गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

पिंगुळीच्या ठाकर समाजाची लोककला (Pinguli's Thakar Folk Art)


मोहन रणसिंग
मोहन रणसिंग याचे जीवन तळचा समाज जागा होत होता त्या काळात घडले; त्यामुळे तो वयात आल्यावर, नोकरीत स्थिरावल्यावर समाजकार्यास लागला. किंबहुना मोहनसारख्या शेकडो कार्यकर्त्यांचा समाजाला जागे करण्यात, समाजाचा विकास करण्यात हातभार लागला आहे. ही गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची, परंतु गेल्या पंधरा-वीस वर्षांत समाजात असे परिवर्तन होत गेले, की ते कार्यकर्ते काहीशा विफल अवस्थेत समाजापासून दूर, आत्ममग्न मनस्थितीत उर्वरीत काळ कंठत आहेत. ते एक वेगळेच 'सोशल डिस्टन्सिंग'. समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी या समाजस्थितीची चिकित्सा केली पाहिजे.
 मोहन बाबली रणसिंग याचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ गावाजवळच्या पिंगुळी या खेड्यात झाला. त्याला आधी तीन भावंडे होती, त्यानंतरही तीन-चार भावंडे झाली. समाजात त्यावेळी अतोनात दारिद्र्य आणि अपार कष्ट होते. तळच्या समाजात तर फारच, परंतु विकासाच्या सरकारी धोरणांमधून सोनेरी स्वप्ने दिसू लागली होती. मोहन याचे वडील भिक्षा मागून आणत. त्याला हिंडपावर जाणं असे म्हणत. त्या भिक्षेला तो समाजव्यवस्थेचा भाग म्हणून सामाजिक मान्यता होती. त्यांची भटकंती त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावापासून दूर, साठ मैलांवरील गोव्यापर्यंत असे. त्यांना जे धान्य व पैसे मिळत त्यावर कुटुंबाची गुजराण होत नसे. त्यामुळे मग घरामध्ये सतत भांडणतंटे, मारामाऱ्या, दुखणीखुपणी चालत. आईच्या कधी कधी अंगात येई, मग तर तिचा रुद्रावतार बघायलाच नको. तशातच आई-वडिलांनी अर्थार्जनासाठी दारू गाळण्याचा धंदा सुरू केला. वडील बाहेर असत, त्यामुळे आईलाच तो उद्योग करावा लागे. मदतीला मुले असत. मोहन हे सारे वर्णन हसत हसत करतो, पण त्यामधून त्याचे आतले दु:ख प्रकट होत असते.
         
मोहन ठाकर समाजाचा. त्याचे लहानपण बिकट परिस्थितीत गेले. तो त्यातून सावरून उभा राहिला. त्याने त्या लहानपणाची कहाणी एका पुस्तकात मांडली आहे, ती विलक्षण वेधक-वाचनीय आहे. मोहनने त्या पुस्तकात त्याच्या जन्माची पार्श्वभूमी, त्याचा जन्म, त्याची शाळा, त्याचे शाळेतील प्रेमप्रकरण, त्याचे कुटुंबातील संघर्षमय जगणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याला भोगावे लागलेले जातपंचायतीचे आव्हान असे सारे विस्ताराने लिहिले आहे. पुस्तकाचे शीर्षकच -गावदाबी असे बोलके आहे. म्हणजे जातपंचायतीस द्यावा लागलेला दंड. ती दोन-पाचशे रुपयांची रक्कम आताच्या काळाच्या संदर्भात नगण्य वाटते, परंतु त्यामागील जुलूम – तो व्यक्तीच्या मनाची सालडी सोलत जातो. मोहन व त्याचे कुटुंबीय यांनी ते सारे भोग भोगले; नव्हे, ती मंडळी त्यांना पुरून उरली.      
          मोहनने जातपंचायतीला पुढे, मुंबईत राहून मोठे आव्हान उभे केले, परंतु तेथे, सिंधुदुर्गात जगणारे कुटुंब - ते जातीचा बहिष्कार कसा सहन करणार? शेवटी, मोठ्या भावाने पंचायतीचा दंड भरून बहिष्कारातून सुटका करून घेतली! मोहनची अवस्था मी जिंकलो - मी हरलोसारखी झाली. त्याचे समाधान एवढेच, की नंतर जातपंचायत व्यवस्थाच मोडून पडली! मोहनला तीस-चाळीस वर्षांपूर्वी झालेली घुसमट अजून त्रस्त करते.
मोहनचा आणि माझा स्नेह विशेष जुळला, त्याचे कारण म्हणजे त्याचे समाजहिताचे स्वप्न मोठे होते. शिवाय, त्याला दूरदृष्टी होती. समाजाची पक्की माहिती असल्याशिवाय त्याच्यासाठी कोणतीही योजना आखता येणार नाही यासाठी सर्व समाजांनी त्यांची त्यांची माहिती गोळा करावी व ती 'फेडरल' स्वरूपात एकत्र संकलित करावी अशी एक मोठी योजना त्याने आखली. तेव्हा मंडल आयोगाच्या अहवालामुळे सर्व छोट्यामोठ्या जातसमुहांना, गावसमुहांना त्यांची त्यांची 'ओळख' लाभत होती. पण ते समूह स्वतःपुरते पाहणारे इतके संकोची होते, की मोहनची विशाल योजना त्यांच्यापर्यंत पोचेना. मग मोहननेही तो नाद सोडला आणि स्वतःच्या ठाकर समाजाच्या विकासकार्याची धुरा उचलली. त्याने त्यांच्यासाठी विविध तऱ्हेचे कार्य केले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज स्थापन करून, न्यायालयीन लढाई देऊन जातीचे दाखले मिळवले; समाजातील शिकणाऱ्या मुलांचे सत्कार घडवून आणले. ठाकर हा आदिवासी समाज, केंद्राची तशी त्याला मान्यता होती. महाराष्ट्र सरकारने मात्र वेगळी भूमिका घेतली त्यातून तो लढा उद्भवला. वर्षापूर्वी त्याची दोन पुस्तके प्रकाशित झाली तेव्हा त्याचे दीडदोनशे चाहते, मुख्यतः गावकरी उपस्थित होते. त्यात त्यांच्या कुडाळ हायस्कूलच्या शंभर वर्षांच्या इतिहासाचे पुस्तकदेखील आहे. एरवी मात्र समाजातील लोक उपक्रमास फार प्रतिसाद देत नाहीत, स्वान्त राहू इच्छितात असा त्याचा अनुभव आहे.
          मोहनचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. पण त्याचा मोठा भाऊ ना.बा.रणसिंग हा मॅट्रिकपर्यंत शिकू शकला. त्यांना शिक्षक म्हणून गोव्यात नोकरी लागली. घरात जणू दिवाळीचा सण आला! मोहनसुद्धा दहावी पास झाला आणि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळसारख्या ठिकाणी नोकऱ्या करू लागला. नंतर त्याने मुंबईत येऊन मुंबई महानगरपालिकेत कायमस्वरूपी नोकरी पत्करली. तेथे त्याला बढत्या मिळत गेल्या.      
         त्याने मुंबईत महत्त्वाची गोष्ट केली म्हणजे कॉलेजशिक्षण घेतले. तो मराठी विषय घेऊन एमए झाला. मोहन हा फार संवेदनाशील माणूस आहे. तो एका बाजूला समाजकार्यकर्ता असला तरी दुसरीकडे मराठी कवितेत रमणारा कोमल हृदयाचा गृहस्थ आहे. त्याचे कवितांचे बालपणापासूनचे वेड पुढे शांता शेळके-केशव मेश्राम यांच्या प्राध्यापकी सहवासात कॉलेजमध्ये अधिक बहरून आले.
एकदा शांता शेळके ज्ञानेश्वरीचा पंधरावा अध्याय शिकवत असताना कळसुत्री बाहुल्यांचा उल्लेख (का साई खेड्याची गती | सूत्रतंतू || ) आला. शांताबार्इंनी केलेले विवरण बहारदार होते, पण मोहनला वेगळीच चेतना मिळाली. शांताबाई बोलत असताना, त्याला त्याच्या ठाकर समाजातील कलाधन आठवले. महाराष्ट्रात कळसुत्री बाहुल्यांचे खेळ होत, ते त्या समाजाकडून. त्याखेरीजही नाना तर्‍हेचे कलाकसब ठाकर समाजाच्या अंगी आहे. त्याच सुमारास, रणसिंग याच्या वाचनात संगीतकार वसंत देसाई यांनी ठाकरकलेचे ऋण मान्य केल्याचे आले. देसाई यांनी म्हटले होते, की त्यांच्या संगीत रचनांवर ठाकर समाजाच्या लोकसंगीताचा प्रभाव आहे. मोहन रणसिंगने या लोककला, मौखिक परंपरा यांच्या संशोधनाचा ध्यास घेतला. त्याचा पिंगुळी पंचक्रोशीतील लोककलांबद्दलचा लेख 1 मे 1977 रोजी 'लोकसत्ते'त प्रसिद्ध झाला. त्यातून कुडाळजवळच्या पिंगुळी या मोहनच्या छोट्या गावाला आगळे महत्त्व आले. चित्रकथीचा अनमोल ठेवा तेथे सापडला. मोहन रणसिंग त्यातील प्रत्येक प्रयत्नाशी कमीजास्त जोडला गेलेला मी पाहिला आहे. त्यावेळचे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण संचालक बाबुराव सडवेलकर यांनी ते धागे सूत्रबद्धरीतीने जोडून घेतले. ते संचित जपण्याच्या दिशेने पावले पडली. दूरदर्शनने वृत्तांत सादर केला आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणी कौल यांनी चित्रे दाखवत कथाकथनाचा तो प्रकार पडद्यावर मुद्रित करून ठेवला आहे. मोहनच्या नऊ पुस्तकांपैकी सहा पुस्तके ठाकर समाज आणि त्याच्या कला यासंबंधातील आहेत.
         मोहनने ठाकर कलेचा वारसा जपावा म्हणून ठाकर संस्कृती भवन उभारण्याची योजना आखली, पाच गुंठे जागा मिळवली, पण पुढे समाजाकडून प्रतिसाद मिळेना, पैसा उभा राहिना. त्याचे स्वप्न मनात राहिले. तो म्हणाला, की विचित्र गंमत बघा, हायवेलगत म्हणून अगदी माफक किमतीत मिळवलेल्या त्या जागेपैकी तीन गुंठे जागा रस्ता रुंदीकरण योजनेत सरकारने घेतली. त्याचे पंधरा लाख रुपये मिळाले. आता संस्थेकडे थोडे पैसे आहेत, तर जागा नाही!
          मोहन परखड बोलतो. त्यात हल्ली विषाद आला आहे. समाज इतका आत्ममग्न होत गेला आहे, की समाजकार्याचे कोणास काही पडलेले नाही असे सतत त्याच्या बोलण्यात येते! तो अनुभव त्या काळातील बहुतेक समाजकार्यकर्त्यांचा आहे.
          मला वाटते, कार्याचे दिशा आणि कार्यासाठी संघटन या दोन्ही पद्धतींत बदल करण्याची गरज आहे. यापुढील काळात समाजगट, समूह यापेक्षा व्यक्ती महत्त्वाची होणार आहे. व्यक्तीचे गुणविशेष व व्यक्तीचे शक्तिसामर्थ्य जाणले पाहिजे. त्या वैशिष्ट्यांच्या आधारे नेटवर्क हे यापुढील समाजसंघटन असेल. मोहनचा मुलगा आणि मुलगी अत्याधुनिक विद्यांत विशेष स्थानी आहेत. ती समाजाच्या प्रगतीची दिशा आहे.
मोहन रणसिंग 9820814620
- दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------
मोहन रणसिंग यांची पुस्तके
 मंगळवार, २८ एप्रिल, २०२०

किरणची कविता पोचली जगामध्ये (Kiran's Poetry Brings Funds to the Village)


किरण भावसार
किरण भावसार हे वडांगळी, तालुका सिन्नर (नाशिक) येथील रहिवासी आहेत. ते कवी-ललित लेखक आहेत. त्यांच्या 'शनिखालची चिंच' या ललित लेखाने चमत्कार घडवून आणला. ई-साहित्य प्रतिष्ठानने त्यांचे त्याच नावाचे पुस्तक प्रकाशित केले. ते इंग्लंडमधील सुधीर बर्वे यांनी वाचले. बर्वे त्या लेखाने प्रभावित झाले. त्यांनी किरण भावसार यांना कळवले, की "तू लिहिलेल्या चिंचेच्या झाडाची पिल्ले जर ठिकठिकाणी लावलीस तर किती झाडे तयार होतील!" किरण यांनी मधुकर गीते या मित्राच्या मदतीने दीडशे झाडे लावता येतील अशी जागा शोधली. झाडे लावण्याच्या कामास पंचवीस हजार रुपये खर्च अपेक्षित होता. किरण यांनी तसा मेसेज सुधीर बर्वे यांना पाठवला. बर्वे यांनी उलट मेसेजने एकवीस हजार रुपये पाठवले. किरण यांनी त्यानुसार मेंढी गावातजयहिंद विकास संस्थेच्या जागेवर चिंचेची झाडे लावली. ही किमया एका ललित लेखाने घडून आली.
          किरण भावसार यांनी लॉकडाऊनच्या काळात त्यांचे निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथील संस्थाचालक मित्र रवींद्र गोरडे यांच्या सांगण्यावरून कोरोना जनजागृती संबंधी गीत लिहिले. गोरडे हे स्वतः संगीतकार असल्याने त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी ते संगीतबद्ध केले. भावसार यांच्या त्या गीताचे बघता बघता एक गमतीदार पण प्रभावी व्हिडियोगीतच घडले. (सोबत व्हिडियो
          किरण भावसार यांना कथा, कविता, ललित लेखनाची आवड आहे. त्‍यांचा मुळांवरची माती सांभाळतानाहा कवितासंग्रह, आठवणींची भरता शाळाशनिखालची चिंचहे दोन ललित लेखसंग्रह यांची ईबुक्स प्रसिद्ध झाली आहेत. ती तिन्ही पुस्तके जगभर पोचली. कॅलिफोर्निया-अमेरिका, इंग्लंड आणि विविध देशांतून किरण यांच्या कवितांवर इमेलव्दारे प्रतिक्रिया आल्या. ती तिन्ही पुस्तके ई-साहित्य प्रतिष्ठानने प्रसिद्ध केली आहेत. भावसार यांच्या मुळांवरची माती...या कवितासंग्रहाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखापुरस्कार प्राप्त झाला आहे. अहमदनगर येथील इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय कवी अनंत फंदीपुरस्कारही त्यांना मिळाला आहे. किरण भावसार यांच्या 'स्वप्नवेड्या पंखांसाठी' या बाल काव्यसंग्रहातील 'अदलाबदल' या कवितेला बालभारतीने 2019 साली दुसरीच्या 'खेळू करू शिकू' या पुस्तकात स्थान दिले आहे. त्या बडबड गीतावर चिमुकल्यांना अभिनयासह नृत्य सादरीकरणाचे धडे दिले जातात. भावसार हे बालभारतीच्या अभ्यासक्रमात स्थान मिळालेले सिन्नर तालुक्यातील पहिले साहित्यिक ठरले. ते पुस्तक बालभारतीने दहा भाषांत अनुवादित केल्यामुळे ती कविताही दहा भाषांत अनुवादित झाली. ती कविता अशी आहे, की

रंग रूपाची पक्षांनी अदलाबदल केली, याचे कपडे -त्याला मोठी धमाल झाली

बगळ्याचा डगला कावळ्याने घातला, पांढऱ्या शुभ्र अॅप्रनमध्ये डॉक्टरच वाटला!

मोराचा पिसारा कोंबड्याने पळवला, वजन कसले झेपते त्याला सारा मातीत मळवला

चिमणी बिचारी हिरमुसली तिचे कोणाशी जमेना करड्या पांढऱ्या रंगाविना तिला मुळी करमेना
            
          त्यांनी लहान मुलांसाठी लेखन 2017 पासून ठरवून सुरू केले. भावसार म्हणाले, "तसे लेखन करताना बालविश्वात स्वतःला घेऊन जावे लागते, लहान मूल व्हावे लागते". किरण भावसार यांची मुले त्यावेळी लहान होती. त्यांनी मुलांचा अभ्यास घेताना काही प्रयोग केले. त्यातूनही बालकवितांची निर्मिती झाली. उदाहरणार्थ च, प, ज, भ या अक्षरांशी खेळू लागले आणि अक्षरांच्या गमती जमती केल्या. उदाहरणार्थ -
'च' आणि 'प' दोघे आहेत खूप चपळ,

'च' चाले चटचट, 'प' पळे पटपट

'च' आणि 'प' चे पटत नाही फार

क करी 'कटकट' व ला वाटे 'वटवट'
  
या शब्दांतील अनुप्रास ऐकून मुलांना मजा वाटते. उदाहरणार्थ खारूताई कशी असते, ती कशी चालते, पळते -
खारूताई तुरूतुरू जातेस कोठे पळत एवढी कशी घाई तुला जरा नाही कळत

झरझर झाडावर चढत नको जाऊ पाय घसरून पडशील ना होईल मोठा बाऊ

गुबूगुबू खातेस अशी बरे दिसत नाही ठेवतील ना नावे लोक तुला वाटते का काही
  
भावसार यांच्या छोट्या मुलाचे नाव मोनू, त्याला विचारले, अरे आईस्क्रीमचा कोन पाहिजे का तुला? तर तो म्हणतो, "पाहिजे पण आईस्क्रीमचा कोन मोबाईलच्या टॉवरइतका मोठा पाहिजे". त्याला सर्व गोष्टी अतिशयोक्ती असलेल्या पाहिजे असतात. त्यावरून भावसार यांना सुचलेली ही कविता पहा.

आईस्क्रीमचा कोन हवा इतका मोठा त्याच्यापुढे वाटावा टॉवरसुध्दा छोटा

थंडगार लस्सी नळातून यावी ग्लासभरात जमेल कसं बादली भरून घ्यावी

आंब्याच्या झाडाला मँगो कुल्फी यावी झाडावरची तोडून वाटेल तेव्हा खावी

चोहीकडे सरबताचे पूर वाहत यावे बर्फ गोळे लालेलाल त्यावर तरंगावे

असं जर झालं तर किती मजा येईल उन्हाळ्याची सुट्टीही गारेगार होईल
          
त्यातून त्यांचे 'स्वप्नवेड्या पंखांसाठी', 'आपडी थापडी' आणि 'इरिंग मिरींग' हे तीन बालकवितासंग्रह छापील पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाले. त्यांच्या कवितांना ठिकठिकाणी विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना त्यांची कवी म्हणून नासिक जिल्ह्यात ओळख झाल्यामुळे विविध शाळांत कार्यक्रमांसाठी बोलावले जाते. त्यांनी एक बाल कादंबरी लिहिली आहे. तीही प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ते सांगतात, की त्यांच्या आजीच्या तोंडी म्हणींचा साठा होता, दर वाक्यागणिक तिच्या तोंडून म्हण बाहेर पडायची. त्या म्हणींचा त्यांच्यावर संस्कार झाला.
          त्यांनी आयटीआय झाल्यानंतर 'सकाळ' आणि 'लोकमत'मध्ये पत्रकारिता केली. त्यावेळी विविध संपादकांकडून भावसार यांच्यावर लेखनाचे, शिस्तीचे व वक्तशीरपणाचे संस्कार झाले असे ते म्हणतात. त्यांनी पत्रकारिता करताना वडांगळी गावातील महत्त्वाच्या गोष्टी प्रकाशात आणल्या. सतीदेवीच्या यात्रेत बंजारा समाजातील लोक येतात आणि बोकडबळी देतात ही कुप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले. त्याला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिल्यामुळे गावकऱ्यांकडून विरोध झाला. त्यांच्या गावी जावयाची धिंड काढण्याची प्रथा आहे तिलाही त्यांनी वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिली. भावसार हे उपक्रमशीलही आहेत. त्यांनी पाहिले, की गावात शिमग्याला चार म्हातारे लोकगीते म्हणतात, ती फक्त त्यांनाच येतात. त्यांच्यासोबतच्या इतरांना ती पाठ नाहीत. ती लोकगीते त्या म्हाताऱ्यांनंतर नष्ट होतील, त्यामुळे त्यांनी त्या गाण्यांचे मोठ्या परिश्रमाने पुस्तिका प्रसिद्ध केली व अलीकडे त्यांचे रेकॉर्डिंग करून घेतले. ती गीते गावातील पिढी वाचून/ध्वनिफीत ऐकून शिमग्याच्यावेळी म्हणते व अशाप्रकारे प्रथा साजरी केली जाते. टिप्‍परघाई - वडांगळी गावचा शिमगा या 'थिंक महाराष्ट्र'वरील लेखाच्या लिंकवरून ती गीते वाचता-ऐकता येतील. (सोबत व्हिडियो)
          ते नोकरीनिमित्त सिन्नर येथे स्थायिक आहेत. किरण दिवसभर यंत्राच्या गराडय़ात असत, ते मॅकेनिक होते. तशात त्यांना कविता सुचत. त्यांना 2013 साली गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेला आहे. आता ते सरफेस एक्झिक्युटिव्ह आहेत. ते पती-पत्नी आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. त्यांना दोन भाऊ आहेत. ते दोघेही शिक्षक आहेत. त्यांचे आईवडील गावी छोट्या भावासोबत राहतात.

भावसार यांच्या मोठ्यांसाठी असलेल्या कवितांचे विषय कामगार आणि शेतकरी हे आहेत. त्यांचे दु:ख, त्यांच्या वेदना, त्यांची सामाजिक जाणीव यांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत उमटले आहे. किरण यांच्या या कवितांसाठी सार्वजनिक वाचनालयाचा प्रतिष्ठेचा कवी गोविंद काव्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांनी मराठी साहित्याच्या प्रेमापोटी एमए मराठी केले आहे.
          भावसार यांना सामाजिक कार्याची आवड असून ते सिन्नर येथीलमंडळ साहित्य रसास्वाद’, ‘कामगार शक्ती फाउंडेशन, मेंढी गावचीजयहिंद विकास संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद आदी संस्थांशी संलग्न आहेत. ते 'सहारा व्यसन मुक्ती केंद्रा'त समुपदेशक म्हणूनही मार्गदर्शन करतात.  
          वडांगळीचे दिग्विजय कला क्रीडा साहित्य केंद्र आणि गावातील वाचनालय यांच्या उभारणीत किरण यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. (सोबत व्हिडियो) ते वाचनालय त्यांच्या समवयस्क तरुणांनी सुरू केले. त्यासाठी डॉ.चतुर्भुजी राठी यांनी लाकडी कपाट दिले, ग्रामपंचायतीने जागा दिली. त्या वाचनालयासाठी कुसुमाग्रजांनी पुस्तके दिली होती. त्याचा किस्सा ते सांगताना म्हणाले, की त्यांच्या कानी आले, की कुसुमाग्रज त्यांच्याकडील पुस्तके वाचनालयांना देतात. एके दिवशी, मित्रमंडळींसोबत किरण भेट न ठरवता कुसुमाग्रजांच्या घरी गेले. त्यांनी त्यांच्यासमोर धडाधड आम्ही गावात किती चांगली कामे करत आहोत असे नाट्यपूर्णरीत्या सांगितले. कुसुमाग्रजांनी सर्व ऐकून घेतले आणि ते म्हणाले, "झाले तुमचे सांगून? हे बघा, पलंगाखाली जो गठ्ठा बांधलेला आहे तो उचला आणि पळा. पुस्तकांची यादी गेल्यांनतर बनवायची आणि पुस्तके मिळाल्याची पोच पाठवायची" असे त्यांनी बजावले. ते वाचनालय आजही सुरू आहे. त्यावेळी त्यांनी गावात वाचनालयाच्या माध्यमातून व्याख्याने, कविसंमेलने प्रत्येक महिन्याला आयोजित केली व गावकऱ्यांना भजन-कीर्तनाच्या पलीकडे काही वेगळे ऐकण्याची सवय लावली.         
           ते 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या 'नाशिक जिल्हा संस्कृतिवेध' मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी तेथील यात्रा, प्रथा-परंपरा, कर्तृत्ववान व्यक्ती यांविषयी लेखन केले. ते म्हणतात, "थिंक महाराष्ट्रमुळे मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. गावागावात कर्तबगार माणसे आहेत, त्यांची धडपड नोंदून ठेवावी ही दृष्टी मला 'थिंक महाराष्ट्र'मुळे लाभली". त्यांचे सध्या लॉकडाऊनच्या काळात सिन्नर तालुक्याच्या एका गावातील एका सामान्य कार्यकर्त्याच्या जीवनकार्यावर चरित्र लिहिण्याचे काम चालू आहे.
किरण भावसार 7757031933 kiran@advancedenzymes.com
- नितेश शिंदे 9323343406 info@thinkmaharashtra.com
नितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे उपसंपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरींगचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी विविध सामाजिक विषयांवर 'स्ट्रीट प्ले' आणि 'लघुनाटके' लिहिली. त्यांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग असतो. त्यांना 'के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुंडट ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला.
----------------------------------------------------------------------------------------------
किरण भावसार यांची पुस्तके