शिवाची रूपे, त्याची मंदिरे आणि त्याची पूजा (Sect of Shaiva and it's Traditions)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

शिवाची रूपे, त्याची मंदिरे आणि त्याची पूजा (Sect of Shaiva and it's Traditions)


सृष्टी शिवाने निर्माण केली. शिवाचे स्वरूप मानवासारखे नाही. शिवाची दोन रूपे स्वरूप व तटस्थ अशी आहेत.
शिव हा पती असून त्याला हर, ईश, नाथ, नंदी इत्यादी नावाने ओळखले जाते. कुंभार घटनिर्मितीसाठी काठीद्वारे चाक फिरवून निर्माण झालेल्या गतीचा, शक्तीचा साधन म्हणून उपयोग करतो, तशी सृष्टीसाठी माया व प्रकृती असते. शिव हा निरागसपणा, शुद्धता, आत्मज्ञान, सार्वभौमत्व, मलापासून स्वातंत्र्य, दयाळू, सर्वव्यापक आणि आनंदी असणे अशा अष्टगुणांनी मंडित आहे. प्रकृतीचे कोणतेही गुण त्याला चिकटत नाहीत. तो निर्गुण आहे.
शंकर ही संहाराची देवता; तशीच, ती सृजनाची देवताही आहे. शंकराच्या पूजेचे समारंभ हे कृषी संस्कृतीशी, शेतकऱ्यांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित असल्याचे जाणवते. शिवपूजेत त्यामुळेच त्रिपुरारी पौर्णिमा, श्रावणी सोमवार, शिवरात्र यांना महत्त्व आहे. ते उत्सव पीक-पाण्याशी संबंधित आहेत. शिवपूजेशी संबंधित वृक्ष, वनस्पती पाहिल्या आणि शिवपूजेतील फुलांचे रंग पाहिले, की प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे ती शिवरूपाशी, शिवप्रकृतीशी, गुणांशी कोठेना कोठे आंतरिक संबंधित असल्याचे निश्चित लक्षात येते. 
बकुळ
कमळ
शिवाची पूजा पुढील फुलांनी करावी असे स्कंदपुराण सांगते - मण्हेर, रुई, बाहावा, धोतरा, कमळ, सुरंगी, बकुळ, नागकेशर, सूर्यविकासी कमळ, कदंब आणि मंदार. विद्यापती म्हणतो, की शंकराला धोतरा व कदंब ही फुले रात्रीची वाहावीत, इतर फुले दिवसा तर मोगरीची फुले ही दिवसा व रात्री अशा दोन्ही वेळा वाहावीत.
श्री शिवशंकर अथवा महादेव हे गुरव जातीचे आराध्य दैवत. गुरव म्हणजे शंकराचे पुजारी. त्यामुळे विविध रूपांतील शक्तिस्वरूप शिवपत्नी पार्वती, शिवपुत्र गणपती, शिव आणि रुद्र एकच मानले गेल्यामुळे रुद्र अंश असणारा रुद्रपुत्र मारुती, भैरव हा उग्र स्वरूपातील शंकरच मानला गेल्यामुळे विविध रूपांतील भैरव, खंडोबा, ज्योतिबा, रवळनाथ हे शंकराचे अवतार मानले गेल्यामुळे, त्या देवतांचे पुजारीपणही गुरवांकडे कित्येक शतके आहे. शिवाचे पुजारीपण गुरवांकडे इसवी सनाच्या अकराव्या शतकापासून असावे.
महाराष्ट्रातील शिवमंदिरे आणि गुरव पुजारी यांचा संबंध अभिन्न आहे. मंदिर उभारण्याची प्रथा पूर्व चालुक्यांनी सुरू केली. सध्या अस्तित्वात आहेत ती मंदिरे उत्तरकालीन चालुक्य, देवगिरीचे यादव यांनी; तसेच, त्यांच्या सामंतांनी, मांडलिक शिलाहार यांनी उभारली आहेत. चालुक्य, राष्ट्रकुट यांची राज्ये मुख्यत्वेकरून मैदानी होती. मंदिरे कोठेही उभारता येत. त्यासाठी लेण्यांइतका पैसा खर्च होत नसे व तेवढा काळही लागत नसे. म्हणून उत्तर चालुक्यांच्या काळात लेणी खोदण्याची प्रथा नष्ट झाली आणि मंदिरे उभारण्याला चालना मिळाली.
महाराष्ट्राच्या गावोगावी महादेव, गणपती, देवी, कोठे मारुतीचे तर कोठे भैरवनाथाचे तर कोठे खंडोबाचे देऊळ आढळते.
शेंदूर हा शिवपरिवारातील सर्व देवी-देवतांना प्रिय आहे. त्या शब्दाचे मूळ  तमिळमध्ये आहे. तमिळमध्ये चेन् चा उच्चार शेन् असा होतो. कानडीत चेन् आणि केन् ही दोन्ही रूपे आढळतात. शेन्, केन्, चेन् यांचा मूळ अर्थ तांबडा. कानडीत शेंदूरास चेंद्र असे म्हणतात. मराठीत शेंदूर हा शब्द त्या चेंद्रपासून आला. अर्थ - लालसर. शेंदूर हा मांगल्याचा निदर्शक झाला. चांगभले शब्दात तोच भाव आहे. चांगभले म्हणजे भद्र, कल्याणप्रद, मंगलमय. चांग म्हणजे मंगल, कल्याण. तोच अर्थ भलेचा. दोन समानार्थी शब्दांचा एक जोडशब्द. मंगळसूत्र हे सौभाग्यदर्शक आभूषण वापरण्याची चाल द्रविडांपासून घेतली गेली. त्याचे मूळ शिवस्वरूपाच्या त्या कल्पनेत असावे.
गणेश अथर्वशीर्षाच्या नवव्या ध्यानश्लोकात गणेशाचा रंग लाल असल्याचे वर्णन आहे. गणपतीला सर्वांगी सिंदुर उटी त्यामुळे आली. मारुती हा पंरपरेने रुद्राचा अंश मानला जातो. समर्थांच्या मारुती स्तोत्रात मारुतीला भीमरूपी महारुद्रा (प्रथम कडवे) तसेच काळाग्नि, काळ रुद्राग्नि, नेत्राग्नि चालील्या ज्वाळा (पाचवे कडवे) असे उल्लेख येतात. रुद्र अग्नीसारखा लाल म्हणून रुद्र अंश, रुद्रपुत्र मारुती लाल. त्याच भावनेतून कर्नाटक-महाराष्ट्रात मारुतीस शेंदूर लावला जातो. मारुती, गणपती यांना तर शेंदूर लावला जातोच, पण ज्या ठिकाणी देवी, भैरव देवतांचे स्वयंभू तांदळे आहेत, त्यांनाही कल्याणप्रद, मंगलमय तत्त्वाचे प्रतीक म्हणून शेंदराने माखले जाते.
- (कै. मधुकर टांकसाळे यांच्या पाऊलखुणा या पुस्तकावरून)
 

 ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या