सोमवार, २९ जून, २०२०

परेश केंकरे - ग्लोबल संस्कृतीचा पाईक (Paresh Kenkre's Global Dream)

परेश केंकरे

अमेरिकेत पहिल्या एक-दोन मराठी पिढ्या 1960 नंतर गेल्या
, त्यांनी मराठीपण फार जपले; की ते जणू पुलं-वपु-सुधीर फडके यांच्यातच गोठून गेले आहेत असे म्हणतात! परंतु तंत्रशिक्षित तरुणांचे 1990 नंतर जे ब्रेनड़्रेनझाले त्यांतील काही लोक नव्या जाणिवांनी संपन्न होते. त्यांनी भारतीयत्वाच्या उत्तम खुणा जपल्या, परंतु अमेरिकेच्या स्थानिक जीवनाशी एकरूप होण्याचाही प्रयत्न केला. तसे भारतीय/मराठी लोक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या व्हाइट हाऊस कार्यालयातील अधिकारपदापासून ओहायोतील लोकप्रतिनिधीत्वापर्यंत काही ठिकाणी दिसून येतात. परेश केंकरे हे त्यांतील एक आहेत. ते त्यांच्या गावातील जीवनाशी एकरूप होऊन गेले आहेत.

केंकरे कॅलिफोर्नियात सॅनफ्रान्सिस्कोजवळ फॉस्टर सिटी या शहरात राहतात. लोकवस्ती असेल तीस-पस्तीस हजार, पण सिटी कौन्सीलचा प्रतिनिधी (नगरसेवक) निवडणे असेल तर केंकरे यांची मदत घ्यावी लागते, असा त्यांचा दबदबा आहे. अशी पंधरा सिटी कौन्सील मिळून एक काउंटी कौन्सील बनते. केंकरे यांची ती ताकद अलिकडेच अजमावली गेली. त्यांचे सच्चेपण असे, की त्यांनी त्यांच्या वॉर्डातील प्रतिनिधी जेव्हा फार लाच खाऊ लागला तेव्हा त्याला रिकॉल करण्याची मोहीम आरंभली आणि त्याच्या जागी नवा प्रतिनिधी ऐंशी टक्के मते मिळवून निवडून आणला! केंकरे म्हणाले, की अमेरिकेत स्थानिक राजकारणात राजकीय पक्ष नसतात. त्यामुळे प्रतिनिधी व्यक्तींच्या गुणवत्तेवर ते निवडून येऊ शकतात. सार्वजनिक कामातील आस्था हा केंकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू आहे. त्यांचे विविध गुणदर्शन झाले, की त्यांचे कौतुक वाटू लागते. कारण अशा वेगवेगळ्या आवडीनिवडी असलेला हा माणूस स्वत:च्याच छंदात, करिअरमध्ये रमून गेला नाही, स्वत:च्याच कोशात गुंफून गेला नाही; तर त्याने कुटुंबात लक्ष घातले, मोठा मित्रपरिवार जपला आणि करिअरची कमान चढती ठेवली. केंकरे यांच्या 31 डिसेंबरच्या पार्ट्या, दिवाळी-होळी यांचे सण-समारंभ हे लक्षवेधक असतात. तेथे त्यांच्या लोकसंग्रहाचा प्रत्यय येतो.

केंकरे व्हीजेटीआयमधून (जिजामाता तंत्र महाविद्यालय) इंजिनीयर झाले, त्यांनी एकादे वर्ष मद्रासमध्ये (चेन्नई) नोकरी केली आणि त्या वेळच्या प्रथेप्रमाणे, ते 1990 साली अमेरिकेत गेले. तेथे कॅलिफोर्नियात स्थिरावले. त्यांचा पहिला मुक्काम सनी वेल येथे म्हणजे गोखले-गोरे-केळकर-रानडे यांच्या आगरात झाला. केंकरे यांनी 1990-96 पर्यंत नोकरी केली, त्यानंतर स्वत:चा आयटी व्यवसाय सुरू केला, त्यामध्ये सतत नवनवे टप्पे गाठले. त्यांनी 2003 नंतर सात वर्षें जसा पुणे-मुंबई तसा इंग्लंड-अमेरिका प्रवास केला. म्हणजे आठवड्याचे पाच दिवस इंग्लंडमध्ये आणि वीकएंड हसबंड अमेरिकेत!’

अनाडी या सिनेमात नूतनचे वडील असतात उद्योगपती मोतीलाल. ते नूतनला तिच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी एकदम उभी पाहतात, तेव्हा म्हणतात, की अरे ही आपली मुलगी? हिला आपण घरून बाहेर कामाला जायचो तेव्हा आणि बाहेर कामावरून घरी आलो तेव्हा आडवी झोपलेलीच पाहिली आहे, ही एवढी मोठी केव्हा झाली? परेश केंकरे यांचे त्यांची मुलगी राधिका हिच्या बाबतीत तसेच काहीसे झाले. त्यांनी राधिकाला मोठी होताना पाहिली नाही आणि म्हणून ती जेव्हा दहावीत गेली तेव्हा, 2012 मध्ये त्यांनी इंग्लंडमधील व्यवसाय बंद केला, तो अमेरिकेपुरता मर्यादित ठेवला. तोपर्यंत तंत्रविज्ञानातील हनुमान उड्या सुरू झाल्या होत्या. त्यांशी जुळवून घेता आले नाही तर? आर्थिक चणचण नको म्हणून साईड बिझनेस म्हणून डल्लसमध्ये पेट्रोलपंप व दुकान विकत घेतले. त्याच बरोबर कुटुंबाशी मित्रत्व अधिक जोडले. ते पत्नी गीता व मुलगी राधिका यांच्याबरोबर अधिक वेळ घालवू लागले. अर्थात तंत्रविज्ञान हीच त्यांची कास राहिली आहे. त्यामुळे वयाची पन्नाशी उलटल्यावर, त्यांनी सध्याच्या काळाला अनुरूप अशा डेटा सायन्सचे शिक्षण घेणे सुरू केले आहे. त्यामध्ये ते आता नवा उद्योग व्यवसाय कोणता सुरू करतात ते पाहायचे.

केंकरे यांनी लग्न सनी वेलमध्ये असतानाच केले, ते त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकून आलेल्या कल्याणच्या गीता देवधर या मुलीशी. केंकरे म्हणाले, की आम्ही कॉलेजमध्ये मुंबईला भेटलो होतो, पण प्रेम केले-लग्न जुळवले अमेरिकेत आल्यावर. तेथे आम्ही तरुण दिवसभर कामे केल्यावर संध्याकाळी गप्पा मारण्यास एकत्र जमायचो, तेथे माझे-गीताचे जमले. आम्ही लग्न अमेरिकेतच केले. त्यानंतर दोन-तीन वर्षांनी भारतात जाऊ शकलो, तेव्हा रिसेप्शन वगैरे करण्याचा घरच्यांचा मुद्दा शिल्लक राहिला नव्हता.

 सुवीर सरन यांच्यासोबत परेश केंकरे
गीता देवधर ही विलक्षण तल्लख बुद्धीची सरळमार्गी मुलगी आहे. तिची स्वत:ची अमेरिकेतील करिअर आणि सरळ लाघवी स्वभाव याबाबत स्वतंत्र नोंद होऊ शकेल. इतकी ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. परेश केंकरे-गीता देवधर आणि त्यांची कॉलेजमध्ये न्युरो सायन्स शिकून तयार झालेली मुलगी राधिका यांची नावे व संस्कार याशिवाय भारतात/महाराष्ट्रात त्यांचे काही उरले आहे असे जाणवत नाही, इतकी ती अमेरिकन होऊन गेली आहेत. ती जीवनशैलीच वेगळी आहे. त्यांना PIO (Persons of Indian Origin) म्हणतात हेच योग्य आहे. अर्थात केंकरे पती-पत्नींना मायभूमीची, तेथील नातेसंबंधांची ओढ आहेच. ती त्यांच्या, विशेषत: परेश केंकरे यांच्या छंदांतून व्यक्त होते. म्हणजे केंकरे यांना भारतीय मांसाहारी खाद्यपदार्थ विशेष आवडतात. गीता ते खात नाही. मग परेश यांनी ते शिकून घेतले. त्यांतील त्यांचे प्रावीण्य मोठमोठ्यांना लाजवणारे आहे. सुवीर सरन नावाचा शेफ अमेरिकेत प्रसिद्ध आहे, तो भारतीय लज्जतदार खाद्यपदार्थांठी. केंकरे यांनी त्याच्याशी दोस्ती केली, ती अर्थात इमेलवर. त्यामधून केंकरे यांनी स्वत:च्या अशा चविष्ट पाककृती तयार केल्या आहेत. गंमत अशी, की केंकरे यांचे हे वेड ध्यानी घेऊन गीता व त्यांच्या मित्रमंडळींनी परेश केंकरे यांना त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसाला भेट दिली ती सुवीर सरन यांना न्यू यॉर्कमधून सॅनफ्रान्सिकोला (म्हणजे काश्मीरमधून कन्याकुमारीला) बोलावून! सुवीर यांनी केंकरे यांच्या मित्राच्या घरी पन्नास जणांच्या पार्टीचे जेवण शिजवले. केंकरे त्या सन्मानाने गहिवरूनच गेले. केंकरे यांना स्वत:चे रेस्टॉरंट सुरू करावे असेही एका टप्प्यावर वाटून गेले होते.

केंकरे यांना बालपणी लेखक व्हावे असे वाटत होते. त्यांची ती आवड अचानक उफाळून आली ती त्यांचा बालमोहन वर्गाचा व्हॉट्सअॅप ग्रूप झाला तेव्हा. त्यांनी त्यासाठी ललित लेखन सुरू केले. त्यांपैकी काही माझ्याकडे पाठवले. ते हळुवार अनुभव हलवून सोडणारे आहेत- कधी खळखळवून हसवतातही. ते शाळेत मिस्किल-चहाटळ म्हणून प्रसिद्ध होतेच. प्रमिला दातार यांच्या गाण्यावर त्यांनी विडंबन काव्य रचले म्हणून शाळेतून रस्टिकेट होण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यांचे काका तंत्र शिक्षणसंचालक होते, म्हणून केंकरे बापुसाहेब रेगे यांच्या शिस्तीच्या बडग्यातून बचावले. ते म्हणाले, की मी आयुष्यभर प्रवास केला, गॅस स्टेशनवरही अनेक लोक भेटत गेले. त्यातून मला समाजातील विसंगती, दंभ या गोष्टी दिसतात त्रास देतात. त्यातून मी काहीबाही लिहीत असतो.

त्यांनी त्यांना एकदा भारतीय हिंदी सिनेस्टार धर्मेंद्र लंडन विमानतळावर भेटला त्याची हकिगत साभिनय सांगितली होती त्या ही मॅनच्या आविर्भावासह. त्याहून अधिक सुखद त्यांची भेट होती ती दीपिका पदुकोनबरोबरची. ती योगायोगानेच घडून आली. अमेरिकेत गोवन लोकांचे संमेलन झाले होते, त्याचे अध्यक्ष होते प्रकाश पदुकोन. त्या संमेलनानिमित्त स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली. तिचे संपादक होते परेश केंकरे. त्यांनी गोव्याचा इतिहास व वर्तमान यांबाबतचे अपूर्व साहित्य त्या विशेषांकासाठी जमा केले आहे, तेवढेच प्रभावी संपादकीय लिहिले आहे. केंकरे संमेलन संपल्यानंतर भारतात आले तेव्हा त्यांच्या विमानात योगायोगाने दीपिका होती. केंकरे यांनी प्रकाशच्या झालेल्या ताज्या ओळखीचा धागा पकडून तिच्या हाती तो विशेषांक ठेवला. तिलाही वेळ होता. तिने आस्थेने तो अंक वाचला. त्यातील संपादकीयाबद्दल केंकरे यांच्याशी ती आपुलकीने बोलली. केंकरे यांच्याकडे अशा आठवणींचा खजिना आहे.

परेश (शंकर) केंकरे यांचे आईवडील (गुरुदास केकरे) गोव्यातील, बाणवली. परंतु केंकरे यांनी पहिली सहा वर्षें फक्त तिकडे काढली. ते नंतर काकांकडे मुंबईत आले. त्यांचे शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले. केंकरे यांना एका टप्प्यावर फोटोग्राफीचे वेड लागले होते. त्यांनी विविध तऱ्हांचे व विविध ठिकाणी फोटो काढले आहेत. ते त्या काळात गळ्यात कॅमेरा टांगूनच फिरत असत. त्यांनी असे विविध छंद जपले व सोडून दिले. त्यातील काही वेड मुलगी राधिका हिनेही घ्यावे असे त्यांना वाटे म्हणून मुलीशी बोलून एकदा त्यांनी पियानोचे धूड घरात आणून ठेवले. पण नंतर राधिकाच उच्चशिक्षण व नोकरी यानिमित्ताने घराबाहेर पडली. पियानो हॉलमध्ये आहे तेथेच आहे. ते मनाने जसे संवेदनाशील आहेत, तसे अभियंतेही आहेत. त्यामुळे ते लेखन जितक्या हळुवार हाताने करतात तशाच प्रकारे, कुशलतेने यांत्रिक बाबी हाताळतात. केंकरे छांदिष्ट आहेत तसा व्यवहार नीट जाणतात. त्यांना जगण्याची सचोटी हे सर्वात महत्त्वाचे मूल्य वाटते व तो अमेरिकेतील जीवनाचा आधार आहे, तेथे लपवाछपवी नाही असे ते म्हणतात. म्हणूनच त्यांनी त्यांचा देश अमेरिका मानला आहे. त्यांच्या आधीच्या पिढ्यांना भारत व अमेरिका अशी दुविधा त्रास देई. नव्या पिढ्यांना त्या प्रकारचा मनस्ताप नाही. त्यांना नि:शंक मनाने अमेरिकेतच राहायचे आहे. केंकरे म्हणतात, की मानवी संस्कृतीत गेली दोन-पाच हजार वर्षें सतत प्रगतीच होत आलेली आहे तेथे अधोगती नाही. त्याचे महत्त्वाचे कारण स्थलांतर हे आहे. त्याला तर आता फारच वेग आला आहे. त्यामुळेच गेल्या तीस वर्षांतील ग्लोबल संस्कृती हे मानवी विकासातील पुढील पाऊल आहे!

परेश केंकरे shankar.kenkre@gmail.com
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
 ------------------------------------------------------------------------------------------------------------------
                                       परेश केंकरे यांनी काढलेली काही छायाचित्रे
-------------------------------------------------------------------------------------------------------

कै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना 2020-21 (Arun Sadhu Memorial Fellowship 2020-21)

'अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना' ह्यावर्षी अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 ऑगस्ट 2020 आहे.

प्रसिद्ध लेखक कै. अरुण साधू यांच्या स्मरणार्थ एका तरुण पत्रकाराला अभ्यासासाठी दीड लाख पर्यंतची पाठ्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी तरुण मराठी भाषिक पत्रकारांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामार्फत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. पाठ्यवृत्तीलायक प्रस्तावाची निवड विद्यापीठातील प्राध्यापक व प्रतिष्ठित नागरिक यांच्या समितीमार्फत होईल.


ग्रंथाली, कै. साधू कुटुंबीय व मित्रमंडळ
आणि संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,
पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने
प्रख्यात लेखक, पत्रकार तसेच पत्रकारितेचे प्राध्यापक कै. अरूण साधू यांच्या स्मृत्यर्थ ग्रंथाली, व कै. साधू यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार, तसेच संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी तरूण पत्रकारांना संशोधन व सखोल वार्तांकनासाठी प्रोत्साहन व आर्थिक साह्य मिळावे यांसाठी ही पाठ्यवृत्ती योजना आखली आहे. दरवर्षी एकूण दीड लाख रूपयांची पाठ्यवृत्ती देण्यात येईल. यंदा पाठ्यवृत्तीचे तिसरे वर्ष आहे. मेघना ढोके याना 2018 तर दत्ता जाधव व मुक्ता चैतन्य यांना 2019 ची पाठ्यवृत्ती विभागून देण्यात आली. 2020-21 या वर्षासाठीच्या पाठ्यवृत्तीकरता पत्रकारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

कै. अरूण साधू स्मृती पाठ्यवृत्ती योजना 2020-21 नियमावली

1) पाठ्यवृत्तीसाठी पात्रता -
• मराठी भाषक पत्रकार (कार्यक्षेत्र अथवा वास्तव्य महाराष्ट्राबाहेर असेल तरी चालेल)
• 1 जुलै 2020 रोजी किमान 28 वर्षे पूर्ण ते कमाल 45 वर्षे पूर्ण यांदरम्यान असावे. (म्हणजेच 02 जुलै 1974 ते 3 जुलै 1992 यांदरम्यानचा जन्म हवा)
• कोणत्याही माध्यमात किमान तीन वर्षे पूर्ण वेळ पत्रकार म्हणून काम केलेले असावे.
     अथवा
• मुक्त पत्रकार म्हणून किमान सहा वर्षे काम केलेले असावे.
• ज्या विषयाच्या किंवा घटनेसंबंधीच्या सखोल अभ्यासाचा प्रस्ताव असेल त्याविषयी किमान तीन लेख/श्राव्य कार्यक्रम/दृकश्राव्य कार्यक्रम प्रसिद्ध झालेले असावेत.
     अथवा
• भिन्न विषयांसंबंधी किमान सहा लेख/श्राव्य कार्यक्रम/दृकश्राव्य कार्यक्रम प्रसिद्ध झालेले असावेत.
(टीप- वरील दोन्हीसाठी वेब माध्यमावरील कामही विचारात घेतले जाईल.)
2)  पाठ्यवृत्तीसाठी विषय -
• पत्रकार त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही विषयासंबंधी प्रस्ताव सादर करू शकतात.
• पत्रकारांना मार्गदर्शन व्हावे यासाठी काही विषयांची यादी पुढे देण्यात आली आहे. प्रस्ताव यादीतील किंवा यादीत नसलेल्या विषयासंबंधी असू शकतो.
o  राज्यात अलिकडे घडलेल्या महत्त्वाच्या गंभीर घटनेचा पाठपुरावा (उदा. विदर्भातील शेतकऱ्यांचा कीटकनाशकांमुळे मृत्यू)
o  सार्वत्रिक प्रश्नाचे प्रादेशिक किंवा स्थानिक पातळीवरील स्वरूप
o  राज्यव्यापी प्रश्नाचा व्यापक स्तरावरील अभ्यास
o  सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असणारे परंतु आजवर सर्वस्वी अपरिचित उपक्रम, संस्था किंवा व्यक्ती यांचा सखोल चिकित्सक परिचय
o  सद्यकालीन पत्रकारितेतील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास. (सार्वत्रिक किंवा राज्यव्यापी प्रश्नांमध्ये स्थलांतर, लिंगभेद, सामाजिक दुही, भ्रष्टाचार, मानसिक आरोग्य, प्रदूषण, अस्तंगत होत चाललेले उद्योग-व्यवसाय अशा असंख्य विषयांचा समावेश होऊ शकतो).
3) अर्ज करण्याची प्रक्रिया -
• प्रस्ताव फक्त इमेलद्वारे head.dcj@gmail.com या पत्त्यावर पाठवावेत.
• एकाच इमेलद्वारे खाली नमूद केलेल्या, टंकलिखित असलेल्या व पीडीएफ केलेल्या पाच स्वतंत्र फाइल्स जोडाव्यात. प्रत्येक फाइलच्या नावात अर्जदाराचे नाव व फाइलचा विषय स्पष्टपणे नमूद केलेला असावा. (उदा. अबक अल्पपिरचय.PDF, अबक जन्मदाखला.PDF, अबक प्रस्ताव. PDF इत्यादी)
1. पत्रकाराचा अल्पपरिचय
2. जन्मतारखेचा दाखला
3. अनुभव प्रमाणपत्र किंवा त्यासंबंधीची कागदपत्रे
4. पूर्वप्रकाशित लेखांच्या स्कॅन कॉपी. श्राव्य किंवा दृकश्राव्य कार्यक्रमांचा संदर्भ द्यायचा असल्यास त्यांच्या लिंक्स (संपूर्ण कार्यक्रम मेलने पाठवू नये)
5. प्रस्ताव (पुढीलप्रमाणे)
♦  प्रस्ताव सहाशे ते आठशे शब्दांचा असावा.
प्रस्तावात विषयाचे शीर्षक संबंधित विषयाची पार्श्वभूमी, पत्रकाराचा त्या किंवा तत्सम विषयातील पूर्व अभ्यास अथवा अनुभव; तसेच, विषयाचे महत्त्व सांगून प्रस्तावित अभ्यासपद्धत (मुलाखती, प्रत्यक्ष भेटी, निरीक्षण, दुय्यम माहितीस्रोत, आशय विश्लेषण, सर्वेक्षण इत्यादी) इत्यादींचा तपशील द्यावा.
4) निवडप्रक्रिया -
• टप्पा 1- अर्जांची प्राथमिक छाननी (वय, अनुभव, पूर्वलेखन इत्यादी) विभागप्रमुख व विभागातील अन्य एक शिक्षक यांच्या समितीमार्फत
• टप्पा 2- प्रस्तावांचे मूल्यमापन - विभागप्रमुख, विभागातील अन्य एक शिक्षक, विद्यापीठाच्या अन्य विभागांतील एक ज्येष्ठ प्राध्यापक, साधू परिवाराचे एक प्रतिनिधी व समाजातील एक प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या समितीमार्फत
• टप्पा 3- सर्वोत्तम चार प्रस्ताव सादर करणाऱ्या पत्रकारांच्या, वरील समितीतर्फे प्रत्यक्ष मुलाखती
• प्रस्तावित विषयाची व्याप्ती, समर्पकता, महत्त्व इत्यादींचे मूल्यमापन करून समिती पूर्ण रकमेची एका व्यक्तीला पाठ्यवृत्ती द्यायची की दोघांना विभागून द्यायची ते ठरवेल.
• सदर समितीचा निर्णय अंतिम असेल,
5) पाठ्यवृत्तीची रक्कम तीन समान टप्प्यांत पुढीलप्रमाणे धनादेशाद्वारे ‘ग्रंथाली’च्या वतीने विभागामार्फत अदा केली जाईल.
• पाठ्यवृत्तीच्या घोषणेच्या वेळी - 35 टक्के,
• सहा महिन्यांत झालेल्या कामाचा अहवाल सादर केल्यावर व समितीने तो संमत केल्यावर  35 टक्के, (अंदाजे पुढील वर्षीच्या मार्च अखेरीस)
• अंतिम वृत्तांत सादर केल्यावर व समितीने तो संमत केल्यावर 30 टक्के (अंदाजे पुढील वर्षीच्या ऑगस्टअखेरीस)
6) अंतिम वृत्तांत
पाठ्यवृत्तीप्राप्त पत्रकाराच्या/पत्रकारांच्या नावाची घोषणा करण्यासाठी दरवर्षी 25 सप्टेंबरच्या सुमाराला अरूण साधू स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येईल.
7) पाठ्यवृत्तीधारकांनी अभ्यासाचा मराठीतून लिहिलेला अंतिम वृत्तांत टंकलिखित स्वरूपात सादर करावा. तो किमान आठ ते दहा हजार शब्दांचा असावा. वृत्तांताचा रूपबंध ठरवण्याचे स्वातंत्र्य पाठ्यवृत्तीधारकाला आहे. परंतु वृत्तांत वाचनीय व सर्वसामान्यांना आकलनीय असावा.
पाठ्यवृत्तीधारकाने अंतिम वृत्तां हे पाठ्यवृत्तीधारकाचे मूळ लेखन आहे व त्यात अन्य स्रोतांतून घेतलेल्या सर्व संदर्भांचा योग्य पद्धतीने निर्देश करण्यात आला आहे’ असे प्रमाणपत्र वृत्तांतासोबत जोडणे आवश्यक आहे.
8)  वृत्तांताला प्रसिद्धी
दर्जेदार अभ्यासांचा त्यातील शक्यतेनुसार ‘थिंक महाराष्ट्र’ या संकेतस्थळावर वृत्तांतलेखाद्वारे किंवा ‘ग्रंथाली’द्वारे (पुस्तकरूपाने) प्रसिद्धीसाठी विचार करण्यात येईल.
9) 2020-21 या वर्षासाठीचे वेळापत्रक -
जून, 2020 अखेर - पाठ्यवृत्तीची घोषणा
18 ऑगस्ट, 2020 -  प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम मुदत
(प्रस्ताव फक्त इमेलद्वारे head.dcj@gmail.com या पत्त्यावर पाठवायचे आहेत.)
31 ऑगस्ट, 2020 पूर्वी -  प्राथमिक छाननी
10 सप्टेंबर, 2020 पूर्वी -  प्रस्तावांचे प्राथमिक मूल्यमापन
25 सप्टेंबर, 2020 पूर्वी -  मुलाखती (ऑनलाईन पद्धतीने)
25 सप्टेंबर, 2020 -  अरूण साधू स्मृती व्याख्यान व पाठ्यवृत्तीप्राप्त पत्रकारांच्या नावांची घोषणा (ऑनलाईन पद्धतीने).
31 मार्च, 2021 -  झालेल्या कामाचा अहवाल व पुढील कामाचा आराखडा
31 ऑगस्ट, 2021 - अंतिम वृत्तांत सादर करणे
25 सप्टेंबर, 2021 -  अरूण साधू स्मृती व्याख्यान. पाठ्यवृत्तीधारकांचे सादरीकरण. (ऑनलाईन पद्धतीने)
(अधिक माहितीसाठी संपर्क- डॉ. उज्ज्वला बर्वे 9881464677)

रविवार, २८ जून, २०२०

वाचकांना वारीचे आवाहन (Appeal to Contributors)

पंढरपूरच्या आषाढी वारी निमित्ताने थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर दोन दिवसांत चार लेख प्रसिद्ध केले आहेत. पैकी प्रज्ञा गोखले या सुशिक्षित वारकरी. त्या संत साहित्याने भाववेड्या होऊन गेल्या आणि त्यांनी तत्संबंधात विविध माध्यमांतून अभ्यासपूर्ण व भावनापूर्ण अनुभवपर कथन चालू ठेवली आहेत. एका लेखात (प्रज्ञा गोखले वारीच्या लयीत दंग!) त्यांचा परिचय करून दिला आहे. दुसऱ्या लेखात त्यांचीच वारीसंबंधांतील निरीक्षणे (पंढरीची वारी- मराठी संस्कृतीची आत्मखूण!) नोंदली आहेत. तिसरा लेख (संत परंपरेचे विदेशी अभ्यासक) संत साहित्याच्या परदेशी अभ्यासकांची नोंद करतो तर चौथा लेख (वारीची परंपरा) वारीच्या परंपरेचा इतिहास व वर्तमान सांगण्याचा प्रयत्न करतो.
वारी ही इतकी अफाट आणि प्रदीर्घ परंपरेची गोष्ट आहे, की तीबाबत सहसा भाबडेपणाने, भावपूर्णतेने व म्हणून संदिग्धतेने लिहिले जाते. त्यामधून वारीचा वस्तुनिष्ठ इतिहास कळतच नाही. वारीबाबत लोकांकडे असलेली माहिती लोक जेव्हा भावनिरपेक्ष पद्धतीने मांडतील तेव्हाच वारकरी परंपरेसारख्या अद्भुत गोष्टींचे वस्तुनिष्ठ वर्णन शक्य होईल. ते शेकडो लोकांच्या सहभागातूनच घडू शकेल (क्राऊड सोर्सिंग). तेव्हा वाचकांना विनंती अशी, की त्यांनी त्यांच्याकडे वारी संबंधात सच्ची माहिती असेल तर ती त्यांनी थिंक महाराष्ट्र डॉट कॉमकडे पाठवावी.
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
22 मनुबर मॅन्शन, पहिला मजला
193 बाबासाहेब आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर,
दादर (पूर्व), मुंबई 400 014 
फोन – 9892611767
----------------------------------------------------------------------------------------------

शनिवार, २७ जून, २०२०

संत परंपरेचे विदेशी अभ्यासक (Foreign Scholars of the Saint Tradition )


एलिनॉर झेलिएट
डॉ. एलिनॉर झेलिएट या मराठी दलित संत साहित्याच्या अभ्यासक आहेत. त्यांनी संत चोखामेळा व इतर दलित संत यांच्यावर अभ्यास करण्यासाठी मुख्यत: परिश्रम घेतले. त्यांचा संत चोखामेळा : विविध दर्शन नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे. त्यांना वा.ल.मंजूळ यांचे सहकार्य लाभले. त्यांनी विस्कान्सीन विद्यापीठाच्या वतीने अमेरिकेतील मॅडीसन शहरात भरवण्यात आलेल्या एकतिसाव्या साऊथ एशियन कॉन्फरन्समध्ये एक दिवसाच्या सत्राचे बीजभाषण केले. ते सत्र भारतातील दलित चळवळींवर होते.
अॅना शुल्टज या न्यूयॉर्कच्या. त्या इलिनाईस विद्यापीठाच्या विद्यार्थिनी. त्या राष्ट्रीय कीर्तनावर पीएचडी करत आहेत. त्यांना अमेरिकेच्या प्रा. चार्लस् कँपबेल व मुंबईचे पं. विद्याधर व्यास यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्या वाखरी ते पंढरपूर पालखीबरोबर 1999च्या वारीत पायी चालल्या होत्या. त्यांने इंग्रजीतून कीर्तन वामनबुवा कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या नारद मंदिरात सादर केलेले आहे.
प्रा. शार्लोत वोदविले या फ्रान्सच्या ज्येष्ठ प्राध्यापक होत. त्यांनी फ्रेंच भाषेमध्ये ज्ञानदेवांच्या हरिपाठाची चिकित्सक आवृत्ती प्रसिद्ध केलेली आहे. त्यांनी पंढरपूर : एक संतांचा गाव असा संशोधनपर निबंध अमेरिकेत 1974 साली प्रसिद्ध केला होता, तर जर्मन भाषेत चोखामेळा यांचे चरित्र 1977 साली प्रसिद्ध केलेले आहे. त्या वारकरी संप्रदायात नाव मिळवलेल्या विदुषी आहेत. त्यांनी पालखी सोहळ्यात भाग अनेक वेळा घेतला आहे.
प्रा. विनान्द कॅलेवर्ट हे बेल्जियमच्या लोवेन विद्यापीठाचे प्राध्यापक. त्यांनी त्यांच्या देशात आंतरराष्ट्रीय भक्ती परिषद 1971 साली भरवली होती. ते संत नामदेवांचे अभ्यासक. त्यांच्या नामदेव गाथांचे संगणकयुक्त विश्लेषण संशोधन क्षेत्रात प्रसिद्ध आहे. तसेच, त्यांचे संत दादू, संत रोहिदास यांच्यावरील संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांची भारत भेट पंढरपूर वारीत सहभागी झाल्याशिवाय पूर्ण होत नाही.
प्रा. स्कायहॉक हे पश्चिम जर्मनीच्या हायडेलबर्ग विद्यापीठाचे प्राध्यापक. ते डॉ. सोन्थायमर (वारीहा मराठी चित्रपट निर्माणकर्ते) यांचे पीएचडीचे विद्यार्थी. त्यांचा विषय एकनाथी भागवत हा होता. त्यांनीही पंढरपूरच्या पालखी सोहळ्यात अनेक वेळा भाग घेतलेला आहे.
प्रा. डॉ. जेम्स लेन हे सेंट पॉलचे मॅकॅलेस्टर कॉलेजचे फॅकल्टी डीन. ते धर्म आणि संस्कृती या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या पत्नी जॉय ह्या पुण्याच्या पीएचडी आहेत. अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठ आशियायी अभ्यसाकरता प्रसिद्ध आहे. त्या विद्यापीठातर्फे चाळीस विद्यार्थी- विद्यार्थिनी पुण्यात येतात. तो प्रकल्प एसीएम या नावाने ओळखला जातो. त्या प्रकल्पाचे डायरेक्टर म्हणून प्रा. डॉ. जेम्स लेन अनेक वेळा पुण्याला सहकुटुंब, सहपरिवार राहून गेले आहेत. ते पालखी सोहळा, पंढरपूर भेट आणि वारीदर्शनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह योजतात.
इलिना कोर्टेलेस्सा या इटाली देशातील मिलान विद्यापीठाच्या अभ्यासक. त्या नवऱ्यासह पालखीसोहळा आणि वारकरी संप्रदाय यांचा अभ्यास (पीएचडी) करण्याकरता पंढरपूर येथे आल्या होत्या. त्यांना त्याबाबत पंढरपुरात इंग्रजी भाषेमधून माहिती सांगणारी कोणी व्यक्ती भेटली नाही म्हणून त्या चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या सूचनेवरून पुण्यात येऊन राहिल्या. तेथे त्यांना प्रा. शं.रा.तळघट्टी यांनी वारकरी संप्रदायाबाबत माहिती दिली. त्यांनी वारी, आळंदी आणि श्रीविठ्ठल यासंबंधीची माहिती वा.ल. मंजूळ यांच्याकडून घेतली.
ख्रिश्चन नोवेटस्की
प्रा. ख्रिश्चन नोवेटस्की हे मूळचे अमेरिकेतील मॅकॅलेस्टर कॉलेजचे, आशियायी तत्त्वज्ञान विषयाचे पदवीधर. ते हॉर्वर्ड विद्यापीठातून प्रा. गॅरी टब यांच्या हाताखाली धर्माचा इतिहास विषय घेऊन एम ए झाले. ते संत नामदेवांचे अभ्यासक. त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी तीन-चार प्रकारच्या शिष्यवृत्त्या लाभल्या आहेत. त्यांनी एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकामध्ये बहिणाबाई, तुकाराम, ज्ञानेश्वर, चोखामेळा यांच्यावर सविस्तर टिपणे लिहिली आहेत. ते 1996 साली कोलंबिया विद्यापीठातून प्रा. जॅक हावले, अरिझोनाच्या प्रा. फेल्डहौस यांच्या मार्गदर्शनाखाली संत नामदेवांवर पीएचडी करण्यासाठी दोन-तीन वेळा पुण्यात येऊन राहून गेले आहेत.
(बापरखुमादेवीवरूया मासिकातील वा.ल. मंजूळ यांच्या लेखनावरून संकलित राजेंद्र शिंदे)
---------------------------------------------------------------------------------------------------------