देवाघरची बाळे (Gifted Children)

Header Ads Widget

दालन

10/recent/ticker-posts

देवाघरची बाळे (Gifted Children)


'इराज स्क्रिप्ट'
ठाण्याचे रंजन जोशी यांचे घरच चित्रकलेचे आहे. ते स्वतः, त्यांच्या पत्नी विद्या, दोघेही जे.जे. इंस्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये प्राध्यापक होते. त्यांचा मुलगा आदित्य, सून गौरी; ती दोघेही चित्रकलेचे शिक्षण घेऊन जाहिरातक्षेत्रात कामे करतात. आदित्य-गौरी यांची आठ वर्षांची छोटी मुलगी इरा हिला तिच्या खोलीत चित्रे काढण्यास एक भिंतच्या भिंत आहे. ती त्यावर मूर्त-अमूर्त चित्राकार काढत बसते. आजोबांनी एके दिवशी तिला कामगिरी दिली, की 'त्या चित्रांमध्ये मला अल्फाबेट्स दिसतात, तू ती रेखून काढ बरे'. आजोबांचे ते म्हणणे इरेने ईर्षेने घेतले व खरोखरीच, त्या भिंतीवरील
रंजन जोशी आणि दीपक घारे
चित्रांमध्ये रेखलेली सव्वीस इंग्रजी अक्षरे दिसू लागली. घरात आनंद पसरला, इराही हर्षून गेली. पण तिच्या आई-बाबांनी दुसऱ्या दिवशी तिला आश्चर्याचा धक्का संगणकावर दिला. त्यांनी संगणकावर ती लिपी जशीच्या तशी उतरवून साकार केली. त्यांनी तिला नाव दिले 'इराज् स्क्रिप्ट'. इराने ती मित्रमंडळींत, शिक्षकांत 'शेअर
' केली -सध्या सर्वत्र ऑनलाइन शिक्षण आहे ना! इराचा तोरा वाढला. आजोबा-आजी खूष झाली. त्यांनीही आम्हा मित्रमंडळींत ती गोष्ट 'शेअर' केली, तर मान्यवर साहित्यकला समीक्षक दीपक घारे म्हणाले, की "मुले हल्ली उत्स्फूर्तपणे अद्भुत गोष्टी घेऊन येतात. माझ्या नातवाच्या बालवर्गातील पद्मजा आंजर्लेकर या पाच वर्षांच्या मुलीने रोमन लिपीतील सगळ्या अक्षरांना देवनागरी लिपीतील उकार जोडले आहेत. त्यामधून लिपीसंकराचा वेगळाच नमुना तयार झाला आहे".
          मुले घरोघरी सध्या चित्रकलेत प्रवीण जाणवतात. त्यांच्या हाती रंग विविध असतात, स्टेशनरी नाना तऱ्हांची असते आणि त्यांचे कल्पनाविश्व विस्तारले आहे. किंबहुना, मुले आणि चित्रकला हे आविष्काराचे नाते पूर्वापार होते. कारण मुलांना त्यांच्या कलाविष्कारासाठी साधेसोपे साधन घरात असते ते कागद-पेन्सिल-रंगांचे. पण ते फक्त बालवयापुरते राही. चित्रकला हे मुलांच्या अभिव्यक्तीचे माध्यम हे स्थान मात्र काही तज्ज्ञांनी जाणले व ते समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. नागपूरचे चंद्रकांत चन्ने गेली चव्वेचाळीस वर्षे मुलांसाठी वर्षाकाठी दोन चित्रकला शिबिरे भरवत असतात. त्यांच्या त्या प्रयत्नांतून हजारो मुले चित्रकला साक्षरच नव्हे तर कलाकार होऊन बाहेर पडली आहेत. चन्ने यांचा दावाच हा आहे, की पालक बालकांची अभिव्यक्ती गांभीर्याने घेत नाहीत. चन्ने यांच्या
'बसोली' समूहाचे कार्य भारतातच नव्हे तर इंग्लंड, फ्रान्सपर्यंत जाऊन पोचले आहे. असे प्रयत्न आणखीही होत असतात. एनडीटीव्हीने मुलांच्या चित्रकलेचा, बाल कल्याण संस्थेच्या सहाय्यार्थ एक मोठा 'इव्हेंट' अलिकडेच योजला होता. त्यांनी मुलांनी काढलेली चित्रे पडद्यावर दाखवली. ती पाहूनच प्रेक्षक स्तंभित झाले! एका मुलाचे चित्र दोन लाख रुपयांना विकले गेले. इव्हेंटमधून पाच कोटी रुपये उभे राहिले. 'सकाळ'ची मुलांची चित्रकला स्पर्धा दरवर्षी अशीच सघन आणि कल्पनातीत होत असते. मुलांच्या आविष्काराला सध्या असे असाधारण महत्त्व आले आहे. पालकांनी ते जाणले मात्र पाहिजे.
          'अमृत' नावाचे नाशिकच्या गावकरी ग्रूपचे मासिक खूप वर्षांपूर्वी दर महिन्याला 'चिमखडे बोल' नावाचे सदर प्रसिद्ध करी. त्यामध्ये मुलांची अविश्वसनीय वाटावी अशी वचने प्रसिद्ध होत. परंतु ती त्यावेळी नवलाई भासे. त्या काळात मुले पुढे येण्यास बुजत असत. त्यामुळे पालक त्यांचे घरातील खाजगीतील बोल मासिकाकडे पाठवत. आता मुळी मुलेच स्मार्ट झाली आहेत व ती वेगवेगळ्या माध्यमांतून जगासमोर येत असतात. चित्रकला व चिमखडे बोल एवढ्यापुरती मर्यादित असलेली चटपटीत मुलांची प्रतिभा, गेल्या दोन-तीन दशकांत मात्र बहुअंगांनी बहरली आहे. त्यांना ऑडिओ-व्हिडिओ यांमधून अधिकाधिक 'एक्सपोजर' मिळू लागले आहे व तेवढे त्यांचे गुण उफाळून येत आहेत. त्याच काळात गर्भज्ञानाची पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली, त्यासाठी गर्भवती महिलांची अभ्यास शिबिरे सुरू झाली. 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती' अशा तऱ्हेच्या लेखमाला मासिकांत येऊ लागल्या.
         त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चार वर्षे वयाच्या वसुंधरेचे. माझा 'थिंक महाराष्ट्र'मधील दहा वर्षांपासूनचा सहकारी किरण क्षीरसागर व त्याची पत्नी रोहिणी यांच्या पोटी जन्माला आलेली वसुंधरा आहे, सिनियर केजीत. परंतु तिचा नखरा, तिचे बोलणे या जगापलीकडचे वाटते. रेडिओवरील कार्यक्रम निर्मात्यांनी वसुंधराचे रूप, तिची अदा फेसबुकवर पाहिले आणि तिला रेडिओवर बोलावून त्या छोट्या मुलीचा कार्यक्रमच प्रक्षेपित केला! किरण-रोहिणी वेगवेगळ्या निमित्ताने वसुंधराचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत होतेच. त्यामुळे वसुंधरा त्या छोट्या समूहजगात 'हिरॉईन'च होऊन गेली आहे. लोकांकडून तिच्या नवनव्या व्हिडिओची मागणी यायची असे किरणने सांगितले. पण मग त्यानेच ते तिचे ओव्हर एक्स्पोजर थांबवण्याचा निर्णय घेतला. किरणची निरीक्षणे उद्बोधक वाटतात. तो म्हणतो, तिला भाषेचा अर्थ कळत नाही, पण वळतो. तो तिला आमच्या टोनिंगवरून स्पष्ट होत असावा. एकदा तिला तिची आई म्हणाली, मी राजकन्या आहे, तर ती तत्काळ उद्गारली, "छे छे, तू तर दासी आहेस"! तिच्या तोंडची अशी शेकडो वचने आहेत. हे शब्दभांडार तिच्याकडे कोठून येते ते कळत नाही.
लीला पाटील
          शिक्षणतज्ज्ञ लीला पाटील यांनी मुलांना ज्ञान कोठून प्राप्त होते याचा एका मोठ्या सर्व्हे प्रॉजेक्टमध्ये शोध घेतला. तेव्हा त्यांनी असे म्हटले होते, की "मुलांना ज्ञान खूप असते. ते ती मुले एका शब्दाक्षरातून वा वाक्यातून चकित व्हायला होईल अशा तऱ्हेने मांडत असतात. त्याचा प्रौढांना अचंबा वाटतो कारण त्या अक्षर-वाक्यांचे पूर्ण विवरण करण्याची क्षमता मुलांची त्या वयात नसते. ते कौशल्य वेगळे आहे. मुले वाटतात तेवढी अजाण नसतात". मुलांच्या भावविचारांचे आणि कल्पनांचे विश्व अद्भुत असते आणि ते खुलवावे तेवढे खुलते हा, खरे तर, घराघरांतील अनुभव असतो. घरात दीड-दोन ते चार वर्षांचे बालक असले, की हल्लीच्या भाषेत तो '24 x 7 फुल टू टाईमपास' असतो. मुलांना जगभरचे एक्सपोझर लाभत असल्याने त्यांची कल्पनाशक्तीदेखील आकाशाला गवसणी घालणारी असू शकते.
          घरोघरच्या या अनुभवावर कडी केली ती हर्षद नायबळ नावाच्या चार-पाच वर्षांच्या मुलाने, तो कलर टीव्हीच्या 'सूर नवा ध्यास नवा' या संगीत स्पर्धेत मॉनिटर म्हणून अवतरला तेव्हा. त्याने झी सारेगमपची सांगितिक क्षेत्रातील आकर्षक कार्यक्रमांची जवळजवळ पंचवीस वर्षांची पुंजी तीन-चार महिन्यांच्या एका पर्वात (सीझन) कलर्स मराठीकडे खेचून आणली. तो चमत्कारच होता! तो अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. मिलिंद जोशी-मिथिलेश पाटणकर ही संगीतकार द्वयी आणि प्रशांत नाईक हा दिग्दर्शक यांनी कार्यक्रमासाठीच्या प्राथमिक फेरीत (ऑडिशन) त्याला हेरला कसा, व गाणे म्हणण्यास आलेल्या त्या मुलाला या वेगळ्या भूमिकेत सादर केला कसा, सारेच अद्भुत! त्या तिघांपैकी मिलिंद जोशी याच्याशी माझे बोलणे झाले. तो असे म्हणाला, की आम्हाला हर्षद औरंगाबादच्या ऑडिशनमध्ये वेगळा जाणवला. परंतु, त्याला मॉनिटर म्हणून निवेदनात खेचण्याची कल्पना प्रशांतची. तेथे त्याच्यातील दिग्दर्शक दिसला! त्या कार्यक्रमांनंतर हर्षद साऱ्या प्रेक्षकांचा जिवलग झाला आणि कार्यक्रम निवेदक स्पृहा जोशीनेही त्याला लडिवाळपणे सांभाळले. कमाल झाली ती अंतिम फेरीत, जेव्हा आशा भोसले हर्षदची कामगिरी पाहून आसनातून उठून उभ्या राहिल्या, त्यांनी टाळ्या वाजवल्या व हर्षदला प्रेमाने जवळ घेतले. आशा भोसले यांचा स्पर्श म्हणजे काय हे कळण्याइतके हर्षदचे ना वय -ना समजूत; तसेच बालसुलभ भाव त्याच्या चेहर्‍यावर त्यावेळी दिसत होते. तेव्हाच त्याचे वर्णन देवाघरचे बाळ असे करण्यात आले. वास्तविक, जगातील प्रत्येक मूल त्याचा निष्पापपणा हरवेपर्यंत देवाघरचे बाळच असते. परंतु त्याचे गुण प्रकट होण्यासाठी संधी हवी असते.
        
मिलिंद जोशी
मी यासंबंधात अधिक बोलणे मिलिंद जोशीशीच केले. तेव्हा माझ्या ध्यानी आले, की मिलिंदचे बालपण व त्याची करिअरही अशीच विविधरंगी आहे. त्याने वडिलांच्या बदल्यांनुसार सारा खानदेश त्यावेळी पालथा घातला. मिलिंदने बालपणीच कमळाचे चित्र काढून दाखवले ते त्रिमितीमध्ये. ती त्रिमिती रंगछटांनी साधली होती. ती त्यावेळी अपूर्वाई होती. मिलिंद त्याच्या लहानपणीचे, अशक्य वाटावे असे किस्से सांगतो. त्यावरून कळते, की तो विधायक व्रात्यपणापण त्याच्या स्वभावातच आहे. पुढे मिलिंद पुण्याच्या अभिनव कलाविद्यालयात शिकला. त्याला सहचारी म्हणून कलावंत मनीषा पवार लाभली आणि  तेव्हापासूनच त्याचे जीवन विविध कलांनी बहरून आले- चित्रकला, संगीत, गझलगायन, कवितालेखन, संगीत शिक्षण वगैरे वगैरे. त्याचा स्वलिखित व हस्ताक्षरातील (कॅलिग्राफी) कवितासंग्रह -असंच होतं ना तुलाही?- काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला. ते त्याचे मनोगतच वाटते. तर कोरोनाच्या काळात त्याने रद्दीकागदांतून हँडमेड पेपर घरच्या घरी बनवण्याचे तंत्र विकसित केले आहे.

          मिलिंद म्हणतो, की कलेला समीक्षेत पकडण्याचे प्रयत्न होतात व त्यामुळे ती निर्मात्याला व रसिकालाही अवघड बनून जाते, पण कला व्याकरणाच्या अलिकडे-पलीकडे असते. ती तशीच अस्फूट, सूचक राहणे यात गंमत आहे. बालकांना प्रौढांच्या व्याकरणाची बाधा नसल्याने ती मुक्त सुटतात आणि नव्या जमान्यात तर त्यांच्यासमोर अवघे जग उघडे झाले आहे. बालके पाचही ज्ञानेंद्रियांनी अनुभव बुद्धीत सामावून घेतात व तशीच मोकळी होतात. कोणा बालकाला कोणता संदर्भ कसा मिळतो हा अखेरीस योग आहे. तो हर्षदच्या वेळी अपूर्वतेने जमून आला. पण प्रत्येक बालक देवाघरूनच काही घेऊन येते. त्यास सभोवताल व संधी मात्र लाभली पाहिजे.
          इंग्रजीत प्रॉडीजी म्हणजे बालवयातील चमत्कार अशी वेगळी वर्गवारी आहे. त्यांना समाजात तसे वेगळे स्थान असते. मोझार्ट या जगद्विख्यात पाश्चात्य संगीतकारास चौथ्या वर्षीच सारे संगीतज्ञान असल्याचे प्रकट झाले होते. आपले श्रीनिवास रामानुजन यांना अकराव्या वर्षी गणितातील तोपर्यंत अनाकलनीय कोडी उलगडून दाखवली म्हणून जगातील सर्वश्रेष्ठ सात 'प्रॉडीजीं'मध्ये स्थान आहे. ज्ञानेश्वरांचे उदाहरण महाराष्ट्रात तसेच सांगितले जाते. लता मंगेशकर बालवयात फार मोठे गाऊन दाखवू लागल्या तेव्हा त्यांच्या गाण्याला 'दिव्य' म्हणजे या भूलोकीचे नव्हे असे म्हटले जाऊ लागले. मात्र असे लोकविलक्षण गुणविशेष घेऊन बरीच मुले जन्माला येतात व असाधारण कर्तबगारी गाजवतात असेच हल्ली दिसून येते. पालक मुलांना व्यक्त होण्याची सध्या संधी देत आहेत हे खरे, परंतु आधुनिक ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धत असे सांगते, की मुले स्वतःची स्वतः शिकत असतात. पालक-शिक्षकांनी त्यांना तसे वातावरण व साधने उपलब्ध करून द्यायची असतात. मला रंजन जोशीच्या, किरण क्षीरसागरच्या घरी तसे उत्तम पालकत्वाचे प्रयत्न चाललेले जाणवतात. शहाण्या पालकांची संख्या गेल्या काही दशकांत वाढत आहे. मुलांना विश्वदर्शन (एक्सपोजर) होऊ लागल्यामुळे सुजाण पालकत्व ही जबाबदारी झाली आहे.
ग्रेटा थुनबर्ग
          माणसांचे वृद्धत्व जसे ऐंशी-नव्वद वये होईपर्यंत लांबत चालले आहे, तसे बालकांना जन्माला आल्यानंतर ज्ञानसंवेदन लवकर-लवकरच्या वयात होऊ लागले आहे. त्यामुळे मुलांकडून अपेक्षाही वाढत आहेत. म्हणजे बघा हं - पर्यावरणाच्या चळवळीला गेल्या तीन दशकांत यश लाभले नाही, तेव्हा तो झेंडा ग्रेटा थुनबर्ग नावाच्या अकरा वर्षांच्या मुलीने उचलला आहे. तिच्यासोबत तिच्याच वयाची मुलेमुली वेगवेगळ्या देशांतून जमा होत आहेत. ते आंदोलन खूप मोठे होणार अशी लक्षणे असतानाच कोरोनाने माणुसकीला ग्रासले आहे व वेगळेच प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनानंतरच्या काळात ही बालप्रतिभा कोणते व कशा प्रकारचे रूप घेऊन प्रकट होते ते पाहायचे. लक्षात ठेवायला हवे, की घरोघरची मुले एकेकटी नाहीत, त्यांची शक्ती कोठेतरी-कोणत्यातरी निमित्ताने संघटित होत आहे!
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या