाठी प्रवेश आणि निकास गेट तयार केले जातात. प्रेक्षकांची बैठक व्यवस्था आतील भागात एका बाजूला स्त्रिया व दुसऱ्या बाजूला पुरूष अशी केलेली असते. तशी विभागणी मधोमध मोठा दोर बांधून करतात. समोर खुर्ची, त्यामागे गादी व शेवटी दरी अशा प्रकारे तिकिट दरानुसार दोर बांधून विभागणी केली जाते. लोकांना प्रवेश करण्यासाठी गेट केले जाते. मंडळाची माणसे त्या गेटवर तिकिट चेक करण्यासाठी असतात. तिकिट तपासून प्रेक्षकांना त्या त्या तिकिट दालनात प्रवेश दिला जातो.

प्रकाश योजना - प्रकाशयोजनेकरता स्टेजच्या समोरील आढ्याला अंकपडद्याजवळ वेगवेगळ्या रंगांचे लाइट्स लावलेले असतात. स्टेजवर समोरच्या भागातसुद्धा काही लाइट खाली ठेवलेले असतात. सिन-सीनरी दाखवताना स्पॉट लाईट किंवा इतर लाईटस् वापरले जातात.

ध्वनी योजना - दहाबारा भोंगे गावाबाहेर झाडांवर, पाण्याच्या उंच टाकीवर वेगवेगळ्या दिशांना तोंडे करून लावले जातात. नाटकाची जाहिरात शेजारपाजारच्या गावांना ऐकू जावी हा उद्देश त्यामागील असतो. स्टेजमध्ये साउंड बॉक्स आणि लहान भोंगे असतात. रात्री नाटक सुरू झाल्यानंतर बाहेरील मोठे भोंगे बंद करून स्टेजमधील भोंगे सुरू ठेवले जातात. नाटकातील पात्रांचा आवाज शेवटच्या रसिकापर्यंत पोचला जावा यासाठी स्पीकरचा आवाज मोठा केलेला असतो. स्टेजच्या मध्यभागी अंक पडद्याजवळ अॅडजस्टेबल चांगल्या प्रतीचा माईक बांधलेला असतो. इतर एकदोन माईक स्टेजच्या फ्लॅट सीनच्या जवळपास असतात. पात्रांना साजेसे मेकअप आणि ड्रेसिंग केले जाते. संगीत संयोजन हा संगीत नाटकांचा आत्मा आहे. पौराणिक, ऐतिहासिक वा सामाजिक नाटकांतील नाट्यगीते अथवा पदे हार्मोनियम आणि तबला यांच्या साथीवर व ठेक्यावर बसवली जातात. पायपेटी हे विकसित वाद्यसुद्धा वाजवले जाते. कॅशिओ, बुलबुल तरंग, ऑर्गन, ऑक्टोप्याड ही इलेक्ट्रॉनिक वाद्येसुद्धा नाटकाला संगीत साज चढवण्यासाठी वापरतात. सध्या नाल (ढोलकी), तबला, ऑर्गन, ऑक्टोप्याड वापरून संगीत दिले जाते. नाट्यपदांची जागा भावगीतांनी घेतली आहे. लावणी, भावगीत, प्रेमगीत अशी संगीतमय मेजवानी हे रसिकांच्या आवडीचे बलस्थान आहे. तबला वादक, ऑक्टोप्याड वादक आणि ऑर्गन वादक हे स्टेजच्या समोरील बाजूस, कलावंतांकडे तोंड करून असलेल्या बैठक व्यवस्थेत बसतात.

नवरगाव येथील फिरता रंगमंच

प्रत्येक नाटक हे तीन अंकांचे असते. एका अंकात साधारणतः पाच प्रवेश असतात. काही नाटकांमध्ये पहिल्या अंकात पाच ते सात प्रवेश असतात. प्रत्येक अंक झाल्यानंतर अंक पडदा पडतो. प्रत्येक अंकानंतर एक रेकॉर्डिंग डान्स किंवा एखाद्या मंडळाच्या फर्माइशीवर गायकाकडून गाणे ऐकवले जाते. आवडल्यास रसिकांचा हंसमोर’ (वन्स मोअर) मिळतो. अंकानंतर लघुविश्रांती असते. त्यात मंडळाला देणगी स्वरूपात मिळालेल्या रकमेची अनाऊन्समेंट होते. उदाहरणार्थ, आजच्या नाटकाचे उद्घाटक ......... यांच्याकडून पाच हजार मिळाले. मंडळ त्यांचे आभारी आहे. नुकत्याच झालेल्या रेकॉर्डिंग डान्ससाठी अध्यक्षांकडून पाचशेएक रूपयांचे बक्षिस मिळाले. नाटकातील विनोदाचा बादशहा पठाणबाबू यांना एकशेएक रूपयांचे बक्षिस प्रेक्षक श्री ..... यांच्याकडून मिळाले वगैरे वगैरे. नाटकाच्या मंडळाला मिळालेली देणगी त्या मंडळाचे कोषाध्यक्ष स्वीकारतात. ज्या कलावंतांना वैयक्तिक बक्षिसे मिळतात ते कलावंत ती ती बक्षिसे स्वीकारतात. ती त्यांची वैयक्तिक मिळकत असते.


फिरता रंगमंचदेखील झाडीपट्टीत आहे. तो एकमेव रंगमंच प्रा.सदानंद बोरकर यांच्या व्यंकटेश नाट्य रंगभूमी (नवरगाव) यांनी तयार केलेला आहे. बोरकर फिरत्या रंगमंचाची संकल्पना पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वीची असल्याचे सांगतात. छोटुभाई मिस्त्री यांनी त्या रंगमंचाचे काम केले, तर दागोबाजी लोखंडे यांनी त्याचे लाकडी काम केले. पूर्वी फिरत्या रंगमंचाचा व्यास हा सव्वीस फूटांचा होता. त्याला बेचाळीस चाके लावलेली असायची. त्यासाठी राईस मिलचे शंभरसव्वाशे किलोचे लोखंडी व्हिल वापरत असत. रंगमंचावर तीन भाग करून तीन वेगवेगळी दृश्ये दाखवण्यासाठी त्यांचा वापर केला जात असे. तो रंगमंच दृश्यबदल दाखवण्यासाठी फिरवण्यास तीन माणसांची गरज असायची. काही वर्षांनंतर त्यात थोडा बदल करून, व्यासाचा आकार कमी करून चोवीस फूटांचा करण्यात आला. आता लोखंडी चाकांऐवजी रबरी चाके वापरण्यात येतात. त्यामुळे त्रास थोडा कमी झाला. व्यंकटेश नाट्य मंडळाने हजारो प्रयोग फिरत्या रंगमंचावर सादर केले आहेत. त्यात तो मी नव्हेच’, अश्रूंची झाली फुले’, ‘माझं कुंकू मीच पुसलं’, आत्महत्या’, ‘नवरे झाले बावरे अशा नाटकांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल असे सदानंद बोरकर सांगतात.

रोशनकुमार शामजी पिलेवान 7798509816 roshankumarpilewan11@gmail.com

रोशनकुमार पिलेवान यांच्या कथा, कविता, गझल विविध नियतकालिकांत आणि दिवाळीअंकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. ते  विज्ञान विषयाचे कवठाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत (तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर). त्यांचे शिक्षण एम ए, बी एससी, डी एड पर्यंत झाले आहे. त्यांचा ‘ठिगळ’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी आक्रीत, पाऊसपाणी आणि हा जीव तुझ्यावर जडला या नाटकांचे लेखन व प्रयोगांचे सादरीकरण झाडीपट्टीसाठी केले आहे. ते व्यावसायिक आणि स्पर्धात्मक नाटकांत अभिनयही करतात.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


रंगमंच तयार करणारे कारागीर

पुरुष कलावंतांची मेकअप रूम
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सोमवार, १८ जानेवारी, २०२१

वडसा (देसाईगंज) - द झाडीवूड! (WADSA - The Jhadistage)

 


गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) हे शहर अलिकडे झाडीवूड म्हणून नावारूपास येत आहे. मुंबईला जसे बॉलिवूड’, तसे विदर्भाच्या झाडीपट्टीतील वडसा हे झाडीवूड’. बॉलिवूड हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे, तर झाडीवूड मात्र नाटकांसाठी. झाडी नाटकांचा सीझन चार-पाच महिन्यांचा असतो - नोव्हेंबर ते फेब्रुवारी-मार्च. तरीदेखील तेथे पन्नास-साठ नाटक कंपन्या आहेत. जवळपास पाचशे पुरूष कलावंत तर अडीचशे स्त्री कलावंत आणि संगीतसाथ करणारे दोनशे कलावंत. पडद्यामागील नेपथ्यध्वनी व प्रकाशयोजना साकारणारे, मंडप बांधकाम-डेकोरेशन करणारे शे-पाचशे कारागीर अशा दीडएक हजार लोकांची चूल झाडी नाट्यव्यवसायावर पेटवली जाते. पाचसात हजार लोकवस्तीच्या गावी हा चमत्कारच म्हणायचा! झाडीपट्टीत गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया हे चार जिल्हे मुख्यत: येतात. तेथे नाट्यप्रयोग गावोगावी होतात आणि नाटकांना प्रेक्षकवर्ग येतो तो दूरदूरच्या खेड्यापाड्यांतून. वडसा हे झाडीपट्टीतील व्यावसायिक नाटकांचे मुख्य केंद्र गेल्या तीस चाळीस वर्षांत बनले आहे.

वडसा येथे रंगवैभव रंगभूमीवर मकरंद अनासपुरे

झाडीवूडने पुण्या-मुंबईच्या प्रसिद्ध सिने-नाट्यकलावंतांना देखील भुरळ घातली आहे. त्यामुळे मोहन जोशीमकरंद अनासपुरे, दीपक शिर्केरमेश भाटकरअरूण नलावडे यांच्यासारखे सिनेनट सीझनमध्ये महिना-पंधरा दिवस वडसा येथे येऊन राहतात व ‘झाडी नाटक’ करतात. म्हणूनच त्यास बॉलिवूडच्या धर्तीवर झाडीवूड म्हणतातपुण्या-मुंबईची मंडळी वडसा येथे रूम भाडेतत्त्वावर घेऊन राहतात. नागपूर किंवा इतर लांबची कलावंत मंडळीसुद्धा तेथेच भाड्याने एकत्र किंवा स्वतंत्र राहतात. मोहन जोशी वगैरे अनिल नाकतोडे या प्रसिद्ध झाडी अभिनेत्याच्या घरी, उदापूरला राहत. रमेश भाटकरमकरंद अनासपुरे हॉटेलवर थांबतात. भाटकर आता हयात नाहीत. आणखीही काही सिनेनटांनी झाडीवूडच्या रंगभूमीवर अभिनयासाठी हजेरी लावली आहे. परंतु सिनेनट्यांनी मात्र तिकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. वर्षा उसगावकर, माहेरची साडीफेम अलका कुबल ह्या नाटकांच्या उद्घाटनासाठी फक्त येऊन गेल्या आहेत. त्यांना पाहण्यासाठी रसिकांनी अफाट गर्दी केली होती! झाडीपट्टीच्या बाहेरून येणारे कलावंत नाटकाच्या आधी एक दिवस येतात आणि स्थानिक कलाकारांबरोबर तालीम करतात. त्यांना नाट्यसंहिता निर्मात्याकडून आधीच पाठवली जाते.


वडसा येथे पन्नास ते साठ व्यावसायिक नाटक कंपन्या सक्रिय आहेत. दुसऱ्या बाजूस झाडीच्या गावागावांत दुर्गा मंडळ, गणेश मंडळ, युवा मंडळ, रमाई मंडळ, पंचशील मंडळ अशी हौशी मंडळे आहेत. ती त्यांच्या इतर उपक्रमांबरोबर व्यावसायिक कंपन्यांच्या नाटकांचे आयोजनही करत असतात. तेही त्यांच्या उत्पन्नाचे साधन असते. प्रत्येक गावी वर्षभरात नाटकाचे एकाददोन कार्यक्रम होतात. मंडळ नाटकाच्या निर्मात्यास चाळीस ते साठ हजार रूपयांपर्यंत ठरावीक रक्कम देते. त्या पैशांत निर्माता मंडळास नाटकाचे दोन बॅनर, चारशे पॅम्फलेटस्, शंभर मानपत्रे आणि दोन हजार तिकिटे पुरवतो. शिवाय निर्माता मंडप, डेकोरेशन, नेपथ्य, संगीत आणि नाट्य कलावंत इत्यादी उपलब्ध करून देतो. आयोजक मंडळ परिसरातील गावांमध्ये जाऊन नाटकाची जाहिरात करते. त्यासाठी मोबाईल, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा आधुनिक साधनांचा वापर करते. नातेवाईक, मित्रमंडळी असे त्यांचे स्वतःचे नेटवर्क असते ते वेगळेच. नाट्यप्रयोगाच्या दिवशी दिवसभर भोंगे लावून नाटकाची जाहिरात करणारी रिक्षा शेजारच्या गावा गावांमध्ये फिरवली जाते.

एक टप्पा आऊट मालिकेतील कलावंत श्रीवल्लभ भट आणि इतर

सहसा मंडळांकडून नाटकांचे आयोजन काहीतरी, निमित्त साधून केले जाते. बैलांचे इनामी शंकरपट हे त्यासाठी हमखास निमित्त असे. पण आता बैलांच्या शर्यती कायद्याने बंद झाल्या. परंतु मंडई (मंडई म्हणजे ठरवून घेतलेला बाजार. पण त्याला जत्रेचे स्वरूप असते), कीर्तन सप्ताह काला, कोणा थोर पुरुषाची जयंती, सण-उत्सव, जत्रा अशी निमित्ते असतातच. त्यामुळे माणसांची गर्दी पूर्वीपासूनच होई. तेथे दंडारसारखे स्थानिक लोकनाट्याचे प्रयोग होत. ती मोठीच करमणूक असे. आता तेथ विविध मनोरंजनाची नाटके केली जातात. पण लोकांना या नाटकाचे वेड इतके लागून गेले आहे, की आता निमित्त नसले तरी नाटके होत राहतात. काही गावी, दरवर्षी त्याच तारखेला नाटक आयोजित करायचे असेही ठरवले गेलेले आहे. उदाहरणार्थ पिंपळगाव भोसले येथे 30 नोव्हेंबर, उदापूरला (चंद्रपूर) 16 जानेवारी, रेंगेपार (भंडारा) येथे वसंत पंचमीला हे प्रयोग ठरलेले असतात. उदापूरमध्ये, माझ्या गावी इनामी शंकरपटाचे आयोजन दरवर्षी 16 जानेवारीला होत असे. त्या निमित्ताने तेथे नाटक हे समीकरण ठरून गेले होते. आता शंकरपट बंद झाले असले तरी नाट्य परंपरा चालू आहे! इतके लोकांना नाटकवेड लागून गेले आहे. गावात एका रात्री लाखाची उलाढाल होते. हरवलेला माणूस गर्दीत शोधणे त्या रात्री कठीणच! गावात प्रत्येकाच्या घरी अधिकचे जेवण बनवून ठेवलेले असते. कोण कोणाच्या घरी पाहुणा आला हेही कळण्यास मार्ग नसतो. यानिमित्ताने लग्नाच्या वाटाघाटी, मुलीला दाखवणे असेही कार्यक्रम उरकून घेतले जातात. माणसे नाटकांसाठी कोसो दूर प्रवास करतात. रात्ररात्र जागतात.

नाटकाचे संगीत संयोजन करणारी मंडळी आणि उपस्थित रसिकांची गर्दी

नाटक तीन तासांचे नसते, रात्री दहा-साडेदहाला सुरू झालेले नाटक पहाटे साडेचार-पाचलाच संपते. नाटकात नृत्य, लावण्या, गीत, प्रत्येक अंकानंतर रेकॉर्डिंग, डान्स असा मसाला भरपूर असतो. त्यामुळे रसिकांना ते सारे मनापासून आवडते. नाटकास हजारो प्रेक्षक येतात. गावातील प्रत्येकाच्या घरी पाच-दहा पाहुणे नाटकाच्या दिवशी जमतात. नाटक जर तीन तासांत संपले तर तेवढ्या पाहुण्यांना घरी झोपण्याची अडचण होईल! त्यात नाटकांचा हंगाम म्हणजे कुडकुडत्या थंडीचे दिवस. म्हणून नाटक आयोजक मंडळे निर्मात्यांकडे पहाटे पाचपर्यंत चालणाऱ्या नाटकाची मागणी करतात. मग प्रेक्षकांकडून सहकुटुंब सहपरिवार असा नाटकाचा आस्वाद घेतला जातो. जुनी गोष्ट आहे. एकदा कुरूड या गावात रमेश भाटकर यांचे षड् यंत्र आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बिघडले स्वर्गाचे दारह्या दोन नाटकांचे प्रयोग होते. योगायोग असा, की दोन्ही प्रयोग रात्री दोनच्या बेतास संपले. पाहुण्यांची झाली पंचाइत, आता करायचे काय? पण त्यावेळी गावात एकाच रात्री नऊ कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मग काय? ती दोन्ही नाटके बघण्यास गेलेल्या रसिकांना पुन्हा दुसरे तिकिट काढून मिळेल त्या थिएटरमध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्यांच्या खिशाला दुहेरी तिकिटांची कात्री बसली. काय करणार? रात्री दोन वाजल्यापासून सकाळी सहापर्यंत थंडीत कुडकुडत कसे बसणार? कुरूड गावचे नऊ कार्यक्रम ही झाडीपट्टीतील वेगळीच गंमत आहे. मोहल्ल्या मोहल्ल्यांतील तरूण मुले असे वेगळे कार्यक्रम रात्रभर करत असतात. लोक तेही तिकिट काढून पाहतात.


नाट्यनिर्माता ज्या बॅनरखाली नाटकांची निर्मिती करतो त्याला झाडीपट्टीत प्रेस किंवा कंपनी म्हणतात. उदाहरणार्थ येथे महाराष्ट्र कला रंगभूमीला प्रेस/कंपनी म्हणतात. साधारणतः एका प्रेसचा एकच ग्रूप असतो. ग्रूप म्हणजे नटनट्यांचा एक संच व त्यांनी बसवलेले नाटक. संच वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करू शकतो. एका ग्रूपमध्ये सात पुरूष आणि चार स्त्री कलाकार असलेले नाटक सध्या झाडीपट्टीमध्ये चालते. काही वेळा सात पुरूष, चार स्त्रिया आणि बालकलावंत अशी नाट्यसंहिता असलेले प्रयोगही सादर होतात. महाराष्ट्र रंगभूमीतर्फे एका वेळी दोन ग्रूप दोन नाटकांचे दोन प्रयोग चालवायचेआता फक्त स्व.धनंजय स्मृती कला रंगभूमीच दोन ग्रूप चालवताना दिसते. एक गट हा नामांकित कलावंतांचा असतो. त्यांचे जास्त प्रयोग लागतात. दुसऱ्या गटात काही कलावंत नवखे असतात.


नाटकांचे बरेच निर्माते हे वडसाचे आहेत, चंद्रपूरसिंदेवाहीब्रह्मपुरीसाकोली, अर्जुनी, गडचिरोली येथेही काही ग्रूप त्यांची दुकाने लावून बसलेले आहेत. गावोगावच्या नाट्यप्रयोगांची बुकिंग करण्यास येणारे मंडळ कार्यकर्ते चारी जिल्ह्यांतून वडसालाच येतात. म्हणून बऱ्याच निर्मात्यांनी वडसा गावात कार्यालये उघडली आहेत. वडसा-लाखांदूर रोडवर रस्त्याच्या दुतर्फा लावलेले नाटकांचे रंगारंग होर्डिंग लोकांचे लक्ष वेधून घेत असतात.

नाटकाची जाहिरात

प्रयोगाच्या दिवशी सर्व कलावंत मंडळी त्यांना दिलेल्या वेळी प्रयोगाच्या ठिकाणी पोचतात. ते बंधनकारक असते. साधारणतः प्रयोग असलेले गाव हे वडसा कार्यालयापासून किती अंतरावर आहे, तेथे पोचण्यास किती वेळ लागू शकतो हे बघून दुपारी दोन ते सहाच्या दरम्यान कलावंत आणि संगीतकार यांचे वाहन वडसाहून निघते. स्टेज सजावट, मंडप डेकोरेशन, साऊंड सर्विस सकाळीच नाटकाच्या गावात पोचलेले असतात. ते नाटकासाठी रंगमंच तयार करून ठेवतात. एका सीझनला उदापूर गावात पाहिजे तेवढा पाहुण्यांचा राबता दिसत नव्हता. कारण दरवर्षी होणारे शंकरपट बंद झाले होते. तरीही गावात दोन नाटकांचे आयोजन केले होते. मंडळांचे सदस्य नाटकांची बुकिंग होणार की नाही या विवंचनेत होते. रात्री आठ-साडेआठ वाजेपर्यंत एकही तिकिट कटले नाही. मंडळ कार्यकर्त्यांना पैसा निघणार की नाही ही चिंता सतावत होती. पण नंतर मात्र दहा वाजेपर्यंत दोन्ही थिएटर हाऊसफुल्ल झाले. दोन्ही बाजूंला प्रत्येकी पन्नास-साठ हजारांचे बुकिंग झाले होते आणि मंडळांचा पूर्णतः विश्वास बसला की नाटक हे शंकरपटावर अवलंबून नसून जनतेच्या रसिकतेवर अवलंबून आहे. झाडीची माणसे खरेच नाट्यवेडी आहेत!

निर्मात्याचे अर्थकारण साधारण असे असते- एका निर्मात्याकडे मुख्य पात्रे करणारे सात पुरूष (त्यांचे मानधन एका प्रयोगाचे एक हजार ते सात हजार आणि सिनेकलावंतांना पंधरा ते पंचवीस हजार), चार स्त्री कलावंत (दोन हजार ते बारा हजार प्रती प्रयोग) असतात. लेखक असतो. दोन विंगांत दोन पार्श्वसूचक (प्रॉम्प्टर) असतात. एका नाटकाचे चार प्रयोग झाले, की पार्श्वसूचकाचे काम कमी होते. पण त्यांना मानधन सुरू राहते, कारण त्यांना सुट्टी दिल्यास ते पुन्हा येत नाहीत. पुढील वेळी नवा गडी शोधणे म्हणजे कठीण काम असते. एक तबला, एक ऑर्गन आणि एक ऑक्टोप्याड वादक मिळून तिघांचा संगीतकार गट असतो. नेपथ्याचे साहित्य पुरवणारी तीन माणसेरंगकाम करणारे दोन, मंडप तयार करणारे जवळपास दहा-बारा आणि ध्वनी व प्रकाशयोजना सांभाळणारे एक-एक नाट्यकर्मी असतात. ही कलाकार व कारागीर माणसे केवळ नाटकांतून मिळणाऱ्या मिळकतीवर अवलंबून नाहीत. ते शेती आणि त्यावर आधारित मोलमजुरी किंवा इतर कामे करून चरितार्थ भागवतात. उदाहरणार्थ उन्हाळ्यात लग्नाचा सीजन चालू होतो. तेथे डेकोरेशनवाले काम करतात. गायनाच्या कार्यक्रमात संगीतकार मंडळी असतात. नाटक ही अधिकतर हौस असते, पण निर्मात्यांचा मात्र तो व्यवसाय असतो. नाट्यनिर्मात्यास प्रत्येक प्रयोगास साधारण दहा हजार रुपये मिळतात. तीस वर्षांआधी टिपू सुलतान या नाटकात जिवंत घोडा स्टेजवर बघायला अफाट गर्दी झालेली होती. त्या वेळी मंडळाला निव्वळ नफा लाख-सव्वा लाख रुपये झाला होता. त्यातूनच पिंपळगाव भोसले येथील दुर्गामंदिर आणि जेठूजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.

टीप - उदापूरची शंकरपट परिसरात नावाजलेली होती. शंकरपट म्हणजे बैलांची धावण्याची शर्यत. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चारही जिल्ह्यांतील जोड्या शर्यतीसाठी पटाच्या दानीवर उतरायच्या. पटाची जोडी म्हणजे खास शर्यतीकरता राखून ठेवलेलीपोसलेली बैलजोडी. सामान्य कामकरी बैलांपेक्षा त्यांच्यासाठी खाण्याचा खास रतीब ठेवला जातो. ती बैलजोडी बैलगाडीसारख्याच पण आकाराने लहान व हलक्या अशा ’छकडा’ नावाच्या साधनाला जुंपतात. त्यात स्त्रियासुद्धा हिरिरीने भाग घेतात. बैल पळवण्याच्या नादात त्यांना अमानुषपणे तुतारीने ढोसलेही जाई, सोबत सट्टेबाजीही चालायची. हल्ली तो प्रकार कायद्याने बंद झाला.

रोशनकुमार शामजी पिलेवान 7798509816 roshankumarpilewan11@gmail.com

रोशनकुमार पिलेवान यांच्या कथा, कविता, गझल विविध नियतकालिकांत आणि दिवाळीअंकांत प्रसिद्ध झाल्या आहेत. ते  विज्ञान विषयाचे कवठाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत (तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर). त्यांचे शिक्षण एम ए, बी एससी, डी एड पर्यंत झाले आहे. त्यांचा ठिगळ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी आक्रीत, पाऊसपाणी आणि हा जीव तुझ्यावर जडला या नाटकांचे लेखन व प्रयोगांचे सादरीकरण झाडीपट्टीसाठी केले आहे. ते व्यावसायिक आणि स्पर्धात्मक नाटकांत अभिनयही करतात.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


 
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------