शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

हातखंडा

काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे म्हणजे हातखंडा. तर हातखंड म्हणजे मधून मधून सोडवणूक करणारा, मदतनीस (मूल, मित्र, शेजारी); तसेच अडल्यावेळी उपयोगी पडेल अशी व्यक्ती.
कारागीर त्याच्या कलेत अतिशय निष्णात असेल, त्या कलेत त्याचा हात धरणारा दुसरा कोणी नसेल तर त्याच्या कामाचे वर्णन हातखंडा काम असे केले जाते. गालिच्यांवर नाजूक कलाकुसर करणारे, दगडी शिल्पांमध्ये सजीवतेचा आभास निर्माण करणारे, ताजमहालसारख्या कलाकृतीमध्ये संगमरवरावर सुंदर नक्षीकाम करणारे अशा विविध कलांमधे श्रेष्ठ असणाऱ्या कलावंतांचे कार्य हे हातखंडा काम म्हणून ओळखले जाते. एवढेच काय रोजच्या व्यवहारातही, स्वयंपाकातील पुरणपोळीसारखा पदार्थ करण्यात एखादी गृहिणी वाकबगार असेल तर पुरणपोळी म्हणजे तिचे हातखंडा काम असे अभिमानाने सांगितले जाते!

हातखंडा काम या वाक्प्रचारामागे एक कटू सत्य आणि भीषण वास्तवता दडली आहे. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे, सुलतान, जहागीरदार यांसारखे राज्यकर्ते त्यांच्या राज्यांतील वा संस्थानातील कुशल कारागिरांकडून अलौकिक शिल्प, वास्तू किंवा स्वत:चे चित्र तयार करून घेत. पण त्यानंतर भविष्यात त्या कारागिरांनी इतरत्र कोठेही तशा तऱ्हेचे किंवा त्याहून चांगले काम करू नये म्हणून त्यांना एक आगळेवेगळे बक्षीस देत; म्हणजे त्यांचे हात छाटून टाकत! त्यावरून हातखंडा काम हा वाक्प्रचार तयार झाला असावा. चि.वि.जोशी यांच्या ओसाडवाडीचा देव या छोटय़ा, पण सुंदर पुस्तकात सुरुवातीला ओसाडवाडीतील गणपतीच्या मंदिरातील गणपतीच्या मूर्तीचे वर्णन वाचनात येते. ते असे, ‘ही गणपतीची मूर्ती इतकी सुंदर आहे, की ती तयार करणाऱ्या कारागिरांचे हात तोडून राजाने त्याला जहागीर बक्षीस दिली होती. त्याला हातखंडा काम म्हणतात. पूर्वीचे राजेलोक कलेला अशा प्रकारचे उत्तेजन देत असत!’- उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in

डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा