बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

बुद्धविहार संस्कृतीच्या शोधात... (Integration Of Buddhavihar Culture)

बुद्ध विहार समन्वय समितीने बुद्ध विहार संस्कृती निर्माण करण्यासाठी 2014 ते 2040 या काळादरम्यान सत्तावीस वर्षांचा कार्यक्रम आखला आहे. पैकी 2014 ते 2020 हा प्रथम चरण पूर्ण होत आला असून त्यात दहा हजार बुद्ध विहारांच्या पाचशे प्रतिनिधींची परिषद नागपूरला भरवली गेली होती. परिषदेचे शीर्षक होते बुद्ध विहारोंका प्रथम अधिवेशन. त्यास भिख्खुगण, उपासक, विचारवंत, लेखक यांची उपस्थिती होती. बुद्ध विहार समन्वय समितीने महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांतील सर्व विहारांचे राज्यस्तरीय अधिवेशन नागपूरला आयोजित करणे ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. अधिवेशनामधील निर्णय सर्वमान्य, उपयुक्त असतात. अधिवेशन हा सर्वांनी मान्य केलेला कायदाच असतो. त्यामध्ये संघटनेची ध्येयधोरणे, उपक्रम, मार्गदर्शक, प्रशिक्षक, कार्यालय, प्रशिक्षित कार्यकर्ते, समर्थक, संघटनेचे आर्थिक नियोजन, जनतेचे प्रश्न समजून त्यासाठी जन आंदोलन, चर्चा, बहुमताने निर्णय घेणे, निर्णयाची अमलबजावणी करणे, विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देणे, बौद्धजनांत बौद्ध प्रतीके, चिन्हे यांविषयी आदर निर्माण करणे, बौद्ध धम्म सहलींचे आयोजन कमीत कमी दरात उपलब्ध करून देणे त्या सर्वांचा समावेश होता. त्यामुळे बौद्ध धम्माचे धार्मिक व आचरणशील जैविक संस्कार विकसित होतील अशी आशा आहे.

सत्तावीस वर्षांच्या कार्यक्रमातील पहिल्या टप्प्यात काही उत्तम गोष्टी घडून आल्या आहेत. 1. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगण, गोवा, उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील पाचशे बुद्ध विहारांत पंधरा हजार लोकांनी पाली भाषेची परीक्षा दिली आहे. 2. बुद्ध विहार संस्कृती साप्ताहिक व्याख्यानमाला नागपूर येथे छत्तीस विहारांत चालवण्यात येत आहे. 3. दहा हजार डायऱ्यांचे वितरण केले गेले आहे. 4. अर्थशास्त्र विकसित करण्यासाठी पाढऱ्या साड्या, पांढरे शर्ट, पायजमे यांचे वितरण करून, धम्मदानातून विहार समन्वय समितीचा खर्च भागवला जात आहे.


श्रद्धा व्यक्त करावी
, मन:शांती मिळावी म्हणून विहारांकडे पाहिले जाते. धम्माच्या सद्गुणांचे परिपोषण विहारांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे बौद्ध धम्माच्या अस्तित्वाकरता, मानवाच्या सुखी जीवनाकरता, प्रगतीकरता विहार ही आवश्यक गोष्ट ठरते. अशा सर्व बौद्ध विहारांचा समन्वय ही काळाची गरज आहे. तेच कार्य बुद्ध विहार समन्वय समितीने हाती घेतले आहे. बौद्ध धम्म हा वैचारिक, परिवर्तनशील, मानवतावादी धम्म आहे. विहारांतून नमो बुद्धाय, जयभीम, बावीस प्रतिज्ञा, पंचशील; तसेच प्रज्ञा, करूणा हे शब्द ऐकण्यास मिळतात. मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना, परिवर्तनवादी दिशेने प्रवास कसा करायचा, काय सोबत घ्यायचे व काय सोबत घेऊ नये, नव्या परिस्थितीशी सामना कसा करावा, नवे प्रश्न कोणते, परिवर्तनाची ताकद वाढवण्यासाठी सम्यक उत्तरांबरोबर सम्यक आचरणाची जाण असे विविध तऱ्हेचे मार्गदर्शन विहारांतून व्हावे हे अपेक्षित आहे. अनेक बुद्ध विहार 14 ऑक्टोबर 1956 नंतर बांधले गेले आहेत. मात्र त्यांचा वारसा अशोककालीन स्तूप, विहार, नालंदा-तक्षशिला-विक्रमशीला-उदंती-अजिंठा लेणी असा ऐतिहासिक आहे.

धम्माचा आशय कळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्महा वैज्ञानिक ग्रंथ लिहिला. आता गावागावांत, वस्ती-मोहल्ल्यांत विहार झाले आहेत. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर साठ वर्षे झाली, तरी बौद्ध संस्कृती किंवा विहार संस्कृती मात्र निर्माण होऊ शकलेली नाही. संवाद-संबंध जुळले गेलेले नाहीत. करुणा, मैत्री, त्याग, सहकार्य, आपुलकी, अहिंसा या मानवी मूल्यांपासून समाज दूर जाताना दिसत आहे. राग, द्वेष, लोभ, भय, दु:, शोक, माया या विकारांनी समाज पछाडला आहे.

विहारांचे जीवनात असलेले महत्त्व न कळल्यामुळे विहार संस्कृती निर्माण होऊ शकलेली नाही. बाबासाहेबांविषयी जेवढी श्रद्धा समाजात आहे तेवढीच श्रद्धा बौद्ध धम्माबद्दल असण्यास हवी, पण तसे दिसत नाही. तशी आस्था रूजवण्यास भिक्खुसंघ, उपासक, कार्यकर्ते कमी पडले आहेत. राजकारणी, विविध पक्षांचे लोक स्वार्थ, अहंकार, पदांची लालसा यांत गुरफटले आहेत. त्यामुळे धम्माकडे दुर्लक्ष झाले आहे. धम्मावर चांगले भाषण करणारा जर आचरणशून्य असेल तर धम्मधर होऊ शकत नाही. तसेच भाषेचा अभाव म्हणजे पाली भाषेतील वंदना-पूजापाठ याचा अर्थ कळण्यासाठी पाली भाषा मुळापासून शिकल्यास बुद्ध वंदन हृदयापर्यंत पोचू शकेल. बुद्ध-धम्म-संघ याविषयी सखोल विचार केल्यास भगवान बुद्ध हा मार्गदाता, महामानव म्हणून त्यावर आदरयुक्त श्रद्धा ठेवली गेली पाहिजे. देव, कर्मकांडे नाकारली पाहिजेत. युवा वर्गाला विहारात येण्यासाठी, धम्म कार्यात सहभागी होण्यासाठी कार्यक्रम, उपक्रम यांचे आयोजन केले गेले पाहिजे. बालसंस्कार शिबिरे, धम्म शिबिरे, गीतस्पर्धा, काव्यस्पर्धा, निबंधस्पर्धा वगैरेंद्वारा आंबेडकर स्टडी सर्कल तयार करून वाद-संवाद, चर्चा यांमार्फत धम्मज्ञान वर्ग चालवले गेले पाहिजेत. त्यासाठीच बुद्ध विहार समन्वय समिती स्थापन झाली आहे. ती समिती गावापासून ते राष्ट्रीय स्तरावर समन्वय साधत आहे.

विहार समन्वय समितीच्या अधिवेशनात भदन्त मेघंकर महाथेरो (श्रीलंका) यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व उद्घाटन झाले. धम्मचारी मैत्रीवीर नागार्जुन (हैदराबाद) यांचे धम्मावरील भाषण झाले. त्याशिवाय 1.  भगवान बुद्ध शासन समृद्ध करने की आवश्यकता, 2. 2021 में होनेवाली जनगणनामे क्या लिखना चाहिए ताकी बौद्धोंकी संख्या भी बढे और सवलतीयाँ भी बरकार रहे | 3. धम्मसंस्कार मजबुतीका कार्य महिला वर्ग अच्छी तरहसे कर सकती है | 4. बुद्ध विहार संस्कृती का मूलाधार भिक्खु संघ है| अशा चार विषयांवर विचारवंत व अभ्यासकांनी व्याख्याने दिली. अधिवेशन अशोक सरस्वती बोधी यांच्या प्रयत्नातून साकार झाले.

बाबासाहेब आंबेडकर यांनी सामुदायिक प्रार्थना कशी करावी याबद्दल सांगितले, की मी बौद्ध धम्माचा उपासक आहे. मी नुसता बौद्ध धम्म घेतलेला नाही, नुसता बोलतो असेही नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवीन. माझे शेवटचे आयुष्य मी आता बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी खर्च करण्याचे निश्चित केले आहे. बाबासाहेबांचे हे विधान अधिवेशनामध्ये वारंवार उल्लेखले गेले. विहार समन्वय समितीच्या अधिवेशनातील अतिशय ज्वलंत प्रश्नांवरील परिसंवाद म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये भरल्या जाणाऱ्या फॉर्ममध्ये 7 नंबरच्या धर्माच्या रकान्यात आपण पेनाने (पेन्सिलने नाही) बौद्ध असे लिहावे आणि 8 नंबरच्या रकान्यात अनुसूचित जाती किंवा एस.सी. असे लिहावे. असे अनेक अभ्यासकांचे मत पडले. त्यावर अनेकांनी साधकबाधक चर्चा केली. जिज्ञासूंचे प्रश्न पुढीलप्रमाणे होते -

1. आम्ही धर्मांतर केले, आता आम्ही बौद्ध झालो. बौद्ध हा धर्मच नाही तो धम्म आहे.

2. जातीच्या रकान्यात जर महार लिहिले तर आपला स्वाभिमान, अस्मिता याचे काय? जाती नष्ट करणण्यासाठी आम्ही बौद्ध धम्म घेतला.

3. जनगणनेत जात लिहिली तर बौद्ध धम्मात आल्यावरही जाती-जातीव्यवस्था कायम राहणार असेल तर कोणी कशाला बौद्ध धर्मात येतील? आमची ओळख बौद्ध महार, तेली बौद्ध, कुणबी बौद्ध, भटके बौद्ध अशी होईल.

4. आम्ही आई-वडिलांनी ठेवलेली नावे राम, कृष्ण, घन:श्याम, रामदास, देवीदास अशी कितीतरी देवादिकांचे बदलली नाहीत. त्या नावांनी जन्मभर मिरवतो. त्यातून हिंदू धर्माची पदोपदी आठवण होते. त्याचे काय करावे?

5. आडनावांवरून जात ओळखली जाते, ती आडनावे आपण बदलावी काय? आज आम्ही बौद्ध धम्म घेतला तरी नव्वद टक्के नवबौद्ध (जे सुशिक्षित, स्वाभिमानी असूनही) मुलांच्या प्रमाणपत्रात केवळ हिंदू व महार लिहिणारे असल्याचे दिसते. काहींचे म्हणणे असे की आपण फक्त दर दहा वर्षांनी येणाऱ्या जनगणनेत फॉर्म भरून देण्यापुरता विचार करत आहोत. म्हणून बौद्ध-एस्सी असे लिहावे. आपल्याला सवलती बाबासाहेबांनी मिळवून दिल्या. बौद्ध धम्मही दिला. मनात बौद्ध धम्माचे अनुकरण करावे. संविधानाला प्रमाण मानावे. भावनात्मक रीतीने वाटचाल न करता बुद्धिवादी दृष्टीने समाज सुशिक्षित, संघटित बनवण्यासाठी प्रयत्न करावा. जागतिक स्तरावर आपली बौद्धांची संख्या वाढणारच आहे. भाषेत मातृभाषेबरोबरच पालीचा उल्लेख करावा. अशी मत-मतांतरे चर्चिली गेली.

अशा प्रकारच्या अधिवेशनाची तुलना बुद्धकालीन धम्म संगितीशीच केली जाऊ शकते. बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करीन हे स्वप्नही साकार झाल्याशिवाय राहणार नाही. गोव्यात एकही बुद्धविहार नाही म्हणून 22 सप्टेंबर 2019 रोजी भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते बुद्धविहाराचे उद्घाटन झाले. त्यासाठी बुद्ध विहार समन्वय समितीने पंचवीस लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच बुद्ध विहार बचाव मोहीम हाती घेतली आहे. नागपूरच्या दोनशेपेक्षा जास्त विहारांना पाडण्याच्या सूचना प्रशासनाकडून मिळाल्याने या समितीने लगेच मेळावे, मोर्चे, धरणे आंदोलने करून यश मिळवले. समता सैनिक दलाने त्यात मोलाचे सहकार्य केले.


- आशा थोरात 9049549150

आशा माधवराव थोरात यांनी एम.ए, बी.एड या पदवी मिळवल्या आहेत. त्या विदर्भ महाविद्यालयातून (अमरावती) सेवा निवृत्त झाल्या. त्यांचा पीएच. डी. चा विषय मराठी लोक साहित्यातील दलित जीवन हा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारा विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा पानगळ कवितासंग्रह, अंगठा ते सही भाग एक ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्या अस्मिता दर्शन, लोकानुकंमा, रमाई इत्यादी मासिकांत लेखन करतात.

----------------------------------------------------------------------------------------------

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

दलाई लामा व तिबेट यांचे निकट दर्शन (Close Look At Tibet & Dalai Lama)


दलाई लामा
तिबेटमधील बौद्धांचे धर्मगुरू दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतल्याला एकसष्ट वर्षे होऊन गेली. त्यांची कृती शांतताप्रसारासाठी व्याख्याने देणे, समारंभात भाग घेणे एवढ्यापुरती उरली आहे. जगात एकंदरच शांततावादी लोकांना करण्यासारखे काही न उरल्याने, दलाई लामा यांच्याविषयी प्रसार माध्यमातून फार काही येत नाही. या पार्श्वभूमीवर सेव्हन इयर्स इन तिबेटहे, 1953 साली प्रकाशित झालेले पुस्तक मिळाले तेव्हा तिबेटविषयक उत्सुकतेने उचल खाल्ली. हाती घेतल्यानंतर खाली ठेवू नये असे वाटण्याजोगी पुस्तके असतात त्यांपैकी ते एक आहे. त्या पुस्तकाचे भाषांतर त्रेपन्न भाषांत झाले आहे. ते अमेरिकेत बेस्टसेलर 1954 साली ठरले होते. त्याच्या तीस लाख प्रती विकल्या गेल्या. त्या पुस्तकावर आधारित चित्रपट 1997 साली आला आणि त्यात नायकाची - पुस्तकाचा लेखक हेन्रीच हारेर (Heinrich Harrer ) याची - भूमिका ब्रॅड पिट याने केली आहे.
लेखक हेन्रीच याचा जन्म 6 जुलै 1915 रोजी झाला (योगायोग म्हणजे सध्याचे चौदावे दलाई लामा यांचा जन्मही 6 जुलैचाच -1935) जन्म ऑस्ट्रियात. त्याचे वडील पोस्ट खात्यात नोकरीला होते. त्याने भूगोलाचा अभ्यास 1933-1938 ह्या काळात केला. त्याचा गिर्यारोहण हा प्रथम छंद होता; मग तो ध्यास बनला. त्याने दोन जर्मन आणि एक ऑस्ट्रियन सहयोगी गिर्यारोहक यांना घेऊन स्वित्झर्लंडमधील आयगर (Eiger) हे अत्यंत कठीण - बर्फाची उभी भिंत असलेले - शिखर 54 जुलै 1938 रोजी काबीज केले. आयगर पादाक्रांत केले जाण्याची ती पहिली वेळ होती. त्यामुळे त्याची हिमालयात जाण्याची इच्छा तीव्र झाली. तो नंगा पर्वत चढण्यासाठी जी मोहीम आखली जाईल त्यात त्याचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करू लागला. त्यात त्याचा बराच काळ गेला. तरीसुद्धा यश येत नाही असे वाटून त्याने स्कीईंगवर फिल्म बनवण्याचा करार केला, आणि अकल्पित रीत्या, त्याची निवड हिमालयात जाण्याच्या मोहिमेसाठी झाली. त्यावेळी मोहिमेला फक्त चार दिवस उरले होते. त्याने फिल्म बनवण्याचा करार विनाविलंब मोडला आणि तो मोहिमेत दाखल झाला. तो त्याच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतो, ''मी नंगा पर्वताच्या त्या मोहिमेत हिमालयाच्या जादूला बळी पडलो. त्या महाकाय पर्वताचे सौंदर्य, हिंदुस्तानातील लोकांचे वेगळेपण; या साऱ्यांनी माझ्या मनावर गारुड केले'' त्याच्या तुकडीने नंगा पर्वतावर जाण्याचा एक मार्ग ऑगस्ट 1939 मध्ये शोधून काढला.
हेन्रीच आणि त्याचे साथीदार
मोहीम सफल झाली. हेन्रीच व त्याचे साथी यांना युरोपात त्यांना परत नेणारी बोट कराची बंदरात येणार होती. ते तेथे बोटीचे वाट पाहत राहिले. पण युद्धाचे ढग गडद होऊ लागले. बोट येत नाही असे दिसू लागले. त्याच्या साथीदारांपैकी पीटर औफश्चइंटर (Aufschnaiter) सोडून इतर दोघे आणि लेखक, तिघांनी कराची सोडून पर्शिया आणि तेथून युरोप गाठण्याचा बेत आखला. दुर्दैवाने तो फसला. तिघे पकडले गेले. त्यांना कराचीत पुन्हा आणले गेले. त्यानंतर दोन दिवसांनी इंग्लंडने जर्मनीविरूद्ध युद्ध जाहीर केले. लेखक आणि त्याचे साथीदार यांना युद्धकैदी म्हणून घोषित करून अहमदनगर येथे कैद्यांच्या छावणीत ठेवले गेले. तेथून देवळाली येथे नेले जात असताना, त्यांनी ट्रकमधून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तोही फसला. सर्वाना देवळाली येथून डेहराडून येथे हलवले गेले.
लेखक आणि त्याचे साथीदार डेहराडून येथून पळून जाऊन तिबेटमध्ये कसे पोचले त्याची विस्तृत हकिगत पुस्तकाच्या पहिल्या अर्ध्या भागात येते. तिबेटमध्ये पोचण्यात भौगोलिक, शारीरिक, आर्थिक आणि राजकीय अशा चारी प्रकारच्या अडचणी होत्या असे लेखक नमूद करतात. ते लिहितात, ''आम्ही पाच दिवस सतत चालत राहिलो आणि अखेर, गार्टोक येथे पोचण्यापूर्वी सिंधूच्या वरील प्रवाहाला पोचलो. तेथील दृश्य अविस्मरणीय होते. रंगांची मोहिनी विलक्षण होती. चित्रकाराच्या रंगपेटीतील सारे रंग इतक्या चपखलपणे मिश्रित झालेले आम्ही प्रथमच पाहत होतो. हिमालयाच्या अगदी टोकाचे पहिले गाव होते त्राशीगांग. केवळ काही घरे आणि त्यांच्या मध्यभागी असलेला मठ. त्या सगळ्यांना सरंक्षक असा एक खंदक. शांगत्सेपासून अकरा दिवस चालून आलो आणि आम्ही शिपकी या गावात पोचलो. ती तारीख होती 9 जून. तिबेटमध्ये पोचून तीन आठवडे झाले होते. आम्ही भटकत राहिलो होतो. बरंच काही पाहिले होतं; आम्ही आयुष्यातील एका कडू अनुभवातून एक धडा शिकलो होतो. आम्हाला निवासाच्या परवानगीशिवाय तिबेटमध्ये राहणे शक्य नव्हते.
          ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या मनावर आणि शरीरावर त्या दिवसाइतका ताण कोणत्याच प्रसंगाने यापूर्वी आला नव्हता. खांपापासून (लुटारू) आम्ही वाचलो होतो, ते केवळ प्रदेश निर्मनुष्य असल्याने. त्या निर्जनपणामुळे एक नवीनच अडचण उभी राहिली होती. मी माझा थर्मामीटर फेकून दिला होता ते बरंच झालं होतं. इथं त्याने तापमान निश्चितपणे -30 अंश दाखवलं असतं, कारण थर्मामीटर त्यापेक्षा कमी तापमान दाखवू शकत नसे. वास्तवात आम्ही जेथे होतो तेथे तापमान त्याहून खूप कमी असले पाहिजे. स्वेन हेडन (Sven Heiden) याने त्या मोसमात ते -40 एवढे नोंदले होते. आमचे सदा सर्वदा साथीदार होते वारा आणि थंडी. आम्हाला सारं जग म्हणजे -30 तापमान असलेलं हिमवादळ वाटत होतं. अपुऱ्या कपड्यांमुळे आमची अगदी हालत झाली होती. माझं नशीब म्हणून तंबू ठोकून राहणाऱ्या एका स्थानिकाकडून मला मेंढीच्या कातड्याचा जुनापुराना कोट विकत मिळाला. तो मला अगदी घट्ट बसत होता आणि त्याला अर्धी बाहीपण नव्हती. अर्थात मला तो स्वस्तही पडला होता - अवघे दोन रुपये. आमचे बूट चिंधाळले होते आणि ते फार काळ टिकण्यातील राहिले नव्हते. ग्लोव्हज तर नव्हतेच! पीटरच्या हाताला हिमदंश झाला होता. माझे पाय भेगाळले होते. अतिशय प्रयत्नपूर्वक आम्ही आमचे अवसान राखले. रोजचा ठरलेल्या मैलांचा कोटा पूर्ण करायचा म्हणजे प्रचंड ताकद जरुरीची होती.

जीव घेणे - माणसाचा व पशूचा - हे बौद्ध धर्मतत्त्वाच्या विरूद्ध आहे, त्यामुळे येथे शिकारीवर बंदी आहे. तिबेट जमीनदारी पद्धतीने चालते. परिणामी, माणसे, प्राणी आणि जमीन दलाई लामांच्या मालकीची असते. कोणत्याही जिवंत प्राण्याची हत्या करायची नाही या प्रवृत्तीमुळे देशाच्या सर्व भागात हुकूम दिले गेले आहेत. दलाई लामा पहिली तीन वर्षे ध्यानावस्थेत असताना ते हुकूम जारी केले गेले होते. इमारत बांधली जात असताना किडे आणि कीटक सहज मृत्युमुखी पडू शकतात, त्यामुळे सर्व इमारतींचे बांधकाम थांबवण्यात आले आहे. पुढे काही काळानंतर मी सुद्धा जेव्हा काही बांधकामात गुंतलो गेलो तेव्हा मी प्रत्यक्ष बघितले, की माझे मजूर खणून बाहेर काढलेल्या मातीचे प्रत्येक फावडे नीट तपासत असत आणि एखादा जिवंत प्राणी मिळाला तर त्याला उचलून तो सुरक्षित जागी ठेवत असत.
हेन्रिच याचे सेव्हन इयर्स इन तिबेटहे पुस्तक कोणत्या वाङ्मयप्रकारात मोडते हे सांगणे अवघड आहे. ते हेन्रिच याचे आत्मचरित्र आहे की ते एक प्रवासवर्णन आहे ? ते तिबेटचे गाईड आहे की चीनने तिबेट ताब्यात घेतले त्याची हकिगत आहे ?
          पुस्तक वरील सर्व काही आहे आणि तरीही त्याच्याहून अधिक म्हणजे मुक्ततेसाठी माणूस काय करू शकतो आणि ते स्वातंत्र्य अपरिचित लोकांमार्फत मिळाल्यावर त्या लोकांशी एकरूप कसा होतो याचे नाट्यमय कथन आहे. आणि ते करत असताना तिबेटचे जीवन , बौद्ध धर्मातील सूत्रांवर चालणारे प्रशासन , खुद्द बौद्ध धर्माची तत्त्वे आणि गुन्हेगारांना दिली जाणारी शिक्षा यांतील विसंवाद, सत्तर वर्षांपूर्वीची तिबेटची मागासलेली अवस्था ... हे सारे काही येते.
          दोघे मित्र तिबेटमध्ये अनेक वर्षे राहिले. हेन्रीच याने तिबेटी लोकांच्या उदार आदर सत्काराची अनेक उदाहरणे दिली आहेत. त्याने जवळून केलेली काही निरीक्षणेही दिली आहेत - तिबेटला लोकसंख्या वाढीचा प्रश्न किंवा दुष्परिणाम ठाऊक नाहीत. गेल्या कित्येक वर्षात तिबेटची लोकसंख्या जवळ जवळ वाढलेलीच नाही. बहुपतित्व आणि भिक्षुपंथ स्वीकारण्याची प्रथा यामुळे हे घडले आहे. शिवाय बालमृत्यूचे प्रमाण तेथे मोठे आहे. तिबेटी माणसांचे सरासरी आयुर्मान तीस वर्षे आहे. 1887 मध्ये तिबेटला गेलेल्या नोतोविच याने सविस्तर वर्णन केलेली बहुपतित्वाची चाल 1946 पर्यंत चालू होती असे हेन्रीचच्या नोंदींवरून दिसते - ''जेव्हा अनेक भावांची बायको एकच असते, तेव्हा त्यांच्यातील वडील भाऊ हा कर्ता/स्वामी असतो. इतर भावांचा हक्क कर्ता पुरुष घराबाहेर असताना किंवा तो त्याचे मन इतरत्र रमवत असताना असू शकतो . परंतु बायकांची विपुलता असल्याने कोणी पुरुष स्त्रीसुखापासून वंचित राहत नाही. ''नात्यातील नात्यात लग्ने होत असली तरी लग्न मोडण्याचा प्रकार तेथे फारसा होताना दिसत नाही. त्याचे कारण बहुधा ती माणसे त्यांच्या भावना स्वैर सोडत नाहीत.
    तिबेटी बौद्धांच्या मृताच्या पार्थिव देहांची विल्हेवाट लावण्याची पद्धत कशी होती तेही या पुस्तकात आले आहे - ''नववर्षाच्या स्वागत समारंभाच्या दरम्यान दलाई लामा यांचे वडील मरण पावले. ब्रिटिश डॉक्टरांचे उपचार केले असते तर त्यांचे प्राण कदाचित वाचले असते. पण दलाई लामा यांच्या कुटुंबाने परंपरागत कर्मठ उपचारच केले पाहिजेत हा बौद्धांचा नियम आहे. नेहेमीप्रमाणे त्यांचे पार्थिव मंतरलेल्याजागी नेण्यात आले. मग त्याचे तुकडे करून पक्ष्यांना भक्ष्य म्हणून देण्यात आले. आम्ही लोक करतो त्या अर्थाने बौद्ध शोक करत नाहीत. पुनर्जन्माच्या संभवामुळे दुःख आवरते घेतले जाते. मृत्यू हा काही भयंकरआहे असे बौद्ध मानत नाहीत. लोण्याचे दिवे एकोणपन्नास दिवस तेवत ठेवले जातात. त्यानंतर मृताच्या निवासस्थानी प्रार्थना होते आणि मामला संपतो. विधवा अथवा विधुर काही दिवसांनंतर पुनर्विवाह करण्यास मोकळे होतात.
हेन्रीच आणि पीटर यांनी तिबेटच्या लोकांना उपयोगी पडणारी कामे त्या काळात केली. पीटरने पाणीपुरवठा करण्यासाठी कालवे खोदण्याचे काम केले, हेन्रीचने नदीला बांध घातला आणि दरवर्षी येणाऱ्या पुरापासून होणारे नुकसान थांबवले. हेन्रीचने स्केटिंग सुरू केले. त्यानंतर त्याने वर्तमान दलाई लामा यांच्या विनंतीवरून चित्रपट (माहितीपट) दाखवण्यासाठी छोटे थिएटर उभारले. कळस म्हणजे, दलाई लामा यांनी त्याला त्यांचा शिक्षक नेमले! विद्यार्थी आणि शिक्षक हा प्रकार थोडा अवघड होता. त्या संदर्भात तो लिहितो - ''त्याने (दलाई लामा) अगदी नम्रपणे स्वतःची वही काढून मला दाखवली. मी चकित झालो. लॅटिन भाषेतील मुळाक्षरे त्या वहीत गिरवलेली होती. काय विविधता होती त्याच्या बौद्धिक जडणघडणीत! अतिशय काटेकोर आणि मानेवर खडा ठेवून केलेला धर्मग्रंथांचा अभ्यास, गुंतागुंतीच्या उपकरणांशी केलेल्या तांत्रिक झटापटी (दलाई लामा यांनी कोणाच्याही मदतीशिवाय आणि इंग्रजी भाषा फार अवगत नसताना संपूर्ण प्रोजेक्टर मोकळा करून पुन्हा जोडला होता) आणि आता हा भाषांचा अभ्यास! त्याने असा आग्रह धरला, की मी त्याला इंग्रजी शिकवावे. इंग्रजी उच्चार तिबेटी भाषेत लिहून समजावून सांगावेत.'' (तिबेटची राजधानी ल्हासा येथे प्रवेश करणे आणि तेथे कायम राहण्याची परवानगी मिळवणे यासाठी बराच काळ लागला होता. त्या काळात पीटर आणि हेन्रीच, दोघेही सराईतपणे बोलण्याइतकी तिबेटी भाषा शिकले होते)
          ''अर्थात हे सांगायला नको, की माझ्यावर पडलेल्या या नव्या कामाचा मला अतिशय आनंद झाला होता. फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन एकत्रित केल्यावर होईल एवढ्या मोठ्या भूभागाच्या सत्ताधीशाला आणि तोही हुशार असलेला मुलगा - पाश्चिमात्य जगतातील ज्ञान आणि विज्ञान समजावून सांगायचे हे काम करण्याजोगेच होते. त्याच्या अमर्याद कुतूहलामुळे माझी थोडी पंचाईत कधी कधी होत असे. उदाहरणार्थ, अॅटम बॉम्बबद्दल सांगायचं म्हणजे मूलतत्त्वांची माहिती देणं आलं, पुढे जाऊन धांतूच्या क्रिया-प्रक्रिया समजावून सांगण्यास हव्यात - त्यासाठी तिबेटी भाषेत समर्पक शब्द नव्हते.''
          शिक्षक आणि शिष्य हे नाते उभयपक्षी होते. हेन्रीच सांगतो - ''तिबेटचा इतिहास आणि बुद्धाची शिकवण याबाबतीत त्याने मला खूप काही शिकवले. त्या दोन्ही विषयांवर त्याचे खरेखुरे प्रभुत्व होते. तो मला म्हणाला, की तो अशा काही जुन्या ग्रंथांचा अभ्यास करत आहे, की ज्यात शरीर आणि आत्मा यांची फारकत कशी करता येईल याचे रहस्य सांगितलेले आहे. दलाई लामा याची खात्री होती, की त्याची श्रद्धा आणि ग्रंथात नेमून दिलेले विधी केले, की इथे बसल्या बसल्या, दूर अंतरावर वसलेल्या साम्ये गावात त्याला काही घटना घडवून आणता येतील. तो म्हणे माझी तयारी पुरेशी झाली की मी तुला साम्ये इथे पाठवेन आणि ल्हासाहून तुझ्या हालचाली नियंत्रित करेन. ''मला आठवते, मी त्यावर हसून म्हटले होते, ठीक आहे तर मग! कुंडून, तू तसे जेव्हा करशील तेव्हा मी बौद्ध धर्म स्वीकारेन'' (दलाई लामा ही उपाधी आणि सत्तास्थान आहे. कुंडून हे त्यांचे मूळ नाव)
दलाई लामा यांचा परिवार
त्या दोघांचे संबंध कसे बदलत गेले यावर एखादी दीर्घकथा वगैरे लिहिता येईल. येथे एवढेच सांगता येते, की अखेरीस ते संबंध जिव्हाळ्याचे, रक्ताचे नाते असल्यासारखे झाले होते. दलाई लामा म्हणून निवड झाल्यानंतर त्यांचे बालपण हरवले होते. त्यांचा सर्व वेळ धार्मिक ग्रंथांचा अभ्यास आणि पुढे येऊ घातलेली राज्यकारभाराची जबाबदारी पेलण्यासाठीची तयारी करण्यात जाई. सख्या आई वडिलांशी भेटही निमित्तानिमित्ताने, औपचारिक स्वरूपात होत असे. त्यामुळे मोकळेपणे विचारांची देवाणघेवाण आणि हास्यविनोद करण्यास हेन्रीच हाच पहिला माणूस होता असे म्हणता येईल आणि तरीही हेन्रीचलाच सातत्याने तोल सांभाळणे आवश्यक होते.'' त्याच्याबद्दल मला वाटणारी आपुलकी आणि तो मला त्याचा मित्र म्हणत असला तरी , तिबेटच्या भावी राजाला उचित तो आदर दाखवण्याची काळजी मी घेत असे. त्याने माझ्यावर अंकगणित, इंग्रजी आणि भूगोल शिकवण्याची जबाबदारी टाकली होती. शिवाय, मी त्याचा प्रोजेक्टर चालवत होतो आणि बाह्य जगात काय चालले आहे याचे यथार्थ ज्ञान त्याला देत होतो.'' त्यांचे संबंध उभयपक्षी कसे खेळकरपणाचे होते त्याची निदर्शक अशी आठवण हेन्रीच याने दिली आहे. ''त्याने एकदा मला माझे वय विचारले. मी म्हणालो, सदतीस. त्याला आश्चर्य वाटले. सर्वसाधारण तिबेटी लोकांप्रमाणे त्यालाही वाटत होते, की माझे पिवळे केस ही माझ्या बुजुर्गअसण्याची निशाणी होती. लहान बालकाच्या निरागस कुतूहलाने त्याने माझे नाक, डोळे, कान यांच्याकडे निरखून पाहिले. माझ्या लांब नाकावरून माझी थोडी थट्टा केली (अर्थात माझे नाक सामान्य लांबीचेच आहे, मंगोलियन्सना ते लांबुडके वाटते, एवढेच). माझ्या हाताच्या मागील बाजूला असलेले केस दिसताच तो खिदळला - ''हेन्रिच, तू माकडासारखा केसाळ आहेस.''


दलाई लामा आणि हेन्रीच यांच्या मैत्रीला आणखी एक अनपेक्षित असे परिमाण आहे. हेन्रीच हा हिटलरच्या SS या लष्करी संघटनेचा सदस्य होता.  हिटलरने ऑस्ट्रिया 15 मार्च 1938 रोजी जिंकून घेतला आणि त्यानंतर काही काळातच हेन्रीच SS चा सदस्य झाला. त्याला स्क्वाड्रन लीडर म्हणून बढती 1 मे 1938 रोजी मिळाली. हे तपशील अनेक वर्षांनंतर उघडकीस आले. मात्र हेन्रीच याने असे सांगित, की SS चा गणवेश त्याने फक्त एकदा घातला व तोही त्याच्या पहिल्या लग्नाच्या दिवशी. SS मध्ये तो दाखल झाला ते केवळ काश्मीर मोहिमेत सहभागी होता यावे म्हणून. हेन्रीच याचा SS शी संबंध होता याबद्दल चीननेही बरीच आगपाखड केली आहे. यातील खरे-खोटे हा संशोधनाचा विषय ठरेल. मात्र एक सत्य आहे, की सात वर्षे तिबेटमध्ये काढल्यानंतर हेन्रीच तिबेटला कधीच विसरला नाही. त्याच्या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात तो म्हणतो, '' मी कोठेही राहिलो तरी तिबेटच्या आठवणींनी मला चुकल्या चुकल्यासारखे होईल. माझी अशी खरीखुरी इच्छा आहे की या पुस्तकामुळे, स्वातंत्र्य व शांतता यांनी युक्त असे जीवन जगू इच्छिणाऱ्या लोकांबद्दल या बेफिकीर जगात सहानुभूती निर्माण व्हावी.''
           अमेरिकन लोकांनी 1945 मध्ये नाझींच्या ज्या फाइली हस्तगत केल्या त्यावरून एक दप्तरतयार केले. त्या दप्तरात हेन्रीच याच्यावर ऐंशी पृष्ठांची एक फाइल आहे. त्या फायलीनुसार, हेन्रीच याने त्याच्या पहिल्या विवाहासाठी सरकारची (नाझींची) परवानगी मागितली होती आणि तत्कालीन नियमांप्रमाणे आवश्यक तो पुरावा - तो आणि त्याची भावी पत्नी शुद्ध आर्यन रक्ताचे आहेत हे सिद्ध करणारा - सादर केला होता. दोघांनी त्यांचे आर्यत्व सिद्ध करण्यासाठी त्यांची वंशवेल (1800-1938) दिली होती असा उल्लेख फाइलमध्ये आहे. त्याच्या तिसऱ्या पत्नीने म्हटले आहे, की हेन्रीच 1955 मध्ये युरोपात परतला तेव्हा त्याचे नाझीत्व पुसले गेले होते. 
(मुख्य स्रोत- “Dalai lama’s Friend - Hitler’s Champion “-article by Gerald Lehner and Tilman Muller . Dated 1-7-1997) छायाचित्रे - संबंधित पुस्तक आणि इंटरनेटवरून
- रामचंद्र वझे 9820946547
रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी 'बँक ऑफ इंडिया'मध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची 'शेष काही राहिले', 'क्‍लोज्ड सर्किट', 'शब्‍दसुरांच्‍या पलिकडले' आणि 'टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर' ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे 'महाराष्‍ट्र टाईम्‍स' आणि 'लोकसत्ता' या दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------