Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

नववे साहित्य संमेलन 1915 (Marathi Literature Meet 1915)

 


नववे साहित्य संमेलन 1915 साली मुंबई येथे मिरज संस्थानचे संस्थानिक श्रीमंत गंगाधरराव पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. गंगाधरराव पटवर्धन हे तसे पाहिले तर साहित्यिक नव्हते. ते प्रसिद्ध होते मल्लविद्येच्या संवर्धनासाठी. पण त्यांना साहित्याची आवड होती, ते रसिक होते. शिवाय गंगाधरराव स्वत: मल्लविशारद होते आणि त्यांनी मल्लविद्येचे सशास्त्र शिक्षण घेतले होते. त्यांनी त्यावर काही पुस्तकेही लिहिली होती. त्यांची साहित्यिक कारकीर्द साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे एवढी मोठी निश्चितच नव्हती. त्यांना शास्त्रविषयक गोडी होती आणि त्यांची इच्छा सर्व आधुनिक विज्ञान मातृभाषेत यावे अशी होती. त्यांनी स्वत: ‘व्यवहारोपयोगी रसायनशास्त्र हा ग्रंथही लिहिला होता. ते कीर्तने करत. ते गोष्टीवेल्हाळ होते. त्यांना धंदा आणि कला यांना उत्तेजन द्यावेसे वाटे. त्यांनी गणेश कलागृहनावाचे एक वर्कशॉप काढले होते. त्यांनी सरदार मुजुमदार यांच्या व्यायाम ज्ञानकोशासाठीही लेखन केले.

त्यांचे नाव गंगाधर गणेश ऊर्फ बाळासाहेब पटवर्धन. मूळ नाव गोपाळराव रावसाहेब होते. त्यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1866 रोजी बारामती येथे झाला. मिरज संस्थानच्या राणीसाहेबांनी त्यांना त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी दत्तक घेतले. त्यांचे शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलात प्रा. बाळाजी प्रभाकर मोडक यांच्या देखरेखीखाली झाले. ते एकविसाव्या वर्षी मिरज संस्थानचे संस्थानिक झाले. त्यांनी पुराणे म्हणजे काय?’, व्यवहारोपयोगी’, ‘रसायनशास्त्र, मल्लविद्याशास्त्र’, ‘भीमसेनी कुस्ती अशा व्यायामविषयक पुस्तकांचे लेखन केले.

त्यांनी अध्यक्षीय भाषणात विचार मांडताना म्हटले, की प्राचीन कवींचे वाङ्मय मानवी स्वरूपाची पूर्णता करण्यास उपकारक आहे, हे ध्यानात ठेवून आपण सर्वांनी ते वाङ्मय आपलेसे करण्याचा, निदान एका संताच्या अथवा कवीच्या एका ग्रंथाचा तरी नैष्ठिक अभ्यास करावा,त्यांचा मृत्यू 11 डिसेंबर 1939 रोजी झाला.

- वामन देशपांडे 91676 86695, चित्रकार सुरेश लोटलीकर 99200 89488

वामन देशपांडे हे ज्येष्ठ लेखक व संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीते, भक्तिगीते, संत साहित्य अशा विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांची एकशे नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी विविध ठिकाणच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये रसिक वाचक म्हणून हजेरी लावली आहे. ते डोंबिवली येथे राहतात.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------  

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. गंगाधरराव पटवर्धन यांनी आधुनिक विज्ञान मराठीत यावे हा किती मोठा विचार केला होता. काळाच्या कसोटीवर द्रष्टया महान व्यक्ती विचार करतात.
    वर्तमान काळातही हा विचार अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. विज्ञानविषयक साहित्य मराठीत यावे ही दूरदष्टी महत्वाची आहे.

    उत्तर द्याहटवा