अभय ओक यांनी मांडली कायद्याची बाजू (Justice Oak Speaks On Law and Order)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

अभय ओक यांनी मांडली कायद्याची बाजू (Justice Oak Speaks On Law and Order)


ठाण्याचे अभय ओक कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बंगलोरला गेले आहेत. ओक यांचे शिक्षण ठाण्याच्याच मो.ह. हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. त्या शाळेने ओक यांचा हृद्य सत्कार 2020 सालच्या आरंभी घडवून आणला. त्यावेळी त्यांच्या झालेल्या प्रकट मुलाखतीतून देशातील न्यायव्यवस्थेचे बहुरंगी चित्र उभे राहिले आणि सगळे प्रश्न समाजाच्या घडणीशी, म्हणजे समाजसंस्कृतीशी येऊन भिडतात याचे प्रत्यंतर आले. राजकीय सत्ता धोरणे ठरवू शकेल, पण त्यासाठी आग्रह व दडपण हे सुशिक्षित, सुसंस्कृत जनतेचे असण्यास हवे हे पुन्हा एकदा जाणवले. सत्कार ओक यांचेच जुने चितळेसर, त्र्याण्णव वर्षांचे शिक्षक यांच्या हस्ते झाला. ओक यांची मुलाखत पत्रकार उदय निरगुडकर यांनी शोधक व वेधक पद्धतीने घेतली.
मुख्य म्हणजे ओक घरच्या माणसांशी बोलावे तसे मनमोकळेपणाने व स्पष्ट बोलत होते. कारण त्यांनी खुलासा केला, की ती मुलाखत शाळेच्या कुटुंबाकरता आहे. एरवी, न्यायाधीशांनी मुलाखती देऊ नयेत असा संकेत आहे. समारंभात ओक यांचे वर्णन सहज व साधे व्यक्तिमत्त्व असे केले गेले; तसेच ते भासले, पण त्यांचा कायद्याच्या अभ्यासाचा पाया पक्का आहे, त्यांची मते ठाम आहेत आणि त्यांचे प्रतिपादन नि:संदिग्ध आहे. मुलाखत टिपेला पोचली तेव्हा त्यांनी स्वच्छ शब्दांत सांगितले, की कायद्याचे पालन हा समाजाच्या संस्कृतीचा भाग व्हायला हवा. ते नुसते संसदेने कायदे उत्तम करून अथवा न्यायाधीशांनी निर्णय नि:पक्षपाती देऊन साधणार नाही. लोकांची कृती त्यानुसार हवी. लोकांनी त्यासाठी दक्ष राहण्यास हवे. आरेच्या पर्यावरणावरून बरेच वादंग झाले, त्याचा उल्लेखही न करता ओक यांनी नव्या मुंबईतील मॅनग्रोव्ह जंगल खटल्याचे उदाहरण दिले. त्याबद्दल लोकांची मागणी होती. न्यायालयाने लोकांच्या बाजूने निकाल दिला. लोकांनी त्यांचे गट स्थापून ती जंगले जपली आणि तेथे फ्लेमिंगो पक्षी पुन्हा येऊ लागलेदेखील! त्यांनी बंगलोरमध्येसुद्धा दोन तलाव या तऱ्हेने, लोकांच्या जागरुकतेने निसर्गसंपन्न राहिले असल्याची उदाहरणे सांगितली.
लोकांना हवे तसे प्रशासन व तसाच न्याय त्यांना मिळत असतो याचे ठाण्याच्या  संदर्भात समर्पक उदाहरण त्यांच्या बोलण्यातून पुढे आले. विषय होता रस्त्यावरील मंडप, खड्डे यांमुळे होणारी लोकांची अडवणूक. हे प्रश्न न्यायालयाने सोडवावे असे आहेत का? ओक यांनी त्याचे उत्तर नि:संदिग्धपणे होय असे सांगितले. जीवनविषयक प्रत्येक प्रश्न न्यायालयात येऊ शकतो, त्यासाठी तर वेगवेगळ्या प्रकारच्या पिटीशनची सोय न्यायालयांमध्ये केलेली असते. फूटपाथवर लोकांसाठी निर्वेध चालण्याची सोय करणे हे महापालिका आयुक्तांचे काम, ती होत नसेल तर मागणी करणे हे लोकांचे काम, त्यांच्या तक्रारीची दाद लागली नाही तर निर्माण झालेल्या प्रश्नावर निवाडा देणे हे न्यायालयाचे काम; यामध्ये नागरिक जागरुक असणे ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे असे त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या उदाहरणांवरून मनावर ठसत गेले. त्याच संदर्भात ठाण्यात कालाष्टमीला रस्त्या-रस्त्यावर जो बेकायदा धुडगुस चालतो त्याचा प्रश्न निघाला. ओक यांनी स्पष्ट निर्वाळा दिला, की न्यायालयाने निकाल त्याविरुद्ध दिला आहे, लोकांनाच तो धांगडधिंगा हवा असेल तर त्यांना त्याविरुद्ध शहाणे करणे हाच उपाय राहतो!
अभय ओक यांच्या घराण्यात वकिली परंपरा आहे. त्यांचे आजोबा (वामनराव ओक) व वडील (श्रीनिवास ओक) नामवंत वकील होते. त्यांनी ठाण्याच्या समाजजीवनात फार महत्त्वाची कामगिरी त्या त्या वेळी बजावली आहे. अभय ओक यांना तो मोठा वारसा लाभला आहे व ते तो नेकीने जपत आहेत याचा उल्लेख समारंभात वारंवार झाला; किंबहुना, एके काळी ओक, हेगडे व रेगे ही घराणी म्हणजे ठाण्याचे समाजभूषण असत. ओक त्या संदर्भात फार योग्य बोलले. ते म्हणाले, की वकिलांना समाजात स्थान होते. वकील लोक समाज-शिक्षण संस्थांचे अध्यक्ष असत. परंतु सगळ्याच व्यवसायांना गेल्या तीस-चाळीस वर्षांत धंदेवाईक स्वरूप आले आहे, तसे ते वकिलीलाही आले आहे. तरी अभय ओक यांना तो व्यवसाय वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. ते वैशिष्ट्य म्हणजे वकिलाला इंजिनीयरिंग, वैद्यकापासून नागरिकशास्त्रापर्यंत शास्त्र-तंत्र-विद्या यांचे ज्ञान लागते; तसेच, ते न्यायाधीशालाही आवश्यक असते. ओक म्हणाले, की न्यायाधीशांना मिळणारा पगार व सुविधा ठीक आहेत आणि आता वकिलांना तर उत्पन्न भरपूर मिळू शकते व ती उत्तम आव्हानात्मक करिअर आहे.
अभय ओक यांच्या प्रतिपादनातून अनेक चांगली निरीक्षणे मांडली गेली -
• वेगवेगळ्या न्यायालयांत असलेल्या खटल्यांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक खटले केंद्र व राज्य शासन यांच्या (गैर)व्यवहारातून निर्माण होतात. जसे, की जमिनीचे संपादन झाले, पण भरपाई मिळाली नाही; शिक्षकाची नियुक्ती झाली, परंतु शिक्षणाधिकाऱ्याने ती अॅप्रुव्ह केली नाही.
• बरेचसे खटले भीषण सामाजिक परिस्थितीतून उद्भवलेले असतात.
• विवाहविषयक खटले फार झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे कौटुंबिक न्यायालयांची संख्या कितीही वाढवली तरी ती कमी पडते.
• विधी सेवा प्राधिकरण या नव्या संस्थेच्या माध्यमातून गरीब-वंचितांना न्याय मिळणे सुलभ होत आहे. अर्थात तेथेही नो-नो नोकरशाहीमुळे साधनसुविधांचा अभाव भासतो आणि न्यायदानास विलंब होत जातो (ओक यांनी नोकरशाहीचे सांगितलेले किस्से ऐकून श्रोत्यांना हसावे की रडावे हे कळेनासे झाले).
• कायदा स्टॅटिक नसतो. त्यामध्ये परिस्थितीनुसार बदल सतत होत असतात. अगदी घटनेतसुद्धा 368 व्या कलमानुसार दुरुस्ती करून घेणे शक्य आहे.
• सध्याच्या न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांना निकाल देऊन समाधान मिळते, नागरिकांना न्याय मिळाल्याचे समाधान असतेच असे नाही.
• माहितीच्या कायद्याचा गैरवापर वाढला आहे असे वाटत नाही. त्यातून माहिती मिळते. माहितीचा उपयोग कसा करायचा हे नागरिकांवर अवलंबून असते.
• माझ्यावर आजपर्यंत कोणत्याही निकालाच्या वेळी कसलाही दबाव आलेला नाही ना गुंडांकडून, ना राजकारण्यांकडून. मला कधी सुरक्षाव्यवस्था घ्यावी लागलेली नाही. कोर्टाकडे आठवड्याला पन्नासएक पत्रे येतात, त्यामध्ये शिवीगाळ-धमक्या असतात. पण ती पत्रे काही काळाने निकालात काढली जातात.
• न्यायाधीशाने सार्वजनिक क्षेत्रात फार प्रकटू नये असा संकेत आहे. माझी आजची प्रकट मुलाखत शाळेच्या प्रेमातून घडली आहे. ती पहिली व अखेरची. ग्लॅमर आणि न्यायाधीश यांचा संबंध नाही.
शिक्षण आणि न्याय ही दोन समाजक्षेत्रे विशुद्ध मानली जातात. शिक्षणाची संस्कारशीलता आणि न्यायाची निर्भयता हे दोन आदर्श कोणत्याही समाजाने जपावे असेच असतात. ते कार्यक्रमाच्या दोन-अडीच तासांत निष्कलंक स्वरूपात लोकांसमोर उभे राहिले होते. त्यातच मो.ह. विद्यालयाने आणखी एक घाट घातला. तो म्हणजे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार. त्यात एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णसेवेचे काम करणाऱ्या निष्ठावंत सीमा काणेकर आणि निसर्ग व पक्षी निरीक्षण वेडे ज्ञानोत्सुक शिक्षक अरुण जोशी यांना तेथे प्रातिनिधीक स्वरूपात गौरवण्यात आले. अरुण जोशी यांनी त्यांच्या वयाच्या नव्वदीत आद्य भारतीय पक्षीनिरीक्षक सलीम अली यांचा भलाजाडा ग्रंथ मराठीत अनुवादित केला आहे. कायदा, सेवा, शिक्षण व ज्ञान या क्षेत्रांतील व्रतस्थ मंडळींची तपस्या कार्यक्रमात निर्भेळ स्वरूपात प्रकटत असताना, आपोआपच, आदर्श असे एक समाजचित्र तयार झाले होते. आम्ही श्रोते प्रेक्षक ते दोन तास जणू एक चित्रपट पाहत होतो! परंतु वास्तव काय आहे? बाहेरचे जग विविध तऱ्हांच्या भ्रष्टतेने, प्रदूषितांनी, बेकायदा कृत्यांनी भरलेले आहे ते क्षणोक्षणी अराजकाच्या दिशेने चाललेले भासते. बाहेरच्या जगाला कोणताही नियम नाही. ओक यांच्या रूपाने ते दोन तास, भले निस्पृह न्यायक्षमतेचा आदर्श उभा ठाकलेला समोर दिसला असेल. तेच ओक गैरसोयीच्या प्रश्नावर म्हणत होते तीन वर्षें थांबा. मी निवृत्त झाल्यावर तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देईन! उलट वक्ते म्हणत होते, की तुम्ही बंगळुरूहून शक्य तितक्या लवकर दिल्लीला सर्वोच्च न्यायालयात (बढतीवर) जावे. तेथे न्यायालयात तुमच्या रामशास्त्री बाण्याची गरज आहे!
समाजात असे जे आदर्श आहेत त्यांना कुसुमाग्रज प्रकाशाची बेटे म्हणत. पॅसिफिक महासागरात काही देश बेटांनी बनलेले आहेत. आपल्या समाजातील ही प्रकाशाची बेटे तशी एकत्र येतील का? ती एकूण समाजाला दिशा-धोरण दाखवतील का? जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष साळवीसर सांगत होते, की ते विविध शाळांतील शिक्षकांना घेऊन दापोलीच्या उपक्रमशील शिक्षणतज्ज्ञ रेणू दांडेकर यांच्याकडे आदर्शाच्या शोधात गेले होते, ठाण्याचीच शिल्पा खेर अनेक शाळांत शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांसाठी रोजनिशी लेखन उपक्रम राबवत आहे आणि आम्ही थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर तर शिक्षकांचे व्यासपीठ चालवतो, तेथे आदर्श शिक्षकांची मालिकाच आहे. अशा साऱ्यांचा समाजावर एकत्रित प्रभाव दिसू शकेल का? ते एकमेकांशी कसे जोडले जातील? तसे घडले तर समाजातील आजची बकालता आपोआप निष्प्रभ होईल.
- दिनकर गांगल dinkargangal39@gmail.com 9867118517
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
 ----------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या