रविवार, ३१ मे, २०२०

देवाघरची बाळे (Gifted Children)


'इराज स्क्रिप्ट'
ठाण्याचे रंजन जोशी यांचे घरच चित्रकलेचे आहे. ते स्वतः, त्यांच्या पत्नी विद्या, दोघेही जे.जे. इंस्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये प्राध्यापक होते. त्यांचा मुलगा आदित्य, सून गौरी; ती दोघेही चित्रकलेचे शिक्षण घेऊन जाहिरातक्षेत्रात कामे करतात. आदित्य-गौरी यांची आठ वर्षांची छोटी मुलगी इरा हिला तिच्या खोलीत चित्रे काढण्यास एक भिंतच्या भिंत आहे. ती त्यावर मूर्त-अमूर्त चित्राकार काढत बसते. आजोबांनी एके दिवशी तिला कामगिरी दिली, की 'त्या चित्रांमध्ये मला अल्फाबेट्स दिसतात, तू ती रेखून काढ बरे'. आजोबांचे ते म्हणणे इरेने ईर्षेने घेतले व खरोखरीच, त्या भिंतीवरील
रंजन जोशी आणि दीपक घारे
चित्रांमध्ये रेखलेली सव्वीस इंग्रजी अक्षरे दिसू लागली. घरात आनंद पसरला, इराही हर्षून गेली. पण तिच्या आई-बाबांनी दुसऱ्या दिवशी तिला आश्चर्याचा धक्का संगणकावर दिला. त्यांनी संगणकावर ती लिपी जशीच्या तशी उतरवून साकार केली. त्यांनी तिला नाव दिले 'इराज् स्क्रिप्ट'. इराने ती मित्रमंडळींत, शिक्षकांत 'शेअर
' केली -सध्या सर्वत्र ऑनलाइन शिक्षण आहे ना! इराचा तोरा वाढला. आजोबा-आजी खूष झाली. त्यांनीही आम्हा मित्रमंडळींत ती गोष्ट 'शेअर' केली, तर मान्यवर साहित्यकला समीक्षक दीपक घारे म्हणाले, की "मुले हल्ली उत्स्फूर्तपणे अद्भुत गोष्टी घेऊन येतात. माझ्या नातवाच्या बालवर्गातील पद्मजा आंजर्लेकर या पाच वर्षांच्या मुलीने रोमन लिपीतील सगळ्या अक्षरांना देवनागरी लिपीतील उकार जोडले आहेत. त्यामधून लिपीसंकराचा वेगळाच नमुना तयार झाला आहे".
          मुले घरोघरी सध्या चित्रकलेत प्रवीण जाणवतात. त्यांच्या हाती रंग विविध असतात, स्टेशनरी नाना तऱ्हांची असते आणि त्यांचे कल्पनाविश्व विस्तारले आहे. किंबहुना, मुले आणि चित्रकला हे आविष्काराचे नाते पूर्वापार होते. कारण मुलांना त्यांच्या कलाविष्कारासाठी साधेसोपे साधन घरात असते ते कागद-पेन्सिल-रंगांचे. पण ते फक्त बालवयापुरते राही. चित्रकला हे मुलांच्या अभिव्यक्तीचे माध्यम हे स्थान मात्र काही तज्ज्ञांनी जाणले व ते समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. नागपूरचे चंद्रकांत चन्ने गेली चव्वेचाळीस वर्षे मुलांसाठी वर्षाकाठी दोन चित्रकला शिबिरे भरवत असतात. त्यांच्या त्या प्रयत्नांतून हजारो मुले चित्रकला साक्षरच नव्हे तर कलाकार होऊन बाहेर पडली आहेत. चन्ने यांचा दावाच हा आहे, की पालक बालकांची अभिव्यक्ती गांभीर्याने घेत नाहीत. चन्ने यांच्या
'बसोली' समूहाचे कार्य भारतातच नव्हे तर इंग्लंड, फ्रान्सपर्यंत जाऊन पोचले आहे. असे प्रयत्न आणखीही होत असतात. एनडीटीव्हीने मुलांच्या चित्रकलेचा, बाल कल्याण संस्थेच्या सहाय्यार्थ एक मोठा 'इव्हेंट' अलिकडेच योजला होता. त्यांनी मुलांनी काढलेली चित्रे पडद्यावर दाखवली. ती पाहूनच प्रेक्षक स्तंभित झाले! एका मुलाचे चित्र दोन लाख रुपयांना विकले गेले. इव्हेंटमधून पाच कोटी रुपये उभे राहिले. 'सकाळ'ची मुलांची चित्रकला स्पर्धा दरवर्षी अशीच सघन आणि कल्पनातीत होत असते. मुलांच्या आविष्काराला सध्या असे असाधारण महत्त्व आले आहे. पालकांनी ते जाणले मात्र पाहिजे.
          'अमृत' नावाचे नाशिकच्या गावकरी ग्रूपचे मासिक खूप वर्षांपूर्वी दर महिन्याला 'चिमखडे बोल' नावाचे सदर प्रसिद्ध करी. त्यामध्ये मुलांची अविश्वसनीय वाटावी अशी वचने प्रसिद्ध होत. परंतु ती त्यावेळी नवलाई भासे. त्या काळात मुले पुढे येण्यास बुजत असत. त्यामुळे पालक त्यांचे घरातील खाजगीतील बोल मासिकाकडे पाठवत. आता मुळी मुलेच स्मार्ट झाली आहेत व ती वेगवेगळ्या माध्यमांतून जगासमोर येत असतात. चित्रकला व चिमखडे बोल एवढ्यापुरती मर्यादित असलेली चटपटीत मुलांची प्रतिभा, गेल्या दोन-तीन दशकांत मात्र बहुअंगांनी बहरली आहे. त्यांना ऑडिओ-व्हिडिओ यांमधून अधिकाधिक 'एक्सपोजर' मिळू लागले आहे व तेवढे त्यांचे गुण उफाळून येत आहेत. त्याच काळात गर्भज्ञानाची पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली, त्यासाठी गर्भवती महिलांची अभ्यास शिबिरे सुरू झाली. 'घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती' अशा तऱ्हेच्या लेखमाला मासिकांत येऊ लागल्या.
         त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चार वर्षे वयाच्या वसुंधरेचे. माझा 'थिंक महाराष्ट्र'मधील दहा वर्षांपासूनचा सहकारी किरण क्षीरसागर व त्याची पत्नी रोहिणी यांच्या पोटी जन्माला आलेली वसुंधरा आहे, सिनियर केजीत. परंतु तिचा नखरा, तिचे बोलणे या जगापलीकडचे वाटते. रेडिओवरील कार्यक्रम निर्मात्यांनी वसुंधराचे रूप, तिची अदा फेसबुकवर पाहिले आणि तिला रेडिओवर बोलावून त्या छोट्या मुलीचा कार्यक्रमच प्रक्षेपित केला! किरण-रोहिणी वेगवेगळ्या निमित्ताने वसुंधराचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत होतेच. त्यामुळे वसुंधरा त्या छोट्या समूहजगात 'हिरॉईन'च होऊन गेली आहे. लोकांकडून तिच्या नवनव्या व्हिडिओची मागणी यायची असे किरणने सांगितले. पण मग त्यानेच ते तिचे ओव्हर एक्स्पोजर थांबवण्याचा निर्णय घेतला. किरणची निरीक्षणे उद्बोधक वाटतात. तो म्हणतो, तिला भाषेचा अर्थ कळत नाही, पण वळतो. तो तिला आमच्या टोनिंगवरून स्पष्ट होत असावा. एकदा तिला तिची आई म्हणाली, मी राजकन्या आहे, तर ती तत्काळ उद्गारली, "छे छे, तू तर दासी आहेस"! तिच्या तोंडची अशी शेकडो वचने आहेत. हे शब्दभांडार तिच्याकडे कोठून येते ते कळत नाही.
लीला पाटील
          शिक्षणतज्ज्ञ लीला पाटील यांनी मुलांना ज्ञान कोठून प्राप्त होते याचा एका मोठ्या सर्व्हे प्रॉजेक्टमध्ये शोध घेतला. तेव्हा त्यांनी असे म्हटले होते, की "मुलांना ज्ञान खूप असते. ते ती मुले एका शब्दाक्षरातून वा वाक्यातून चकित व्हायला होईल अशा तऱ्हेने मांडत असतात. त्याचा प्रौढांना अचंबा वाटतो कारण त्या अक्षर-वाक्यांचे पूर्ण विवरण करण्याची क्षमता मुलांची त्या वयात नसते. ते कौशल्य वेगळे आहे. मुले वाटतात तेवढी अजाण नसतात". मुलांच्या भावविचारांचे आणि कल्पनांचे विश्व अद्भुत असते आणि ते खुलवावे तेवढे खुलते हा, खरे तर, घराघरांतील अनुभव असतो. घरात दीड-दोन ते चार वर्षांचे बालक असले, की हल्लीच्या भाषेत तो '24 x 7 फुल टू टाईमपास' असतो. मुलांना जगभरचे एक्सपोझर लाभत असल्याने त्यांची कल्पनाशक्तीदेखील आकाशाला गवसणी घालणारी असू शकते.
          घरोघरच्या या अनुभवावर कडी केली ती हर्षद नायबळ नावाच्या चार-पाच वर्षांच्या मुलाने, तो कलर टीव्हीच्या 'सूर नवा ध्यास नवा' या संगीत स्पर्धेत मॉनिटर म्हणून अवतरला तेव्हा. त्याने झी सारेगमपची सांगितिक क्षेत्रातील आकर्षक कार्यक्रमांची जवळजवळ पंचवीस वर्षांची पुंजी तीन-चार महिन्यांच्या एका पर्वात (सीझन) कलर्स मराठीकडे खेचून आणली. तो चमत्कारच होता! तो अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. मिलिंद जोशी-मिथिलेश पाटणकर ही संगीतकार द्वयी आणि प्रशांत नाईक हा दिग्दर्शक यांनी कार्यक्रमासाठीच्या प्राथमिक फेरीत (ऑडिशन) त्याला हेरला कसा, व गाणे म्हणण्यास आलेल्या त्या मुलाला या वेगळ्या भूमिकेत सादर केला कसा, सारेच अद्भुत! त्या तिघांपैकी मिलिंद जोशी याच्याशी माझे बोलणे झाले. तो असे म्हणाला, की आम्हाला हर्षद औरंगाबादच्या ऑडिशनमध्ये वेगळा जाणवला. परंतु, त्याला मॉनिटर म्हणून निवेदनात खेचण्याची कल्पना प्रशांतची. तेथे त्याच्यातील दिग्दर्शक दिसला! त्या कार्यक्रमांनंतर हर्षद साऱ्या प्रेक्षकांचा जिवलग झाला आणि कार्यक्रम निवेदक स्पृहा जोशीनेही त्याला लडिवाळपणे सांभाळले. कमाल झाली ती अंतिम फेरीत, जेव्हा आशा भोसले हर्षदची कामगिरी पाहून आसनातून उठून उभ्या राहिल्या, त्यांनी टाळ्या वाजवल्या व हर्षदला प्रेमाने जवळ घेतले. आशा भोसले यांचा स्पर्श म्हणजे काय हे कळण्याइतके हर्षदचे ना वय -ना समजूत; तसेच बालसुलभ भाव त्याच्या चेहर्‍यावर त्यावेळी दिसत होते. तेव्हाच त्याचे वर्णन देवाघरचे बाळ असे करण्यात आले. वास्तविक, जगातील प्रत्येक मूल त्याचा निष्पापपणा हरवेपर्यंत देवाघरचे बाळच असते. परंतु त्याचे गुण प्रकट होण्यासाठी संधी हवी असते.
        
मिलिंद जोशी
मी यासंबंधात अधिक बोलणे मिलिंद जोशीशीच केले. तेव्हा माझ्या ध्यानी आले, की मिलिंदचे बालपण व त्याची करिअरही अशीच विविधरंगी आहे. त्याने वडिलांच्या बदल्यांनुसार सारा खानदेश त्यावेळी पालथा घातला. मिलिंदने बालपणीच कमळाचे चित्र काढून दाखवले ते त्रिमितीमध्ये. ती त्रिमिती रंगछटांनी साधली होती. ती त्यावेळी अपूर्वाई होती. मिलिंद त्याच्या लहानपणीचे, अशक्य वाटावे असे किस्से सांगतो. त्यावरून कळते, की तो विधायक व्रात्यपणापण त्याच्या स्वभावातच आहे. पुढे मिलिंद पुण्याच्या अभिनव कलाविद्यालयात शिकला. त्याला सहचारी म्हणून कलावंत मनीषा पवार लाभली आणि  तेव्हापासूनच त्याचे जीवन विविध कलांनी बहरून आले- चित्रकला, संगीत, गझलगायन, कवितालेखन, संगीत शिक्षण वगैरे वगैरे. त्याचा स्वलिखित व हस्ताक्षरातील (कॅलिग्राफी) कवितासंग्रह -असंच होतं ना तुलाही?- काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला. ते त्याचे मनोगतच वाटते. तर कोरोनाच्या काळात त्याने रद्दीकागदांतून हँडमेड पेपर घरच्या घरी बनवण्याचे तंत्र विकसित केले आहे.

          मिलिंद म्हणतो, की कलेला समीक्षेत पकडण्याचे प्रयत्न होतात व त्यामुळे ती निर्मात्याला व रसिकालाही अवघड बनून जाते, पण कला व्याकरणाच्या अलिकडे-पलीकडे असते. ती तशीच अस्फूट, सूचक राहणे यात गंमत आहे. बालकांना प्रौढांच्या व्याकरणाची बाधा नसल्याने ती मुक्त सुटतात आणि नव्या जमान्यात तर त्यांच्यासमोर अवघे जग उघडे झाले आहे. बालके पाचही ज्ञानेंद्रियांनी अनुभव बुद्धीत सामावून घेतात व तशीच मोकळी होतात. कोणा बालकाला कोणता संदर्भ कसा मिळतो हा अखेरीस योग आहे. तो हर्षदच्या वेळी अपूर्वतेने जमून आला. पण प्रत्येक बालक देवाघरूनच काही घेऊन येते. त्यास सभोवताल व संधी मात्र लाभली पाहिजे.
          इंग्रजीत प्रॉडीजी म्हणजे बालवयातील चमत्कार अशी वेगळी वर्गवारी आहे. त्यांना समाजात तसे वेगळे स्थान असते. मोझार्ट या जगद्विख्यात पाश्चात्य संगीतकारास चौथ्या वर्षीच सारे संगीतज्ञान असल्याचे प्रकट झाले होते. आपले श्रीनिवास रामानुजन यांना अकराव्या वर्षी गणितातील तोपर्यंत अनाकलनीय कोडी उलगडून दाखवली म्हणून जगातील सर्वश्रेष्ठ सात 'प्रॉडीजीं'मध्ये स्थान आहे. ज्ञानेश्वरांचे उदाहरण महाराष्ट्रात तसेच सांगितले जाते. लता मंगेशकर बालवयात फार मोठे गाऊन दाखवू लागल्या तेव्हा त्यांच्या गाण्याला 'दिव्य' म्हणजे या भूलोकीचे नव्हे असे म्हटले जाऊ लागले. मात्र असे लोकविलक्षण गुणविशेष घेऊन बरीच मुले जन्माला येतात व असाधारण कर्तबगारी गाजवतात असेच हल्ली दिसून येते. पालक मुलांना व्यक्त होण्याची सध्या संधी देत आहेत हे खरे, परंतु आधुनिक ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धत असे सांगते, की मुले स्वतःची स्वतः शिकत असतात. पालक-शिक्षकांनी त्यांना तसे वातावरण व साधने उपलब्ध करून द्यायची असतात. मला रंजन जोशीच्या, किरण क्षीरसागरच्या घरी तसे उत्तम पालकत्वाचे प्रयत्न चाललेले जाणवतात. शहाण्या पालकांची संख्या गेल्या काही दशकांत वाढत आहे. मुलांना विश्वदर्शन (एक्सपोजर) होऊ लागल्यामुळे सुजाण पालकत्व ही जबाबदारी झाली आहे.
ग्रेटा थुनबर्ग
          माणसांचे वृद्धत्व जसे ऐंशी-नव्वद वये होईपर्यंत लांबत चालले आहे, तसे बालकांना जन्माला आल्यानंतर ज्ञानसंवेदन लवकर-लवकरच्या वयात होऊ लागले आहे. त्यामुळे मुलांकडून अपेक्षाही वाढत आहेत. म्हणजे बघा हं - पर्यावरणाच्या चळवळीला गेल्या तीन दशकांत यश लाभले नाही, तेव्हा तो झेंडा ग्रेटा थुनबर्ग नावाच्या अकरा वर्षांच्या मुलीने उचलला आहे. तिच्यासोबत तिच्याच वयाची मुलेमुली वेगवेगळ्या देशांतून जमा होत आहेत. ते आंदोलन खूप मोठे होणार अशी लक्षणे असतानाच कोरोनाने माणुसकीला ग्रासले आहे व वेगळेच प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनानंतरच्या काळात ही बालप्रतिभा कोणते व कशा प्रकारचे रूप घेऊन प्रकट होते ते पाहायचे. लक्षात ठेवायला हवे, की घरोघरची मुले एकेकटी नाहीत, त्यांची शक्ती कोठेतरी-कोणत्यातरी निमित्ताने संघटित होत आहे!
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------------------

शुक्रवार, २९ मे, २०२०

लॉकडाऊनने दिला 'उमंग'ला जन्म! (Worldwide Art Competition during Lockdown Period)लॉकडाऊन अजून दोन-पाच महिने तरी मागेपुढे होत राहील -कधी असेल, कधी नसेल- पण जगभरच्या नागरिकांच्या नशिबी घरी बसणे -घरकाम लवकर सुटेल असे वाटत नाही; त्याचबरोबर अशा एकांतवासात, बंदिवासात - वर्णन कसेही करावे - लोकांनी करण्याच्या विविध गोष्टीदेखील चुकणार नाहीत. अशाच गप्पागोष्टींतून 'उमंग'चा जन्म झाला आणि ते 'बाळ' बघता बघता, अक्षरशः दोन आठवड्यांत जगभर हिंडू-फिरू लागले आहे. पुण्याचा नितिन महाजन याच्या डोक्यातील ती कल्पना. त्याच्या मुली व लहानमोठी मंडळी घरात कंटाळून गेली असल्यामुळे त्यांच्या मनोरंजनासाठी काहीतरी करावे या भावनेतून ऑनलाईन स्पर्धेची कल्पना त्याला सुचली. प्रथम पुण्यापुरती नंतर महाराष्ट्रापुरती, भारतापुरती असा स्पर्धेचा विस्तार बोलण्या-बोलण्यातून होत गेला. दरम्यान नितिनने कानपूर आयआयटीच्या अॅल्युम्नी असोसिएशनची पुणे शाखा व रोटरी क्लब (खडकी) यांच्याशी संपर्क साधून त्यांचा पाठिंबा व सहकार्य या स्पर्धेस मिळवले. त्यामुळे त्याचा उत्साह वाढला. तो व त्याची मित्रमंडळी स्पर्धा ग्लोबल करण्याची स्वप्न पाहू लागली. त्याने त्याच्या जगातील परिचितांमध्ये मेसेज पाठवला. त्याला खरा प्रतिसाद लाभला तो रणजीत जोग या त्याच्या मेरीलँड (वॉशिंग्टन-अमेरिका) येथील बिझनेस असोशिएट्कडून. रणजीतची पत्नी सोनाली हिने फारच पुढाकार घेतला. सोनालीचा अनुभव वेगळा नव्हता. ती पण कंटाळली होतीच. पण सोनालीला चित्रकला, गायन असे छंद आहेत. आपापसांत बोलता बोलता छंदांचे विषय वाढत गेले आणि त्याबरोबर त्या त्या कल्पनांचा विस्तारही होत गेला. त्यामधून आकाराला आली 'उमंग-ग्लोबल' नावाची ऑनलाइन स्पर्धा.
नितिन महाजन
          नितिन आणि सोनाली हे दोघे सॉफ्टवेअर उद्योगात आहेत. त्यामुळे त्यांचा संपर्क जगभर आहे. बघता बघता, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, इंग्लंड, न्यूझीलंड अशा देशांत माणसे जोडली गेली. स्पर्धेचे तपशील ठरू लागले. आरंभी चित्रकला, गायन, छायाचित्रे, नृत्य आणि अभिनय या पाच कलांत आणि तीन वयोगटांत स्पर्धा घेण्याचे ठरले आहे. प्रवेशिका कोणत्याही विभागात कोणालाही सादर करता येईल. त्यास भाषा, धर्म, देश असे कसलेही बंधन नाही. संयोजकांनी ही पहिली स्पर्धा आहे असे म्हटले आहे. त्यामुळे अशा आणखी स्पर्धा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याबाबत सोनालीला विचारले. तेव्हा ती म्हणाली, की जगात अशी ही ऑनलाईन स्पर्धा प्रथमच भरत आहे.
ती जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकच लोकांच्या अपेक्षा वाढत आहेत. वाद्यसंगीत, लेखन या कलांचा सध्याच्या स्पर्धेत समावेश नाही. तोही पुढील स्पर्धांत जाहीर करता येईल. नितिन महाजन यांची इनपॅकेबल सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. त्या कंपनीचे इव्हेंटग्लिंट आणि लीडग्लिंट हे दोन प्रॉडक्ट आहेत. त्यांच्यामार्फत या स्पर्धेचे संयोजन केले जात आहे. नितिन म्हणाला, की ही वैशिष्ट्यपूर्ण व एकमेवाद्वितीय स्पर्धा होणार आहे. त्यामुळे त्यासंबंधी जगभर औत्सुक्य व्यक्त केले जात आहे. जगातील वेगवेगळ्या देशांतून मान्यवर, तज्ज्ञ परीक्षक स्पर्धेतील प्रवेशिकांची तपासणी करण्यासाठी लाभले आहेत. सगळे त्यांच्या त्यांच्या कलाशाखांत प्रवीण आहेत.
सोनाली जोग - पानसरे
          स्पर्धेचे उद्घाटन भारतीय वेळेप्रमाणे सोमवारी, 25 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता झाले. जगाच्या वेगवेगळ्या देशांतील सुमारे पन्नास प्रतिनिधी झूम अॅपद्वारा एकत्र जमले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलियात रात्र होती व दुसऱ्या दिवशीच्या पहाटेची प्रतीक्षा होती; तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याला सकाळ झाली होती व पश्चिम किनार्‍याला पहाट होती. असे काळवेळेचे वेगवेगळे संदर्भ देत-घेत प्रतिनिधी बोलत होते, वेगवेगळ्या कल्पना सुचवत होते. कार्यक्रमाची सुरुवात नितिनच्या पत्नी प्रतिमा महाजन यांच्या गणेशवंदनेने झाली. त्या संगीत विशारद आहेत. त्यांचे 'ओंकार स्वरूपा'... या गीताचे सूर मीटिंगची चाळीस मिनिटे कानात घुमतील असेच होते. नितिन व सोनाली यांनी प्रास्ताविक केले, तेच देशोदेशींच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन. त्यामुळे प्रतिनिधी एकमेकांची ओळख जरी पडद्यावर करून देत-घेत होते तरीही सर्वांमध्ये छान हार्दिक भाव तयार झाला व स्पर्धेचा शुभारंभ प्रतिनिधींच्या मनाला भिडून गेला. समारंभ संपताच प्रतिनिधींच्या तशा मेसेजेसचा अक्षरशः पाऊस पडला. मग रोटरी क्लबचे वीरेंद्र शोरेन व कानपूर आयआयटीचे शैलेंद्र अग्रवाल यांनी आणि मित्रांनी स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रतिनिधींनी शंका विचारल्या, सूचना केल्या आणि स्पर्धेला भरघोस यश लाभेल असा विश्वास व्यक्त केला. सुमारे पन्नास जणांनी एकमुखाने 'थ्री चिअर्स' केले. तो आवाज साऱ्या जगभर कित्येक काळ घुमत राहिला असेल! त्या लाटांवरून स्पर्धेचा प्रसार जगभर होणार आहे आणि त्याची परिणती म्हणून वेगवेगळ्या कलाविभागांत शेकडो-हजारो प्रवेशिका येतील अशी खात्री नितिन व सोनाली यांना वाटत आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी पुढे लिंक देत आहोत, https://www.eventglint.com/umang तसेच इंग्रजी प्रकटनही. कोरोनाला हरवण्याचे नाना तऱ्हेचे प्रयत्न लॉकडाऊन काळात सर्वत्र होत आहेत, त्यांपैकी जगभर ऑनलाईन होणारा हा एकमेव व विधायक प्रयत्न आहे. तो महाराष्ट्राच्या भूमीतून रूजला गेला आहे, हे विशेष!
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
UMANG - The Radiance of life!!!
GLOBAL ONLINE CONTEST FOR DRAWING, PHOTOGRAPHY, SINGING, DANCE & ACTING!!!

Register NOW to participate:
     In these tough times of lockdown and other restrictions all over the world, innumerable people and organisations are involved in helping people and local administrations for overcoming challenges due to COVID-19. The lockdown restrictions have adversely affected every aspect of our lives and the children, are missing out on fun times outdoors.
     The objective behind organising such an event is to fill a child’s day with happy moments to encourage them for the great job they are doing in supporting - to handle the crisis.
     Small activities like these will definitely help you and your child to spend some creative times together and also generate the much needed excitement which goes missing in routine work - all staying at one place due to the crisis. Turning the COVID-19 crisis into a pleasant moment for the kids participating with us will be the biggest reward for us.
To know more about the contest:
We wish Best of luck to all the participants in advance!!!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------

गुरुवार, २८ मे, २०२०

लंडन खूप दूर आहे... (Corona Experience in Britain)


अमेय आणि तेजश्री वेल्हाणकर
कोरोनासंबंधात लंडन येथे राहत असलेल्या वेल्हाणकर व दळवी कुटुंबीयांशी संपर्क साधला. अमेय आणि तेजश्री वेल्हाणकर या पतिपत्नींनी तेथील माहिती दिली. पहिला रुग्ण ब्रिटनमध्ये 29 जानेवारी 2020 रोजी आढळला. बरेच लोक डिसेंबरच्या शेवटी व जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत इटाली, ऑस्ट्रिया अशा युरोपीयन देशांत सहलीसाठी जातात. तसेच ते या वेळीही गेले होते. युरोपीयन देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव आधीच झाला होता. दरम्यान, नववर्ष साजरे करून चीनमधून लोक कामावर हजर  होण्यासाठी ब्रिटनमध्ये परत येऊ लागले होते. परंतु त्यावेळी सगळीकडे पसरलेला कोरोना ब्रिटनमध्ये गांभीर्याने घेतला गेला नाही. त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. कोरोनाचा विषाणू ब्रिटनमध्ये शिरला. सरकारने पहिले पाऊल 16 मार्चला उचलले. परदेशी प्रवासावर निर्बंध घातले. परदेशी प्रवासी थांबले तरी देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच होते. ऑफिस अथवा कंपनीमध्ये एखादा कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह निघाला तर  तेवढा एक  मजला बंद ठेवला जाऊ लागला. तरीसुद्धा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत गेला. बऱ्याच कंपन्यांनी मग त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरांतून काम करण्याच्या सूचना दिल्या. सरकारने 20 मार्चला लॉकडाऊन जाहीर केले. सार्वजनिक स्थळे, मॉल्स, जिमखाने बंद झाले. विलगीकरणाबद्दलच्या सूचना 24 मार्चला दिल्या गेल्या. तोपर्यंत कोरोनाचा उद्रेक मोठा झाला होता. ब्रिटन कोरोनाबाधित देशांमध्ये जगात दुसऱ्या स्थानावर जाऊन पोचला होता.
        लॉकडाऊन जाहीर झाल्याबरोबर स्टोअर्सबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या, फक्त जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी होती. पण स्टोर उघडे आणि आत काही मालच नाही अशी परिस्थिती झाली. कोठेही गेलात तरी मनुष्यस्वभाव बदलत नाही हे म्हणतात, ते खरे आहे. लोकांनी साठेबाजी सुरू केली. सॅनिटायझरची विक्री चढ्या भावाने सुरु झाली. हगवण/डायरियाची साथ आल्याप्रमाणे टॉयलेट पेपरची विक्रमी विक्री झाली. टॉयलेट पेपर मिळेनासे झाले. त्यात सरकारने लक्ष घातले आणि रेशनिंग सुरु केले. एका वेळेस एका व्यक्तीला फक्त दोनच वस्तू खरेदी करता येतील असा नियम निघाला. परिणामी लोक रोज दुकानाबाहेर रांगा लावू लागले. ब्रिटनमध्ये ऑनलाईन खरेदी-विक्री भरपूर प्रमाणात होते. तेथेसुद्धा ऑर्डर देण्यासाठी लाख-दीड लाख लोक क्यूमध्ये असायचे. मर्यादित लोकांच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जायच्या. लोक परत दुसऱ्यादिवशी साईट सुरु झाली, की लॉगिनसाठी प्रयत्न करायचे. त्या सगळ्या गडबडीत जेष्ठ नागरिकांची पंचाईत होऊ लागली. त्यांना लांब रांगेत उभे राहणे जमेना. त्यांच्यासाठी दुपारचा एक तास आरक्षित केला गेला. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सकाळचा एक तास राखीव ठेवला गेला आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होऊ लागला.

        सध्या तेथे काय परिस्थिती आहे? आर्थिक  केंद्र असलेल्या लंडन आणि व्यवसायाचे केंद्र असलेल्या मँचेस्टर येथे कोरोनाने  हाहाकार माजवला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे ती गर्दीची ठिकाणे आहेत. शरीर तंदुरुस्ती ही अनिवार्य गोष्ट आहे असे मानणाऱ्या सरकारने वॉकला जायला व डॉग रनिंगला बंदी घातली नाही. सार्वजनिक वाहतूक चालू आहे. फक्त अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी दिवसातून एकदा बाहेर पडा अशा सूचना आहेत. पण त्याची कडक अंमलबजावणी होत नाही. कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलिस दंड आकारू शकतात. पण एखादी व्यक्ती, दिवसातून किती वेळा बाहेर पडली आहे, ती नक्की कोणत्या कारणासाठी बाहेर पडली आहे, याचा माग ठेवणे हे काम तसे कठीणच. कोरोनाच्या तडाख्यातून अगदी पंतप्रधान बोरिस जॉन्सन व प्रिन्स चार्ल्सपण सुटले नाहीत. नव्वदी पार केलेल्या राणीच्या बाबतीत ते होऊ नये म्हणून तिला जनसंपर्कापासून दूर दुसऱ्या राजमहालात ठेवले आहे.
          इतर सर्व देशांप्रमाणे ब्रिटनचेही खूप आर्थिक नुकसान झाले आहे. जे.पी.मॉर्गनमध्ये व्हाईस प्रेसिडंट असलेले अमेय वेल्हाणकर सांगतात, की यावर्षी जीडीपीचा दर आठ टक्क्यांनी खाली जाईल असा अंदाज आहे. तेथील स्टॉक मार्केट जानेवारी 2020पासून पंचवीस टक्क्यांनी गडगडले आहे. रोख्यांचे भाव खाली आल्यामुळे उद्योजक पैसे उभारण्यासाठी धावाधाव करु लागले आहेत. सरकारने या सर्वांवर उपाय म्हणून देशाच्या जीडीपीच्या पाच टक्के मदत जाहीर केली आहे. कामगाराचा पगार देणे मालकाला शक्य झाले नाही तर त्याचा ऐंशी टक्के पगार अथवा दरमहा अडीच हजार पौंडांची मदत सरकारने प्रत्येक कामगाराला दिली. मोठ्या कंपन्यांमध्ये काम कमी झाल्याने थोडे कमी तास काम करा व कामानुसार पगार घ्या असे धोरण सुरु केले आहे. ते कर्मचाऱ्यांनापण फायदेशीर ठरत आहे, कारण मुले घरी असतात. त्यांना सांभाळून ऑफिसचे काम करण्याची तारेवरील कसरत सोपी होते. ते सांगतात, कोरोना हा ब्रिटनमध्ये दुष्काळातील तेरावा महिना आहे. ब्रेक्झिटमुळे अर्थव्यवस्था मंदावली होती. त्यात कोरोनाचे संकट आले. डिसेंबर 2020पर्यंत ब्रेक्झिटचे सोपस्कार पूर्ण करायचे होते. ती तारीख गाठणे कठीण आहे. ते पुढे सांगतात, की नॅशनल हेल्थ स्कीमच्या अंतर्गत सर्व वैद्यकीय सेवा सरकार मोफत पुरवते. तो मोठा फायदा नागरिकांना आहे. 
श्रेयस वेल्हाणकर
डेलॉइटमध्ये असिस्टंट मॅनेजर असलेले श्रेयस वेल्हाणकर सांगतात
, की व्हिसावर काम करणारे लोक नोकरीवरून कधी काढून टाकतील या भीतीच्या छायेत काम करत आहेत. नवीन नोकरभरती पूर्णपणे थांबली आहे. श्रेयस यांना मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात परदेश प्रवास करावा लागला. त्यांना परत आल्यावर सर्दीखोकला झाला. त्यांची एका दिवसात टेस्ट होऊन त्याचा रिपोर्टपण मिळाला. ते सांगतात, की आता तसे होत नाही. आजार खूप बळावला असेल तरच टेस्ट होते. आम्ही नॅशनल हेल्थ स्कीम व इतर सेवाभावी काम करणाऱ्या लोकांचे आभार मानण्यासाठी दर गुरुवारी बाल्कनीमध्ये उभे राहून टाळ्या वाजवतो. लॉकडाऊन कंटाळवाणा होऊ नये म्हणून ते व त्यांचे सहकारी लंच ऑनलाईन एकत्र घेतात.
         
दिनानाथ दळवी
लंडनला स्थायिक असलेले जेष्ठ नागरिक दळवी सांगतात
, की सरकार आमची खूपच काळजी घेत आहे. आमची मेडिकल हिस्टरी नॅशनल हेल्थ स्कीमकडे आहे. त्यानुसार आमची हाय रिस्क, व्हलनरेबल अशी वर्गवारी केली गेली आहे. त्यांना आमची गरजेची औषधे माहीत असतात. ते लोक आमच्या तब्येतीची चौकशी करतात. गरज पडल्यास औषधेगरजेच्या वस्तू, फूड पॅकेट्स पुरवतात.
        ब्रिटिश टेलिकम्युनिकेशनमध्ये Finance  Manager म्हणून कार्यरत असलेल्या तेजश्री वेल्हाणकर सांगतात, की लॉकडाऊनचा एक मोठा फायदा असा झाला, की अमेय बराच वेळ घरी असतो. माझा प्रवासाचा वेळ कमी झाल्यामुळे मला पेंटिंग करायला, पियानो वाजवायला वेळ मिळतो. मी जीम बंद झाल्यामुळे परत योगाकडे वळले आहे. समर सुरु झाला आहे. लोक सनबाथसाठी उत्सुक आहेत. बरेच महिने घरी असलेल्या मुलांना घरी कसे रमवायचे यासाठी पालक नवनवीन शक्कला लढवत आहेत.     दळवी सांगतात, की व्हीलचेअरवर असलेल्या आमच्या शेजाऱ्याच्या पत्नीचे अचानक निधन झाले.  नॅशनल हेल्थ स्कीमच्या लोकांनी सगळी काळजी घेतली. आम्ही मात्र त्यांना काही मदत करू शकलो नाही. अगदी अंत्यदर्शनसुद्धा आम्हाला घेता आले नाही. तर वेल्हाणकर म्हणाले, की आमचे आईवडील भारतात असतात. आत्तापर्यंत वाटायचे, की त्यांना गरज लागली तर आम्ही लगेच भारतात पोचू. प्रवासाला आठ-दहा तास लागतात. लंडन काही दूर नाही. पण आता जाणवते, ते तेवढे सोपे नाही. लंडन खूप दूर आहे.
अमेय वेल्हाणकर 44-7768534848 ameyavelhankar@gmail.com
दिनानाथ दळवी 44-7521817483 dinanath1954@gmail.com
विनीता वेल्हाणकर यांचे एम ए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांनी बँकेत तेहेतीस वर्षे नोकरी केली आणि 2011 साली स्वेच्छानिवृत्ती पत्करली. त्यांचे पती चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांची मुलगी मानसी वैद्य व तिचा परिवार अमेरिकेत आहे आणि मुलगा अमेय व त्याची पत्नी तेजश्री लंडनला वास्तव्यास आहेत. विनीता यांना वाचनाची आवड आहे. तसेच, त्यांचा शेअर मार्केटचाही अभ्यास आहे.  

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------